एल. के. कुलकर्णी
एखादी शलाका (काडी, सळई) किंवा इतर वस्तू मध्ये धरून तिच्या मदतीने आकाशस्थ ज्योतीचे निरीक्षण करणे म्हणजे वेध घेणे होय. शलाकेमुळे संबंधित तेजबिंब विद्ध होऊन त्यास बघणे शक्य होते, यावरून वेध हा शब्द आला. भारतात प्राचीन काळापासून चंद्र, सूर्य व ताऱ्यांचे वेध घेतले जात. त्यासाठी वेधयंत्रेही होती. भास्कराचार्यांनी चक्रयंत्र, चाप, तुरीय, गोलयंत्र, नाडीवलय, फलक, घटिकायंत्र, शंकू, यष्टी या यंत्रांची नावे दिली आहेत. सूर्यसिद्धांतातही शंकू, चंद्र, कपाल, धनुष्य, नर, वानर, भूभगोल या यंत्रांचा उल्लेख आहे. या विषयावर अनेक ज्योतिषांचे ग्रंथ आहेत.
प्राचीन काळी वेध घेण्याचे कार्य व्यक्तिगत पातळीवर चाले. पुढे साम्राज्ये निर्माण झाल्यावर ज्योतिषशास्त्रास राजाश्रय मिळून वेधशाळा निर्माण झाल्या. भारतात सर्वात प्राचीन वेधशाळा अवंती (उज्जयिनी) येथे असावी. या नगरीतून मध्यसूत्रगा (भूमध्यरेखा किंवा प्रमाण रेखावृत्त ) जाते, असे सूर्यसिद्धांतात म्हटले आहे. आज जे स्थान ग्रीनीचला आहे, ते प्राचीन काळी भारतात उज्जैनीला होते. या पार्श्वभूमीवर महा‘कालेश्वर’ हे नाव लक्षणीय ठरते. उज्जैनशिवाय नालंदा, तक्षशिला येथेही वेधशाळा होत्या. बिहारमध्ये तारेगना येथे आर्यभटांनी उभारलेली वेधशाळा होती. पण या सर्व वेधशाळा कालौघात नष्ट झाल्या. यानंतर मोगल सम्राट अकबराच्या काळात राजा मानसिंग यांनी काशीला एक वेधशाळा उभारली. ती दशाश्वमेध घाटाजवळ मानमहालाच्या छतावर आहे. पुढे अठराव्या शतकात जयपूरचे राजे सवाई जयसिंग यांनी उज्जैन, जयपूर, मथुरा, दिल्ली व बनारस (काशी) येथे वेधशाळा उभारल्या. त्याच ‘जंतर मंतर’ म्हणून ओळखल्या जातात.
हेही वाचा : अन्यथा : दवा, दुआ, दावा!
सवाई जयसिंह हे मिर्झाराजे जयसिंह यांचे खापरपणतू. त्यांनी स्थापत्य व इतर क्षेत्रांत मोठे योगदान दिले. जयपूर हे शहर त्यांनीच उभारले. त्यांचे गुरू जगन्नाथ समराठ (सम्राट) यांच्या प्रेरणेने तरुणपणीच जयसिंह ज्योतिषशास्त्राकडे वळले आणि पुढे त्यांनी १७२४ ते १७३५ या काळात वरील पाच वेधशाळा उभारल्या. यापैकी काशी येथे पूर्वीपासून असलेल्या वेधशाळेतच जयसिंह यांनी मोठ्या सुधारणा केल्या. इतर चार ठिकाणच्या वेधशाळा मात्र नव्याने उभारल्या. यापैकी मथुरा येथील वेधशाळा सर्वात आधी १७११ मध्ये उभारण्यात आली होती. पण ती १८५० च्या सुमारास नष्ट झाली. इतर चार ठिकाणच्या वेधशाळा आजही अस्तित्वात आहेत.
या वेधशाळांत अनेक वेधयंत्रे आहेत. ही वेधयंत्रे म्हणजे त्रिकोण, चाप, वर्तुळ, इ. भूमितीय आकाराची भव्य बांधकामे आहेत. धातू किंवा लाकूड वगैरे पदार्थ वापरून बनवलेली वेधयंत्रे ही उष्णता व थंडीमुळे प्रसरण, आकुंचन पावतात. तसेच ती वाकतात, झिजतात व तुटतात. त्यामुळे विटा, चुना, इ.पासून बनवलेली बांधकामे हीच वेधयंत्रे म्हणून उभारण्यात येऊ लागली. अशा उंच व विशाल इमारतरूपी यंत्रातून अतिशय सूक्ष्म स्तरापर्यंत अचूक वेध घेता येतात. तैमुरलंगाचा नातू उलुघबेग याने आजच्या उझबेकिस्तानातील समरकंद येथे १४२० मध्ये अशी भव्य इमारतवजा वेधशाळा उभारली होती. ती १४४९ मध्ये उद्ध्वस्त झाली. जयसिंह यांनी ‘जयसिद्धांत’ या आपल्या ग्रंथात उलुघबेगाचा उल्लेख सन्मानाने केला आहे. जयसिंह यांच्या वेधशाळा या भारतीय ज्योतिषावर आधारित आहेत. पण त्या उभारण्यापूर्वी त्यांनी ग्रीनीचसह जगभरातल्या वेधशाळांच्या अभ्यासासाठी माणसे पाठवली होती. त्यातून आकाराला आलेल्या आपल्या वेधशाळेतून सात वर्षे वेध घेऊन जयसिंह यांनी त्या नोंदी व तक्ते ‘ज़िज-ए मुहम्मदशाही’ या ग्रंथात संकलित केले. त्यांच्या जंतर मंतर वेधशाळेत शंकूयंत्र, रामयंत्र, भित्तियंत्र, जयप्रकाश यंत्र, सम्राट यंत्र, नाडीवलय यंत्र, दिगंश यंत्र इ. अनेक प्रकारची यंत्रे आहेत. शंकूयंत्र प्राचीन काळापासून जगात अनेक वेधशाळांत वापरले जाते. त्यातून स्थानिक वेळ, सूर्यनक्षत्र व रास, उत्तरायण, दक्षिणायन, ऋतू इ. समजते. सम्राट यंत्र म्हणजे जगातले सर्वात मोठे सूर्यघड्याळ आहे. जयपूरचे बृहद् सम्राट यंत्र ८८ फूट म्हणजे आठ मजली इमारतीएवढे उंच आहे. जगन्नाथ समराठ यांनी निर्माण केलेले हे यंत्र म्हणजे उंच व लांब जिना असून त्याच्या दोन बाजूंस चापाकार भिंती आहेत. त्यावर तास, मिनिट सेकंदाच्या खुणा आहेत. या जिन्याचा क्षितिजाशी होणारा कोन तेथील अक्षांशाएवढा असतो. त्यामुळे या जिन्याच्या टोकाशी ध्रुवतारा दिसतो. या यंत्रातून २० सेकंदापर्यंत अचूक वेळ, तसेच सूर्य व ताऱ्यांची क्रांती (रेखांश) मोजता येते.
हेही वाचा : ‘सुवर्णमार्गा’चा झळाळता इतिहास
जयप्रकाश यंत्र हे जयसिंह यांनी सूर्यसिद्धांतावरून तयार केले होते. जंतर मंतरमधील इतर यंत्रातूनही स्थानिक वेळ, तसेच त्या स्थळाचे अक्षांश रेखांश, चंद्र, सूर्य, तारे यांचे खगोलीय अक्षवृत्त व रेखावृत्तीय स्थान, त्यांची क्षितिजापासून उंची (उन्नतांश), उत्तरेच्या संदर्भात कोन (क्षित्यांश) सूर्याची क्रांती (म्हणजे सूर्याचे किंवा कोणत्याही ताऱ्याचे खगोलीय विषुववृत्तापासून अंशात्मक अंतर. हे अंश मिनिटांत सांगतात.) इत्यादी बाबी मोजता येतात. विशेष म्हणजे या विविध यंत्रांतून सेकंदापर्यंतची अचूक वेळ तसेच अक्षांश व रेखांश, क्रांती, इ. सूक्ष्म पातळीपर्यंत मोजता येतात. त्या आधारे तिथी, महिना, मुहूर्त, प्रहर, तिथीचा क्षय वृद्धी, ग्रहणे, सूर्य, ग्रह, ताऱ्यांच्या गती, इ. गणिते केली जात. या चारही ठिकाणच्या वेधयंत्रांतून आजही सूक्ष्म व अचूक वेध घेता येतात.
शास्त्र, कल्पकता, सौंदर्य व वास्तुकला यांचा संगम जंतर मंतर वेधशाळेत दिसतो. अर्थातच त्या भारतीय बुद्धिमत्ता, ज्ञान व प्रतिभेचे सर्वोच्च व नेत्रदीपक प्रतीक आहेत. त्यामुळे त्या केवळ भारतीय भूगोल व खगोलशास्त्रच नव्हे तर भारतीय संस्कृतीचेही मानचिन्ह ठराव्यात. त्यांच्या उभारणीनंतरचा काळ अस्थिर व धामधुमीचा होता. मोगलांच्या यादवी लढाया, अब्दाली व नादिराशहा, इ.ची आक्रमणे, १८५७ चे स्वातंत्र्य समर वगैरे वादळातही मथुरा सोडून इतर चारही ठिकाणच्या वेधशाळा सुरक्षित राहिल्या. पण उपेक्षा व दुर्लक्षाच्या अंधारातून मात्र त्या प्रकाशात येऊ शकल्या नाहीत. समरकंदची उलुघबेग वेधशाळाही उद्ध्वस्त झाली होती पण विसाव्या शतकात तिचे पुनरुज्जीवन करून तिला जागतिक आकर्षणस्थळ बनवण्यात आले. हे भाग्य भारतातील जंतर मंतरच्या वाट्याला मात्र आले नाही. उज्जैनच्या जंतर मंतरचे पुनरुज्जीवन १९२३ मध्ये महाराज माधवराव शिंदे यांनी केले. नंतरही १९७४, १९८२ व २००३ मध्ये या वेधशाळेत सुधारणा करण्यात आल्या. आता तिचे नाव जिवाजी वेधशाळा आहे. तसे उज्जैन येथे महाकालेश्वराच्या दर्शनाला किंवा काशीला गंगाकिनारी लाखो येतात. पण त्यापैकी बहुतेकांना माहीतही नसते की आपण भारताचा मानबिंदू ठरावा अशा अद्वितीय जागतिक वेधशाळेच्या जवळ उभे आहोत. दिल्लीतील जंतर मंतर हे तर सभा आंदोलने, धरणे इ. उपक्रमांमुळेच लोकांना अधिक माहीत झाले आहे. जयपूरच्या वेधशाळेचा समावेश युनेस्कोने जागतिक वारसा स्थळात केला आहे. इतरही ठिकाणच्या जंतर मंतरचे थोडे सुशोभीकरण झाले आहे. पण केवळ शोभेच्या वस्तू न मानता प्रात्यक्षिक भूगोलाच्या प्रयोगशाळा म्हणूनही त्यांचे कार्यात्मक पुनरुज्जीवन शक्य आहे.
हेही वाचा : तिसऱ्या डोळ्याने पाहिलेले स्वप्न…
प्राचीन नालंदापासून आज आपण कोडईकॅनॉलची सौर वेधशाळा, लडाखमध्ये हेनले येथील भारतीय खगोलशास्त्रीय वेधशाळा (IAO), कावलूर येथील वेणूबापू वेधशाळा, नारायणगाव येथील रेडिओ दुर्बिणी, इपर्यंत येऊन पोहोचलो आहोत.
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी धरणांना ‘आधुनिक भारताचे मंदिर’ म्हटले होते. वेधशाळाही आधुनिक मंदिरे वा तीर्थक्षेत्रेच आहेत. त्याचप्रमाणे जंतर मंतर हे भूतकाळाचे निर्जीव अवशेष नाहीत तर भविष्यवेधी तीर्थक्षेत्र आहे. पण काशी, उज्जैन, जयपूर, दिल्ली इ. ठिकाणी जाणारे यात्रेकरू व पर्यटक जवळच्याच या तीर्थक्षेत्राकडे कधी वळतील? कदाचित त्यांचीच वाट पाहत जंतर मंतर तग धरून उभे असावे.
सर्व छायाचित्रे सौजन्य: विकिपीडिया