पद्यातून विनोदकथन करणे, ही साधी गोष्ट नाही. विनोदी कविता ऐकताना त्यातला विनोदच तेवढा प्रभावित करीत असला तरी त्या विनोदाच्या मांडणीला आवश्यक गंभीर चिंतनाचा अंगभूत गुणही कवीच्या ठायी असावा लागतो. अशा कवींच्या यादीत नागपूरचे मधुप पांडेय हे अग्रस्थानी होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भवतालातून नकळत टिपलेल्या अनामिक गोष्टींना शब्दांचा आगळा डौल देऊन व त्या शब्दांना काळ, स्थळ आणि परिस्थितीशी नेमके जोडून त्यातून विनोद निर्माण करण्याची त्यांची शैली शब्दातीत होती. त्यांच्या काव्यातील विनोदाला मानवी मानसशास्त्राचे ज्ञान लाभले होते. त्यांच्या कविता वाचताना काळाशी थेट संवाद होत असल्याचा भास वाचकांना आजही होतो.

हेही वाचा >>> देशकाल : भाजप का जिंकला? काँग्रेस का हरली?

मधुप पांडेय यांच्या काव्यातील संवाद मनाला दु:ख आणि निराशेच्या दिशेने नेत नाही, तर त्याऐवजी हसतमुखाने वाचकाच्या मनात जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्यासाठीची नवीन ऊर्जा पेरतो. त्यांच्या कवितांचे बलस्थानच विनोद आहे. पण, त्यांनी कधीही कुणालाही उपहासाचा विषय बनवले नाही. कारण, ते जे लिहायचे त्यातून समस्या निर्माण करणे हा त्यांचा उद्देश नव्हता तर आपल्या काव्याला समस्येचे निराकरण करण्याच्या टोकापर्यंत कसे नेता येईल, याचा विचार ते सातत्याने करत. याच चिंतनातून त्यांचे ‘हसते हसते हस्ते कट जाये रस्ते’, ‘चुटीली चिकोटिया’, ‘मिठी मिर्चिया’ इत्यादी काव्यसंग्रह प्रसवले. त्यांना वाचकांचे अपार प्रेम लाभले. त्यांच्या विश्वात्मा काव्यसंग्रहाचा इंग्रजी भाषेत अनुवाद करण्यात आला. मधुप पांडेय यांनी तब्बल दहा हजारांपेक्षा जास्त अखिल भारतीय कवी संमेलनाचे संयोजन आणि संचालन केले. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात अनेक ठिकाणी हास्यकवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले तर आयोजकांना संचालनासाठी पहिले नाव आठवायचे ते मधुप पांडेय यांचे.

त्यांचा जन्म परतवाडा जिल्ह्यात १९४१ मध्ये झाला. पदव्युत्तर शिक्षण झाल्यानंतर त्यांनी संपूर्ण आयुष्य हास्य कवितांना समर्पित केले. राज्यातील टोकावरच्या ग्रामीण परिसरात जन्म घेऊनही त्यांनी अध्यापनाचा व विद्यादानाचा मार्ग सोडला नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे ते प्रोफेसर गुरू म्हणून ओळखले जायचे. त्यांना ‘महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी’तर्फे ‘हिंदी सेवा सन्मान’, उत्तर प्रदेश शासनाच्यावतीने ‘अट्टहास शिखर पुरस्कार’ देऊन त्यांना गौरवण्यात आले. याशिवाय ‘साहित्य श्री हसीरत्न ’(काका हाथरासी पुरस्कार ट्रस्ट),‘‘विंध्य विभूती पुरस्कार’, ‘विदर्भ हिंदी साहित्य संमेलन सर्वोच्च पुरस्कार’ असे अनेक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ते पहिल्या जागतिक हिंदी संमेलनाचे सहसंयोजक आणि मॉरिशसच्या चौथ्या जागतिक हिंदी परिषदेत भारत सरकारच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचे सन्माननीय सदस्य होते. आपल्या सभोवतालचे वलय झुगारून त्यांनी कायम नव्या लिहित्या हातांना प्रोत्साहन दिले. हजारोंच्या गर्दीत सादर होणाऱ्या त्यांच्या कविता व त्या कवितांवरील त्यांचे मार्मिक भाष्य ऐकणे ही श्रोत्यांसाठी मोठीच पर्वणी असे. मधुप पांडेय यांच्या निधनाने श्रोते या पर्वणीला कायमचे मुकले आहेत.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian satirist poet madhup pandey biography zws