गिरीश कुबेर
वेगवेगळ्या देशांमध्ये, उच्च पदांवर भारतीय व्यक्ती बसणार असेल तर ते भारतासाठी काही फार चांगलं लक्षण नाही, असं परराष्ट्र खात्यामधल्या त्या जाणकाराचं म्हणणं होतं. असं का वाटत असेल त्यांना?
परराष्ट्र खात्याशी संबंधित एका ज्येष्ठाशी गप्पांच्या ओघात विविध देशांतल्या निवडणुकांचा विषय निघाला. अगदी अलीकडची ही गोष्ट. जगातल्या अनेक देशांत आता भारतीय वंशाचे राजकारणी आहेत. अगदी अमेरिकेतल्या सिएटलपासून अफ्रिकेतल्या सिएरा लिओनपर्यंत एकही देश असा असणार नाही की जिथे भारताशी नातं सांगणारा एखादा लोकप्रतिनिधी, एखादा नगरसेवकादी कोणी नाही. अर्थात आपली पैदासच इतकी भरभक्कम आहे की कुठेही ‘आपला’ कोणी ना कोणी असणारच. जगात दर पाचवी-सहावी व्यक्ती ही भारतीय असू शकते इतकी आपली निर्मिती!
तर कोणत्या देशात कोणत्या महत्त्वाच्या पदांवर कोणत्या कोणत्या भारतीय व्यक्ती आता निवडून येऊ शकतात अशा दिशेनं गप्पा वळल्या. म्हणजे अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत निक्की हॅले आहे, विवेक रामस्वामी आहे असं. या मंडळींबाबत काहीबाही बोललं जात असताना ही परराष्ट्र खात्यातली व्यक्ती म्हणाली : हे काही भारतासाठी चांगलं लक्षण नाही. इतक्या देशात इतक्या पदांवर भारतीय येणार असतील तर आपली डोकेदुखी वाढलीच म्हणून समजा!
हेही वाचा >>> अन्वयार्थ : कशाला हवी जंगलांची अडचण?
वर्षभरापूर्वीच्या त्या गप्पांनंतर इंग्लंडमध्ये थारेपालट झाला आणि पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या मंत्रिमंडळात सुएला ब्रेव्हरमन यांच्याकडे गृहमंत्रीपद दिलं गेलं. पंतप्रधानही भारतीयांशी नाते सांगणारा आणि त्यांच्या गृहमंत्रीणबाई देखील भारताच्या नात्यातल्या. सुनक पंजाबदा पुत्तर तर सुएलाबाईंचं नातं गोव्याशी. अमेरिकेत गेल्या निवडणुकीनंतर जो बायडेन यांनी कमला हॅरिस यांना उपाध्यक्ष केल्यावर अनेकांचं राष्ट्रप्रेम उचंबळून आलं होतं त्या प्रमाणे ब्रिटनबद्दलही झालं. अनेकांनी या सगळय़ाचं कौतुक केलं. असं सगळं कौतुकाचं वातावरण. वाचन मथळा-मर्यादित असणाऱ्यांचा उत्साह फक्त घडामोडीची दखल घेण्यापुरताच असतो. त्या घडामोडीसंदर्भातल्या तपशिलात त्यांना रस नसतो. हे अलीकडच्या काळानुरूपच म्हणायचं! तपशिलात शिरायचंच नाही.. मथळा-मॅनेजमेंट इतपतच सगळं! असो. तर या सुएलाबाईंबाबतचा तपशील यथावकाश पुढे येऊ लागला.
गृहमंत्रीपदावरनं केलेल्या एका भाषणात त्या म्हणाल्या : इंग्लंडवर स्थलांतरितांचं चक्रीवादळ (हरिकेन) आता लवकरच चालून येईल. मग एकदा रस्त्यावर तंबूत राहावयाची वेळ आलेल्या गरिबांबाबत त्यांनी मत व्यक्त केलं. डोक्यावर छप्पर असण्याचंही भाग्य नसणं आणि म्हणून हे असं रस्त्याच्या कडेला राहणं हा ‘लाइफस्टाईल चॉईस’ आहे.. असं सुएलाबाईंचं मत. ‘इंग्लिश मुलींवर अत्याचार बहुतांश ब्रिटिश-पाकिस्तानी पुरुषांकडून होतात.. त्यांच्या टोळ्याच आहेत असे उद्योग करणाऱ्या’, सुएलाबाईंच्या मुखातून प्रसवलेला हा आणखी एक विचारमोती. तो मस्तकी धारण करून त्याबद्दल सुएलाबाई पाद्यपूजा करण्याच्या योग्यतेच्या आहेत असं वाटू लागलेला एक वर्ग आपल्याकडे आहे. या वर्गासाठी उतारा म्हणजे सुएलाबाईंचं पुढचं वक्तव्य: ‘‘या देशात शिरलेल्या स्थलांतरितांकडे एकदा बघा.. इथं बेकायदा वास्तव्य करणारे बहुसंख्य हे भारतीय आहेत..’’ त्यांच्या म्हणण्याचा रोख उघड आहे. ज्यांनी कोणी बीबीसी किंवा स्काय टीव्हीवर त्यांना हे म्हणताना ऐकलं/पाहिलं असेल त्यांना सुएलाबाईंच्या वाक्ताडनाच्या दिशेबरोबर त्यांच्या बोलण्यातली घृणा जाणवली असेल. मुंबईतल्या नेपिएन सी रोड वा तत्सम परिसरात राहणारे स्थलांतरित मजुरांच्या गर्दीविषयी साधारणपणे ज्या सुरात बोलतात त्याची आठवण सुएलाबाईं भारतीय स्थलांतरितांविषयी जे बोलल्या ते ऐकताना होईल.
हेही वाचा >>> लोभस हा इहलोक..
पदावर असताना त्यांचा एकच एककलमी कार्यक्रम होता, स्थलांतरित हटाव. त्यांचं स्वप्न होतं- या स्थलांतरितांना अफ्रिकेतल्या रवांडात पाठवून द्यायचं. सरकारी खर्चानं त्यांची रवानगी तिकडे करायची. ‘‘आपल्या वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर ही अशी स्थलांतरितांच्या पाठवणीची छायाचित्रं पहायला मी अगदी आतुर आहे’’, अशा अर्थाचं त्यांचं एक गाजलेलं वक्तव्य. हे त्याचं स्वप्न त्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयानंच उद्ध्वस्त केलं. स्थलांतरितांना असं दुसऱ्या देशात पाठवणं बेकायदा आहे, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयानं या भारतीय वंशाच्या गृहमंत्रीणबाईंना फटकावलं.
गेल्या आठवडय़ात त्यांना पंतप्रधानांनी पदावरनं काढून टाकलं. एकाच पदावरनं दोन पंतप्रधानांनी काढून टाकण्याचा विक्रम भारतीय वंशाच्या सुएलाबाईंच्या नावे नोंदला जाईल. स्थलांतरितांच्या मुद्दय़ावर अशी भूमिका घेणाऱ्या त्या तशा एकटय़ा नाहीत.
तिकडे अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी रिंगणात उतरलेले विवेक रामस्वामी हे पण असेच भारी आहेत. ते जन्माने अमेरिकी. भारतीय स्थलांतरिताच्या पोटी ते अमेरिकेत जन्मले. आपल्याकडे अनेकांच्या घरातल्यांना बाळंतपणासाठी अमेरिका, इंग्लंड वगैरे ठिकाणी जावंसं वाटतं. त्याचं कारण हे आहे. तिकडे जन्म झाला की नागरिकत्वाची ददात मिटते. असं काही ना काही कारणानं एकदाचं अमेरिकेत जायचं, स्थिरावायच्या आत जोडीदाराची कशी व्यवस्था करता येईल हे पाहायचं. ती झाली की पुढच्या वर्षभरात तिचे/त्याचे आईवडील आलटून-पालटून बाळंतपणासाठी आलेच म्हणून समजा. मग अमेरिकी नागरिकत्व जन्मत:च मिळवलेल्याचं तीन/चार वर्षांत इकडे येऊन मौजींबंधन आहेच! शेवटी संस्काराला महत्त्व आहेच की!! हे दक्षिणी भद्रलोकी- ऊर्फ टॅमब्राम- रामस्वामी हे अशा संस्कारी घरातले. वय वर्ष अवघं ३८. आपल्याकडे येऊन हार्डवर्क वगैरे न करता हॉर्वर्ड विद्यापीठातनं त्यांनी पदवी मिळवली. स्वत:ची कंपनी काढली. आता थेट ते अमेरिकेचं अध्यक्षपद मिळवण्याचं स्वप्न पाहतायत. अभिमानाचीच बाब तशी ही तुम्हाआम्हा नेटिवांसाठी !
हेही वाचा >>> ग्रंथमानव : जुन्या चित्रांकडे नव्यानं पाहणारा विद्वान..
या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांचं पहिलं आश्वासन काय? तर ‘एच १बी’ व्हिसा रद्दच करून टाकायचे. ‘एच १बी’ व्हिसा म्हणजे अमेरिकेत जाऊन काम करण्याचा परवाना. हे व्हिसा भारतासाठी इतके महत्त्वाचे आहेत की त्याच्या आधारे आज अगदी लहान लहान गावांतल्या तरुणांना त्या देशात जायची संधी मिळते. कंपन्या हे व्हिसा आपल्या कामगारांसाठी/ कर्मचाऱ्यांसाठी घेतात. आकडेवारी असं दर्शवते की खुद्द या रामस्वामीबाबांनी त्यांच्या कंपनीसाठी किमान २८-३० वेळा या ‘एच १बी’ व्हिसाचा वापर केलाय. या रामस्वामीबाबांचे आईवडील पन्नासेक वर्षांपूर्वी या अशाच व्हिसाच्या जोरावर अमेरिकेत गेले असतील आणि अन्य हजारो, लाखो जणांप्रमाणे तिकडे राहायची संधी मिळाल्यावर हे विवेक नामे नररत्न त्यांस प्रसवले असेल. तिकडे जन्मले म्हणजे या विवेकास आपोआप नगारिकत्वही मिळाले.
पण आता ही जन्माने नागरिकत्व देणारी पद्धतदेखील बंद करून टाकायचं आश्वासन रामस्वामीबाबा देतात. अमेरिकेत जन्माला आला म्हणजे आपोआप नागरिक झाला या प्रथेला त्यांचा विरोध आहे. तिचा गैरफायदा अनेकांकडून घेतला जातो आणि अमेरिकेत उगाच गर्दी वाढते, असं त्यांचं मत. टॅमब्राम रामस्वामींना आरक्षणही मंजूर नाही. अमेरिकेत या पद्धतीला ‘अफर्मेटिव्ह अॅक्शन’ असं गोंडस नाव आहे. त्यांना समलैंगिकता हा एक पंथीय प्रकार वाटतो. अशी बरीच छान छान मतं मांडतात हे रामस्वामी. चुरूचुरू भाषण करतात. त्यांच्या चेहऱ्यावर परिचित अशी एक तरतरीत पण निर्बुद्ध सात्त्विकता कायम विलसत असते. चिडत नाहीत. उलट त्यांच्या वक्तव्यांमुळे बाकीचे चिडतात. परवाच्या चर्चेत आणखी एक भारतीय वंशाच्या नेत्या आणि पक्षभगिनी निक हॅले या बाबांवर इतक्या चिडल्या की ऐन थेट चर्चेत त्यांचं वर्णन हॅलेबाईंनी ‘स्कम’ (घाण, कचरा) असं केलं. भारतीय वंशाची एक महत्त्वाची व्यक्ती भारतीय वंशाच्या दुसऱ्या तितक्याच महत्त्वाच्या व्यक्तीला कचरा म्हणत असेल तर भारतात राहणाऱ्या भारतीयांना किती वाईट वाटेल याचा विचारही या मंडळींना नसावा?
ही दोन अगदी वानगीदाखल म्हणता येतील अशी उदाहरणं. ती सध्या चर्चेत आहेत म्हणून त्यांचा दाखला दिला. असे नमुने भरपूर आहेत. ते पाहिल्यावर दोन गोष्टी प्राधान्याने आठवल्या. पहिली म्हणजे लहानपणी वाचलेली (बहुधा विंदा करंदीकरांची) एक कथा. ‘आतले आणि बाहेरचे’ अशा शीर्षकाची. गाडी फलाटावर थांबल्यावर डब्यातले कसे नव्या प्रवाशांना ‘आत’ यायला विरोध करतात, तरीही काही येतात आणि पुढच्या स्थानकावर हे ‘बाहेरून’ नव्याने ‘आत’ आलेले ‘बाहेच्यांना’ कसे विरोध करतात, अशी ती कथा. दुसरी आहे त्याच वयात वाचलेली सुरेश भटांची कविता ..
गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे
आणीन आरतीला हे चंद्र-सूर्य-तारे..!
हे चंद्रसूर्यतारे म्हणजे बहुधा रामस्वामी, सुएला वगैरे असणार! परराष्ट्र खात्यातली ती अधिकारी व्यक्ती असं का म्हणाली त्याचाही अर्थ या निमित्ताने लक्षात आला.
girish.kuber@expressindia.com
@girishkuber