कल्पनेचे नवनवे आविष्कार दर्शवून थक्क करणाऱ्या कादंबऱ्या, उत्सुकता ताणून धरणारे कथासंग्रह, समाजातील वैगुण्यांवर बोट ठेवणारे, सत्याचा शोध घेण्याची चिकाटी दर्शविणारे लेखन, भूत- भविष्यातील जागतिक घडामोडींचे प्रतिबिंब आणि त्याविषयीचा लेखकाचा दृष्टिकोन मांडणारी पुस्तके, मानाचे पुरस्कार अशा ग्रंथजगतातील सर्व महत्त्वाच्या घटनांचे पडसाद दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘बुकमार्क’च्या पानांत उमटले. वर्षभरात काय लिहिले, वाचले गेले यावर दृष्टिक्षेप…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कॉन्स्पिरसी

.टॉम फिलिप्स व जॉन एलिज यांनी लिहिलेले हे पुस्तक अमेरिका-युरोपमध्ये प्रभावी ठरलेल्या अनेक कारस्थान-कथांचे सुरस वर्णन करतेच. कोणत्या प्रकारची मानसिकता अशा कारस्थान-कथांना जन्म देते किंवा विश्वास ठेवण्यास भाग पाडते, हा या पुस्तकाचा गाभा आहे. अशा कारस्थान- कथांपासून सावध राहायचे असेल तर काय काळजी घ्यावी, याबद्दलही पुस्तकात बरीच चर्चा आहे. ही कट-कारस्थाने आणि त्यांच्या संदर्भातल्या कथा इतक्या रंजक असतात की त्यापासून दूर राहणे अनेकांसाठी कठीण ठरते, याचीही जाणीव पुस्तक करून देते.

फायर ऑन द गँजेस

.राधिका अय्यंगार यांचे ‘फायर ऑन द गँजेस : लाइफ अमंग द डेड इन बनारस’ हे पुस्तक वाराणसीतील घाटांवर राहणाऱ्या डोंब किंवा डोम या समाजाच्या व्यथा शब्दबद्ध करते. विविध कला, गायन-वादनात कुशल असलेल्या या समाजाला आजही अतिशूद्र म्हणून जगावे लागते. त्यांच्या जगण्याचा अभ्यासू आढावा या पुस्तकात घेण्यात आला आहे. राधिका यांचे हे पहिलेच पुस्तक असले तरी त्या पूर्वीपासूनच अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित आहेत. विद्वज्जडता बाजूला ठेवून अत्यंत सोप्या भाषेत त्यांनी या समाजाचे आयुष्य, त्यांच्याविषयीचे गैरसमज, त्यांच्यापुढील आव्हाने टिपली आहेत.

हेही वाचा >>> अन्वयार्थ : ‘फसवणूक’, अडवणूक आणि निवडणूक!

सम पीपल नीड किलिंग

.फिलिपिनो पत्रकार पॅट्रिशिया ईवांजेलिस्ता यांचे रॉद्रीगो दुतेर्ते यांच्या फिलिपिन्समधील दहशतवादी राजवटीचे हे अनुभवकथन आहे. ‘देशहितासाठी’ हा एक शब्द सुरुवातीला जोडला की कोणत्याही बेकायदा कृत्याला वैधता मिळवून देता येते. मग विरोधकांना भलत्याच गुन्ह्यांत गुंतवून, देशद्रोही ठरवून, केलेला रक्तपातही देशभक्ती ठरतो. फिलिपिन्समधील रॉद्रीगो दुतेर्ते यांच्या जुलमी राजवटीचे वर्णन करणारे हे पुस्तक एकाधिकारशाहीकडे वाटचाल करणाऱ्या आणि त्यालाच प्रगती समजणाऱ्या देशांसाठी धोक्याची घंटा वाजविणारे आहे. रँडम हाऊसने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.

विमेन हू मेड मॉडर्न इकॉनॉमिक्स

.आर्थिक संसाधनांवर प्रदीर्घ काळ पुरुषांचा ताबा होता. आता दरवाजा थोडाफार किलकिला झाला आहे. पण एकूण परिस्थिती ‘मजल बरीच बाकी आहे’, अशीच आहे. या पार्श्वभूमीवर अर्थकारणात वावरलेल्या, तिथे आपलं योगदान दिलेल्या पाश्चात्त्य (इंग्लंड तसंच अमेरिकेमधल्या) स्त्रियांच्या कामाची दखल या पुस्तकात घेण्यात आली आहे. पुस्तकाच्या लेखिका रॅशेल जेन रीव्ह्ज या एक ब्रिटिश राजकारणी आणि अर्थतज्ज्ञ आहेत. भावी पिढीने फक्त पुरुषांच्या नजरेतूनच अर्थशास्त्राकडे पाहू नये, या क्षेत्रात स्त्रियांनीही योगदान दिले आहे, हे लक्षात घ्यावे आणि पुढची वाटचाल करावी हा या पुस्तकामागचा हेतू आहे. पुस्तक बेसिक बुक्सने प्रकाशित केले आहे.

आउटलिव्ह द सायन्स अँड आर्ट ऑफ लाँजेविटी

.डॉ. पीटर अटिया आणि बिल गिफोर्ड यांचे हे पुस्तक जगण्याची गुणवत्ता जास्तीत जास्त टिकवून ठेवण्याबद्दल विस्ताराने सांगते. गुणवत्ता वाढली की जगण्याची लांबीही आपोआपच वाढेल असेही सांगते. जगभरातले ८० टक्के मृत्यू साधारण चार प्रकारच्या आजारांमुळे होतात. रक्तवाहिन्यांच्या काठिण्यामुळे होणारे आजार (स्ट्रोक, हार्ट अटॅक), चेतासंस्थेचे आजार (स्मृतिभ्रंश), चयापचयाचे आजार (टाइप टू डायबेटिस) आणि कर्करोग. या चारही प्रकारच्या आजारांना एका सामायिक सूत्रात गुंफून त्यांच्या मागचे विज्ञान आपल्यासमोर रंजकतेने मांडण्यात आले आहे. वरवर पाहता हे वेगवेगळ्या अवयवांचे आजार दिसत असले तरी यांच्या मुळाशी चयापचयाचे अनारोग्य असते, अशी मांडणी यात आहे.

स्लिप, स्टिच अँड स्टम्बल

.राजऋषी सिंघल यांचे ‘स्लिप, स्टिच अँड स्टम्बल : द अनटोल्ड स्टोरी ऑफ इंडियाज फायनान्शियल सेक्टर रिफॉर्म्स’ या पुस्तकात वित्तीय सुधारणांसंदर्भात आधीची ६० वर्षे आणि आताची १० वर्षे अशी विभागणी करण्यात आली आहे. आग लागल्यावर बंबात पाणी भरायला घ्यावे, असा आपल्या वित्तीय सुधारणांचा खाक्याच बनला असल्याचे निरीक्षण लेखक नोंदवितात. अगदी गेल्या दहा वर्षांतील ‘नव भारता’चे प्रणेतेही याला अपवाद म्हणता येणार नाहीत. लोकसभेत राक्षसी बहुमत मिरवणाऱ्या भाजपच्या १० वर्षांच्या काळात अनुसरल्या गेलेल्या सुधारणांचे स्वरूपही मूलत: प्रतिक्रियावादीच राहिले. म्हणजे संकट अंगावर आल्यानंतर ते थोपवण्यासाठी सुरू झालेल्या धडपडीतून जे धोरण घाईघाईत स्वीकारणे भाग ठरले त्यालाच मग पुढे सुधारणा म्हटले गेले. वित्तीय क्षेत्रातील अशा पातळ विणीच्या आणि चुकल्या वाटेने गाठल्या गेलेल्या सुधारणांची गाथा या पुस्तकात मांडली आहे.

न्यू यॉर्क टाइम्स बुक रिव्ह्यू

.‘न्यू यॉर्क टाइम्स बुक रिव्ह्यू : १२५ इयर्स ऑफ लिटररी हिस्टरी – १८९६ टू २०२१’ या अत्यंत देखण्या पुस्तकात न्यू यॉर्क टाइम्समध्ये १२५ वर्षांत प्रसिद्ध झालेली मोजकी पुस्तक परीक्षणे, निबंध, मुलाखती, वाचकांची पत्रे व काही छायाचित्रे एकत्र करण्यात आली आहेत. पुस्तक परीक्षणे लिहिणाऱ्या लेखकांची नावे पाहिली तरी या ग्रंथाच्या श्रीमंतीची कल्पना येते. जेम्स बाल्डविन, मार्गारेट अॅटवुड, व्हर्जिनिया वूल्फ हे साहित्यिक या दर्जाची मंडळी त्यात आहेत. तर सत्तेची नशा उलगडून सांगणारा चरित्रकार रॉबर्ट कारो लिखित लिंडन जॉनसनच्या चरित्राच्या एका खंडाचे परीक्षण बिल क्लिंटन यांनी केले आहे.

वन्स अपॉन अ टोम

.‘वन्स अपॉन अ टोम: द मिसअॅडव्हेन्चर्स ऑफ अ रेअर बुकसेलर’ हे पुस्तक म्हणजे एका पुस्तकविक्रेत्याच्या आठवणी तर आहेतच, पण लंडनमधल्या वाचनसंस्कृतीचा एक उभा छेद या आठवणींतून वाचकासमोर उलगडण्यात आला आहे. काही वर्षांपूर्वी ऑलिव्हर डार्कशायर नावाच्या माणसानं हेन्री सॉथेरन या लंडनमधल्या २६३ वर्षांच्या पुस्तकांच्या दुकानात नोकरीसाठी प्रवेश केला. वर्षभर ही नोकरी करून मग दुसरीकडे चांगल्या पगाराची नोकरी बघायची असा त्याचा विचार होता. पण जुन्या पुस्तकांनी वेढलेल्या त्या वातावरणात तो इतका रमला की, आजही तो तिथेच कार्यरत आहे. हे पुस्तक तिथल्या अनुभवांवर आधारित आहे.

हाऊ टू रिग अॅन इलेक्शन

.निक चिजमन आणि ब्रायन क्लास यांचे हे पुस्तक लोकशाहीत जो निवडणूक जिंकतो त्याला बहुसंख्य मतदारांचा पाठिंबा असतोच, हे गृहीतक खोडून काढते. ‘२०२४ ची निवडणूक ही शेवटचीच’, ही नुसतीच पोकळ धमकी की इशारा, हे समजावून सांगण्याचा प्रयत्न हे पुस्तक करते. निवडणुकांचे निकाल कसे फिरविले जातात, विरोधी पक्षांवर कुरघोडी कशी केली जाते याच्या जगभरातल्या किश्शांची जंत्री यात देण्यात आली आहे. निवडणुकांत होणाऱ्या फसवेगिरीच्या गोष्टींची विभागणी सहा प्रकरणांत केली आहे.

द बीस्ट यू आर

.मानवाच्या अनपेक्षित वर्तनातून धक्कातंत्राचा परिणाम साधता येऊ शकतो, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न पॉल जी. ट्रिंबले यांचा हा कथासंग्रह करतो. यात एकूण १५ भयकथा आहेत. कथांना रूढार्थाने भयकथांच्या साच्यात बसवता येणार नाही. पण या सर्व कथांमध्ये एक अनपेक्षित असे अघटित झ्र पात्रांच्या नियतीत लेखकाने वाढून ठेवलेले आहे. या अघटिताच्या स्पर्शाने वाचकाचे अनुभवविश्व वेळोवेळी ढवळून निघते. धक्कातंत्राचा परिणाम साहित्यकृतीला कलाटणी देऊन साधण्यापेक्षा मानवी भावभावना आणि स्वभावाच्या अनपेक्षित वर्तनातून सामोरे आणण्याचे लेखकाचे कसब या संग्रहातील कथांमधून प्रत्ययास येते. सर्वच कथा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि अकल्पित अनुभव देतात.

हाऊ टु लव्ह इन संस्कृत (पोएम्स)

.सुखाचे तत्त्वज्ञान मांडणाऱ्या प्राचीन भारतीय काव्याचा अनुभव अनुषा राव, सुहास महेश यांनी संपादित आणि अनुवादित केलेल्या या पुस्तकातून येतो. गुप्त राजवटीच्या काळात भरभराटीच्या शिखरावर पोहोचलेली संस्कृत आणि त्यातली साहित्य-संपदा ही मोठ्या प्रतिभेचे दर्शन घडवणारी आहे. सुमारे दहा हजार लहान-मोठ्या कवितांमधून २१८ रचनांची निवड करून त्यांचे सहज, सोपे तरी सौंदर्यपूर्ण आणि कालसुसंगत भाषांतर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या रचनांची शीर्षके त्यांच्या भाषांतरासारखीच आजच्या काळाला साजेशी आहेत. कुमारसंभव, अमरूशटकम्, कामसूत्र, अथर्ववेद, महाभारत, मालती-माधव आणि इतर अनेक महत्त्वाच्या पण सामान्यत: ज्ञात नसलेल्या उत्तमोत्तम ग्रंथांमधून या रचना घेतल्या आहेत. यासह महत्त्वाचं हे की महाराष्ट्री प्राकृत भाषेतल्या, हाल सातवाहनाच्या ‘गाथा सप्तशती’मधल्या अनेक रचनाही यात समाविष्ट आहेत.

नाइफ

.सलमान रश्दी यांनी आपल्याला दुसरे आयुष्य मिळाले आहे, या भावनेतून आतापर्यंतचे आपले सारे संचित या पुस्तकात ओतले आहे. प्रेम, स्वातंत्र्य, धर्मनिंदा, उदारमतवाद इत्यादींबद्दलची मते ठामपणे आणि खुसखुशीत भाषेत मांडली आहेत. १२ ऑगस्ट २०२२ रोजी व्याख्यानासाठी ७५ वर्षांचे रश्दी व्यासपीठावर गेले असता अचानक प्रेक्षागृहातून २४ वर्षांचा एक तरुण समोर आला. त्यांच्या शरीरावर चाकूने १५ वार केले. आठएक तास शस्त्रक्रिया, कित्येक दिवस स्टेपल लावून जोडून ठेवलेले शरीर, कित्येक महिने उपचार सुरू राहिले. मनावरचा आघात ही तर वेगळीच गोष्ट होती. या सगळ्यावर मात करून ‘नॉर्मल’ आयुष्य जगण्यासाठी रुग्णाने जे काही करणे गरजेचे होते ते सारे रश्दींनी केलेच, पण ते पुरेसे नव्हते. मग एका लेखकाला जे जमते तेच त्यांनी केले झ्र एक पुस्तक लिहिले. ‘नाइफ’ ही त्याचीच परिणती.

इरॅडिकेशन ऑफ कास्ट

.जातीय जनगणना म्हणजे मूलभूत कल्याणकारी योजना असावी, असा काहीसा सार्वत्रिक समज आज पसरलेला दिसतो. असे करून आपण जातिनिर्मूलनाच्या लढ्याच्या आणि घटनेत नमूद समता या तत्त्वाच्या विरुद्ध दिशेने प्रवास तर सुरू केलेला नाही ना, असा प्रश्न विष्णू ढोबळे यांनी या पुस्तिकेत उपस्थित केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जातिव्यवस्थेचे निर्मूलन करण्याबाबत नि:संदिग्ध भूमिका घेऊन, जातीविहीन समाजनिर्मितीसाठी जो लढा उभारला आणि भारतीय राज्य घटनेच्या माध्यमातून जे समतेचे स्वप्न पाहिले त्याच्या उलट दिशेने तर आपण प्रवास करत नाही ना, असा मुद्दाही ढोबळे उपस्थित करतात.

द सिल्क रूट स्पाय

.मुळातून राष्ट्रभक्त असलेल्या अनेकांनी कधी समोरून तर कधी पडद्यामागे राहून अनेक लहानमोठ्या लढाया लढलेल्या असतात. त्यापैकी एक पडद्यामागे राहिलेली वादळी सत्यकथा इनाक्षी सेनगुप्ता यांची ही कादंबरी सांगते. नंदलाल कपूर, ऐन तारुण्यात ब्रिटिशांशी जोडला गेलेला एक पंजाबी तरुण, ज्याच्या हेरगिरीची कारकीर्द आणि खासगी आयुष्यातले चढउतार या कादंबरीत वाचायला मिळतात. पण ब्रिटिशांसाठी हेरगिरी करताना भारतीय क्रांतिकार्याला त्याने केलेली मदत ही या कथानकाची दुसरी आणि महत्त्वाची बाजू आहे. या दोलायमान अवस्थांमध्ये घडत झ्र बिघडत गेलेली पात्रे, परिस्थिती आणि स्वातंत्र्यपूर्व काळाचा मोठा अवकाश यांची सांगड लेखिकेने लीलया घातली आहे. आपल्या कल्पनेत आणि सिनेमात दिसणारे व गुप्तचरांचं पात्र वठविणारे चकचकीत नायक व खऱ्या गुप्तचरांच्या जीवनकथा यात मोठंच अंतर असतं, याची जाणीव कादंबरी करून देते.

माय जर्नी इन लिरिक्स अँड म्युझिक

.सईद अस्लम नूर यांचे सौरव सत्यदर्शी रे यांनी शब्दांकित केलेल्या या आत्मकथनात नव्वदीच्या दशकातील लकी अलीचे ‘पॉप पर्व’ अनुभवणाऱ्यांना भरपूर खाद्या पुरवणारे आहे. नूर यांची काश्मिरी पार्श्वभूमी, कुटुंबातील आव्हाने, पुढे मुंबई आणि नंतर बंगळूरुमधील वास्तव्य, कुटुंबाकडून लाभलेला उर्दू भाषेचा वारसा, मकसूद अलीशी झालेला परिचय आणि त्यानंतर पालटलेले आयुष्य अशा नाट्यमय वास्तवाचे दाखले या पुस्तकात आहेत. नव्वदच्या दशकातील इंडी पॉप पर्व अनुभवलेल्यांच्या आठवणींना हे पुस्तक वाचून उजाळा मिळेल. या गाण्यांमागचे किस्सेही जाणून घेता येतील.

बुकशॉप

.इव्हान फ्रिस यांचे ‘बुकशॉप : ए हिस्ट्री ऑफ द अमेरिकन बुकस्टोअर’ हे पुस्तक अमेरिकेतील प्रचंड ग्रंथदालनांचा इतिहास आणि त्यांचा ऱ्हास टिपते. पुस्तक वाचताना आपण ग्रंथदालनाचा कादंबरीरूपी इतिहास वाचत असल्याची जाणीव होते. फ्रिस सतराशे सालापासून ते आताच्या अमेरिकी ग्रंथदालनांचे उत्खनन करताना अर्वाचीन काळातील वाचन-खानेसुमारीच्या परिस्थितीशी लेखनाला जोडतात. त्यांनी मिळविलेल्या आकडेवारीनुसार १९५८ सालातील सर्वेक्षणात ७२ टक्के अमेरिकी नागरिक आपल्या घरापरिसरातील पुस्तक दुकानांतून ग्रंथखरेदी करत. देशाच्या जनगणना कार्यालयात असलेल्या १९९३ च्या नोंदींनुसार अमेरिकेतील पुस्तक दुकानांची संख्या १३ हजार ४९९ इतकी होती. म्हणजे १९ हजार २५३ नागरिकांमागे एक पुस्तकालय. अशी बरीच अभ्यासपूर्ण माहिती यात मिळते.

द बिग बुक ऑफ ओडिया लिटरेचर

.ओडिया भाषेत गेल्या पाच दशकांत निर्माण झालेल्या साहित्यातील निवडक भाग इंग्रजीतून अन्य भाषकांपर्यंत आणि देशविदेशातील पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या पुस्तकात करण्यात आला आहे. हे भले थोरले पावणेआठशे पानी पुस्तक म्हणजे ओडिया साहित्य परंपरेतील सुमारे ६०० वर्षांतील निवडक श्रेष्ठ साहित्याचे संपादन आहे. पंधराव्या शतकापासून विसाव्या शतकापर्यंतच्या साहित्यातून निवड करून ती वाचकांपर्यंत पोहोचविण्याची कामगिरी ओडिया कवी-संपादक मनु दाश यांनी केली आहे. यात कविता, कथा, नाटक आणि निबंध असे चार विभाग आहेत. दाश यांनी ओडिया भाषेचा इतिहास थोडक्यात मांडून ओडिया साहित्य परंपरेविषयी आपली काही निरीक्षणे नोंदवली आहेत.

द इनकार्सरेशन्स

.‘भीमाकोरेगाव प्रकरणा’चा निकाल रखडला आणि तेवढा काळ १५ आरोपींना गुन्हा सिद्ध झाला नसूनही कोठडीत डांबण्याचे काम तपासयंत्रणांनी केले. हे आरोपी कोण, त्यांच्या कायदेशीर संघर्षाची स्थिती काय, याबद्दलचे हे पुस्तक आहे. ‘द इनकार्सरेशन्स : बीके -१६ अँण्ड द सर्च फॉर डेमॉक्रसी इन इंडिया’ या अल्पा शहा यांच्या पुस्तकात या प्रकरणातील १६ आरोपींच्या भूतकाळाचा माग घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यांच्यावर बंदी घालण्यात आलेल्या माओवादी संघटनेचे सदस्य असल्याचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. मोदींची हत्या करण्याच्या कटाचा आरोप हा केवळ खटला अधिक जोरकस करण्यासाठी आहे का, यावरही पुस्तकात मत मांडण्यात आले आहे.

सेफकीप

.सेफकीप याएल वॅन डर वाउडन यांची ‘सेफकीप’ ही कादंबरी घडते नेदरलँड्समधल्या एका छोट्या गावात, १९६० च्या दशकाच्या सुरुवातीला. दुसरे महायुद्ध संपून गेल्याला आता काही काळ उलटला आहे; पण युद्धाच्या खाणाखुणा शिल्लक आहेत. समाजवास्तवाचा तो एक न पुसला जाणारा भाग झाला आहे. त्यानंतर व्यवहार पूर्ववत होत गेले आहेत, पण काळाने केलेल्या जखमा पूर्णपणे भरून आलेल्या नाहीत. कादंबरीचा आवाका ज्या सामाजिक आणि राजकीय चित्राकडे निर्देश करतो, ते प्रचंड आहे. ते काय आहे आणि त्याचा विस्तार केवढा हे आपल्या लक्षात येते तेव्हा या कादंबरीची भेदकता आपल्यापर्यंत पोचते. मग ती केवळ एका घराची, किंवा त्यात अडकलेल्या दोन माणसांची कथा उरत नाही, तर तिला एक वैश्विक संदर्भ प्राप्त होतो.

दैव

.पुराणकथांमध्ये उल्लेख असलेल्या देवतांची ख्याती जशी सर्वदूर पोहोचली, तशी रानावनात राहणाऱ्या समाजाच्या दैवतांची माहिती पोहोचली नाही. अशा दैवतांची अधिष्ठाने ही मूलत: नैसर्गिक तत्त्वांना जोडलेली असतात. काही वेळा ती उग्रही भासतात. के. हरी कुमार यांचे ‘दैव : डिस्कव्हरिंग द एक्स्ट्राऑर्डिनरी वर्ल्ड ऑफ स्पिरिट वर्शिप’ हे पुस्तक अशा देवता, त्यांच्या अनुषंगाने रूढ झालेल्या चालीरीती या संदर्भात माहिती देते. कर्नाटकातील किनारपट्टीचा भाग आणि केरळमधील कासरगोड या जिल्ह्यांत तुळू भाषा बोलणारे, वेगवेगळ्या ‘दैवां’चं पूजन करणारे लोक इथे आढळतात. के. हरी कुमार यांनी या परंपरेचे केलेले अध्ययन, अभ्यासकाळात आलेला अनुभव ‘दैव’ या ग्रंथाद्वारे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

बुकरायण

बुकर पारितोषिकाची लघुयादी जाहीर झाल्यापासूनच्या ठळक घडामोडींचा लेखाजोखा लोकसत्ताने दरवर्षीप्रमाणेच यंदाही घेतला. बुकरायण या सदरातून पर्सिव्हल एव्हरेट यांचे ‘जेम्स’, अॅन मिशेल यांचे ‘हेल्ड’, रॅशेल कुशनर लिखित ‘क्रिएशन लेक’ , शार्लोट वुड यांनी लिहिलेले ‘स्टोन यार्ड डिव्होशनल’, समंथा हार्वे यांचे ‘ऑर्बिटल’ इत्यादी पुस्तकांशी वाचकांची ओळख करून देण्यात आली. यापैकी ‘ऑर्बिटल’ या पुस्तकाला बुकर पारितोषिकाने सन्मानीत करण्यात आले.