‘तुम्ही अख्ख्या जगाला तुच्छच लेखता काय?’ हा आक्षेप धारदार विनोदी लिखाण करणाऱ्यांप्रमाणे मार्टिन अॅमिस यांनाही सहन करावा लागला. अॅमिस यांनी गेल्याच शुक्रवारी, ७३ व्या वर्षी कर्करोगाशी झुंज अपयशी ठरून प्राण सोडला अमेरिकेत; पण जन्माने ते ब्रिटिश आणि त्यांच्या विनोदाची जातकुळीही ब्रिटिशच राहिली- म्हणजे खो-खो हसण्यापेक्षा ‘हं:’ अशी शिष्टबुद्धीची दाद मिळवणारा. मार्टिन यांचे मोठे वैशिष्टय़ असे की, त्यांनी अशा विनोदबुद्धीचा वापर स्फुटलेखन वा कथांसाठी न करता कादंबऱ्या लिहिल्या.. पहिल्या दोन-तीन कादंबऱ्या तर ब्रिटनपुरत्याच राहिल्या.. अमेरिकी वाचकांना त्या अजिबात आपल्या वाटल्या नाहीत. दुसऱ्या कादंबरीचे स्वागत ब्रिटनमध्ये होऊनही, अमेरिकेत प्रकाशक मिळण्याची भ्रांत! पहिल्या ‘द रॅशेल पेपर्स’ (१९७३) या कादंबरीत विशीचा तरुण आपल्या ‘प्रेम’ (- हं:) प्रकरणाची सांगोपांग कथा सांगतो. १९७५, ७८ आणि ८१ मधल्या त्याच्या कादंबऱ्यांचे स्वागत यथातथाच होत असताना चित्रपटांच्या पटकथा वगैरेंचे लेखनही मार्टिन करू लागले होते. त्या अनुभवावर आधारलेली १९८४ मधली ‘मनी’ ही कादंबरी मात्र गाजली. मग ‘लंडन फील्ड्स’ आणि ‘टाइम्’स अॅरो’ या कादंबऱ्या १९९१ पर्यंत आल्या, त्यांना बुकर पारितोषिकाने जरी कधी पहिल्या तर कधी दुसऱ्या यादीत हुलकावण्या दिल्या तरी ‘सॉमरसेट मॉम पारितोषिक’ मार्टिन प्रथितयश झाले.. पण ते लेखकराव झाले नाहीत; उलट लेखनप्रकार बदलून स्वत:ला अस्थिर करत राहिले.. हे कसे काय जमले? ‘लेखकाचा लेखकराव झाला नाही तो का?’ असे मार्टिन अॅमिस यांनाच कुणी विचारले असते तर?
‘जन्मल्यामुळे’- असे तुटक आणि भेदिक उत्तर मार्टिन यांनी कदाचित दिले असते! त्यातील तथ्य असे की, वडील किन्स्ले अॅमिस हेही लेखक होते आणि युरोप-अमेरिकेतील विविध विद्यापीठांत किन्स्ले यांना व्याख्यातेपद मिळत गेल्याने त्यांचे बिढार दरवर्षी हलत असे. मार्टिनला दरवर्षी नवी शाळा, इंग्रजी बोलण्याचे नवे हेल, नवनवीन कंटाळवाणे वर्ग आणि वर्गबंधू, हे सारे टिपता येत असे. टिपण्याची हातोटी लहानपणापासून अत्युच्चच असणार, हे पुढे पंचेचाळिशीनंतर त्यांनी काही साहित्यिक मित्र आणि जॉन अपडाइकसारखे काही थोर लेखक यांच्या केलेल्या समीक्षेतून जगाला पटले. तोवर मार्टिन अॅमिस यांच्याच कादंबऱ्यांवर लोकांनी, ‘लेखकाची निरीक्षणशक्ती दाद देण्याजोगी असली तरी, शैलीच्या गदारोळात कथावस्तू (कुठे तरी) हरवते’ छापाची परीक्षणे लिहून टाकली होती. शैलीकार हा शिक्का पन्नाशी उलटल्यावरही पिंगा घालत होता. ते शैलीकार खरे, पण लेखक म्हणून जन्मावेच लागते हे त्यांना अनुभवान्ती पटले होते. मिसरूड फुटल्यापासून वडिलांशी फटकूनच वागणारे मार्टिन नव्या भाषेच्या शोधात असल्यामुळे ही शैली घडली होती. अशा भेदिक अर्थाने लेखक म्हणून ‘जन्मल्यामुळे’, आजन्म लेखकच राहू शकण्यासाठी धोपटपाठ (क्लीशे) टाळायचे असतात, हेही त्यांना उमगले. ‘द वॉर अगेन्स्ट क्लीशे’ हे त्यांचे पुस्तक वाचनीय ठरते, ते या अनुभवाच्या खरेपणामुळे.