तत्त्वज्ञान आणि मानसशास्त्र हे विषय घेऊन पदवी मिळवणारा, लिखाणात बरा असणारा पण स्वत:चे काही लिहिण्याऐवजी बहुतेक काळ एका स्थानिक राजकीय नेत्यासाठी पडलेखक (घोस्ट रायटर) म्हणून काम करणारा.. अशा माणसाला साधारणत: सभ्यपणे ‘सरळमार्गी आणि निरुपद्रवी’ म्हटले जाते आणि स्पष्टच बोलावे तर ‘शामळू’ अशी त्याची संभावना होत राहते.. पण डेव्हिड कर्क हे तत्त्वज्ञान आणि मानसशास्त्रात पदवी मिळवून आणि पडलेखक म्हणून राजकीय नेत्यासाठी काम करूनसुद्धा अजिबात शामळू नव्हते. किंबहुना अतीच धाडसी होते. ‘आधुनिक पद्धतीने पहिली बंगी (बंजी)-जम्प घेणारा माणूस’ म्हणून त्यांची नोंद झाली, ती याच अतिधाडसी वृत्तीमुळे. काही श्रीमंत मित्रांना भरीस घालून ‘द डेंजरस स्पोर्ट्स क्लब’ असे अत्रंगांचे मंडळच या डेव्हिड कर्क यांनी काढले होते आणि त्या मंडळातर्फे अनेक अचाट आणि जिवावर बेतणारे उपक्रमही त्यांनी घडवून आणले होते. हे डेव्हिड कर्क वयाच्या ७८ व्या वर्षांपर्यंत- मोडून पुन्हा सांधलेली हाडे चालती ठेवून- व्यवस्थित जगले आणि आठवडय़ाभरापूर्वी वारले, तेव्हा या अत्रंग माणसाबद्दल ब्रिटनप्रमाणेच अमेरिकेतील वृत्तपत्रांनीही मृत्युलेख लिहिले..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> व्यक्तिवेध: गीव्ह पटेल

काय एवढे केले हो या डेव्हिड कर्क यांनी? कधी कांगारूच्या आकाराच्या मोठय़ा फुग्याच्या आतल्या पोट-पिशवीत बसून, या कांगारूला हेलियमचे उडते फुगे बांधून इंग्लिश खाडी ओलांडण्याचा प्रयत्न करणे, कधी स्वित्झर्लंडच्या बर्फात ‘स्कीइंग’ करण्याऐवजी त्या बर्फाळ उतारावरून जत्रेतल्या भुई-चक्रात असतो तसा लाकडी घोडा ताबडवत नेणे, आणखीच अचाट म्हणजे, स्पेनमधल्या पाम्प्लोना गावातून ज्या दिवशी बैलांना गावभर सुसाट पळवतात त्याच दिवशी त्या गावात ‘स्केटबोर्ड’वरून फेरफटका मारायचा! हे सारे प्रकार डेव्हिड कर्क यांनी आधी स्वत: केले, मग त्यांच्या त्या क्लबातल्या मित्रांनाही करायला लावले. ‘पहिल्यावहिल्या आधुनिक बंगी जम्प’ची कथाही अशीच.. ब्रिस्टॉलच्या अ‍ॅव्हॉन नदीवरल्या झुलत्या पुलाच्या मध्यावरून ही उडी मारण्यात आली. वानाटू या कॅरिबियन बेटावरील एका आदिवासी जमातीतील मुलगे आणि पुरुषांना अशी उडी (अर्थात दोरीऐवजी झाडाच्या मुळांना पाय बांधून) मारावी लागते, हे कुठेतरी वाचल्यावर डेव्हिड यांना या उडीची प्रेरणा मिळाली. पण दोर मात्र त्यांनी इलास्टिकचा वापरला. युद्धनौकांवरून युद्धविमानांना त्वरण देण्यासाठी अशा दोरांचा वापर केला जात असे. त्याच्या साह्याने उडी मारलेले डेव्हिड पुन्हा वर आले, तेव्हा मित्रांच्या जिवात जीव आला. पोलीस आले- अखेर ‘उडी मारणेस मनाई’साठी कायदा करावा लागला! याच स्थितीस्थापक दोराचा वापर करून एकदा फक्त वर जाण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता, तेव्हा मात्र ते इतके सपाटून आपटले की तीन मणके मोडले होते. आर्नोल्ड पॉटर यांच्या सात मुलांपैकी डेव्हिड एक, पण भावंडांशी संबंध न ठेवता ते आईचे माहेरचे आडनाव लावू लागले. पण या कुटुंबजीवनाबद्दल कधी बोलावेच लागू नये, इतके मित्र जगभरच्या किमान ४० देशांमध्ये त्यांनी जोडले. जिंकण्यासाठी सगळेच खेळतात.. मी स्वत:ला अजमावण्यासाठी खेळतो, हे तत्त्व जपणाऱ्या या कलंदराला पुरस्कारांची नव्हे, पण लोकांची दाद मिळत राहिली होती.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Information about david kirke founder of dangerous sports club zws