एका परकी सिनेउद्योगात गाणी लिहिणाऱ्याविषयी आपण का वाचावे? आपली चित्रगाणी तर पूर्वापारपासून समृद्ध तरल वारसाच घेऊन आलेली आहेत की! साठच्या दशकात मानवजातीच्या भावभावनांतील सूक्ष्मतम कल्लोळाला पकडणाऱ्या गीतरचना होऊन गेल्या आणि त्यांना ‘दैवी’ वगैरे सुरांनी सजवून-धजवून मांडले गेले. अशात वॉल्ट डिस्नेच्या चित्रपटांना गाणी लिहिणाऱ्या रिचर्ड शेरमन या गीतकाराच्या निधनाचे तरी आपल्याला काय दु:ख? पण ‘मेरी पॉपिन्स’ या चित्रपटातील गीतासाठी आपल्या भावासह ऑस्कर पटकाविणाऱ्या आणि पुढे चित्रपट-टीव्ही मालिकांमधील गाणी सजविणाऱ्या शेरमन यांची कित्येक गाणी लोकप्रिय आहेत. ती आपल्या भारतदेशातील कानाकोपऱ्यांत जागतिक दर्जाची गाणी पोहोचविण्याचा विडा उचलणाऱ्या शर्विलक संगीतकारांद्वारे झिरपलेलीदेखील आहेत.
हेही वाचा >>> व्यक्तिवेध: श्रीनिवास रा. कुलकर्णी
उदाहरणार्थ मेरी पॉपिन्स चित्रपटातील ‘चिम चिमनी चिम चिमनी’ हे गाणे ‘हम तुम हम तुम हम तुम मिलते रहे’ (चिम चिमनी शब्दांसह) ‘घूंघट’(१९९७) नामक सुपर-ड्युपर-फ्लॉप सिनेमात वाजले आहे. मात्र या चित्रपटातील गाणी त्या वर्षीच्या उत्तम गाण्यांमध्ये होती. (घुंघट मे चेहरा आपका हे हरिहरन यांनी उप-अजरामर केलेले गीतही यातलेच, पण ते शेरमन यांच्याशी संबंधित नाही) नव्वदीतली दूरदर्शन पाहणारी एक अख्खी पिढी ‘विनी द पू’ या कार्टूनमधील ‘उठो राजा, उठो रे भाई, दोस्तने आवाज लगायी’ या शीर्षकगीताशी परिचित आहे. ते शेरमन यांच्या मूळ गाण्याचे उत्तम हिंदी भाषांतर आहे. न्यू यॉर्कमध्ये १९२८ साली जन्मलेल्या रिचर्ड यांचा जन्म हॉलीवूडसाठी गाणी लिहिणाऱ्या कुटुंबात झाला. पैकी रिचर्ड यांचा मोठा भाऊ रॉबर्ट याला कादंबरीकार व्हायचे होते आणि रिचर्ड यांना गाणीच लिहायची होती. बासरी-पिकॅलो (छोटी बासरी) आणि पियानो यांत पारंगत असलेल्या रिचर्ड यांनी अमेरिकी लष्कराच्या बॅण्ड पथकातही काही वर्षे काम केले.
हेही वाचा >>> चिप-चरित्र: नवसंजीवनीच्या शोधात अमेरिकी चिप-उद्योग
गीतकार वडिलांनी या दोन भावांना एक गाणे लिहिण्याचे आव्हान दिले. त्यातून या गीतकारद्वयीचा जन्म झाला. त्यांची गाणी ऐकून वॉल्ट डिस्ने यांनी त्यांना करारबद्ध केले. पुढे डिस्नेच्या बहुतांश प्रकल्पांमध्ये हे बंधू गीतकार म्हणून झळकले. जंगल बुक (सिनेमा) ॲरिस्टोक्रॅट्स, चिटी चिटी बँग बँग यांमधील त्यांची गाणी अमेरिकेतील दोन-तीन पिढ्यांच्या गत-कातरतेशी संबंधित आहे. त्यांच्यावर लघुपट बनविले गेले. मेरी पॉपिन्स चित्रपटाच्या निर्मितीची पार्श्वभूमी असलेल्या ‘सेव्हिंग मिस्टर बँक्स’ या चित्रपटात रिचर्ड यांची व्यक्तिरेखा जेसन श्वार्ट्समन याने वठविली आहे. या गीतकारद्वयीपैकी एकाने दशकापूर्वी जगाचा निरोप घेतला होता. मागे राहिलेले रिचर्ड या आठवड्यात निवर्तले. मात्र गत-कातरतेच्या कित्येक गीतखुणा ठेवून. देशी शर्विलक संगीतकारांनाच देव्हाऱ्यात बसविण्याइतपत ‘कानांध’ नसाल, तर रिचर्ड यांच्या गाण्यांचा आस्वाद घेताना आनंदच मिळेल.