भारतीय अभिजात संगीताच्या विश्वात तालवाद्यांचे महत्त्व अनन्यसाधारण! ध्रुपद शैलीतील गायनात पखावज वाद्याची संगत होत असे. नंतरच्या काळात या वाद्याने आपला तोरा कायम राखला आणि ते संगीताच्या मैफलीतील महत्त्वाचे वाद्य म्हणून ओळखले जात राहिले. पंडित भवानीशंकर यांनी या वाद्यावर कमालीचे प्रभुत्व मिळवले आणि त्यामुळे हे वाद्य कालबाह्य न होता, संगीताच्या दरबारात सतत झळकत राहिले. भवानीशंकर यांचे वेगळेपण असे, की ते गायक, वादक आणि नर्तक यांना प्रोत्साहित करत. कलावंताच्या सर्जनाचा अंदाज घेत त्याला पुढे जाण्यासाठी तरलपणे सूचन करण्याची हातोटी त्यांच्याकडे होती. त्यामुळे गायक-वादकांना त्यांची साथसंगत नेहमीच आश्वासक वाटत असे. अतिशय दिलखुलास व्यक्तिमत्त्वाच्या या कलावंताने जगभर प्रवास करत या वाद्याची लोकप्रियता वाढवत नेली.
हेही वाचा >>> संविधानभान : मांदेनचा जाहीरनामा
पखावज, मृदुंग, तबला या तालवाद्यांमध्ये गेल्या काही शतकांत तबल्याचे महत्त्व वाढत राहिले. गायन-वादन आणि नर्तन या कलाप्रकारातील लयीची संगत करण्यासाठी तबल्याला प्राधान्य मिळत गेले. त्याची लोकप्रियताही वाढत गेली. अशा काळात पखावज या पारंपरिक वाद्याची झळाळी कायम ठेवणाऱ्या कलावंतांमध्ये भवानीशंकर यांचे नाव अग्रस्थानी होते. मैफलीतील त्यांची उपस्थिती आणि प्रसन्न मुद्रा यामुळे ते सर्वच कलावंतांचे आवडते संगतकार ठरले. वयाच्या पाचव्या वर्षांपासून तालवाद्याचे धडे घेण्यास सुरुवात करत, भवानीशंकर यांनी त्या वाद्यावर कमालीची हुकूमत मिळविली. लयीच्या सर्जनाचे नवनवे प्रयोग केले. पखावज या वाद्याच्या धीरगंभीरतेला साजेशा वादनामुळे त्याचे वेगळेपण सतत जाणवत राहिले. भारतीय अभिजात संगीत आणि जागतिक संगीतातील तालवाद्याचे स्थान लक्षात घेत भवानीशंकर यांनी फ्युजन प्रकारातही आपली छाप उमटवली.
हेही वाचा >>> व्यक्तिवेध: डॉ. नितीन करीर
दोन भिन्न संगीतशैलींच्या या संकरामध्ये पखावजसारख्या वाद्यालाही महत्त्वाचे स्थान मिळवून देण्यासाठी या वाद्याच्या क्षमता रुंदावण्याचे कौशल्य असणारे भवानीशंकर यांच्यासारखे कसलेले वादकच उपयोगी ठरू शकतात. पाश्चात्त्य संगीताच्या विश्वातही त्यांचे नाव झळकत राहिले, ते त्यांच्या फ्युजनमधील कुशलतेमुळे. ग्रॅमी पुरस्कारासाठी त्यांचे नामांकन झाले, ते त्यांच्या फ्युजनमधील कामगिरीमुळेच. भारतीय संगीतातील तालाचे आणि लयीचे महत्त्व वादनातून प्रतीत करू शकणारे कलावंत म्हणून ते नावाजले गेले. वाद्य, वादन आणि नृत्य यामध्ये पखावजच्या साथीने वेगळाच रंग भरण्यात भवानीशंकर यांची हातोटी वाखाणण्यासारखी होती. पखावजचा घुमारा संगीतमय करण्याची जादू त्यांच्या बोटांमध्ये होती. त्याबरोबरीने त्यांची प्रतिभाही त्यात मिसळत राहिल्याने ते एक सिद्ध कलावंत ठरले. त्यांच्या निधनाने पखावज या वाद्यावरील त्यांची ओळख असणारी ‘थाप’ थांबली आहे.