प्रा. हरी नरके म्हणजे एक व्यक्ती नव्हे, तर एक चालतीबोलती संस्थाच होते, हे त्यांच्या आजवरच्या कार्यकर्तुत्वाकडे एक नजर टाकली असता, आवर्जून लक्षात येते. आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीतील महात्मा जोतिबा फुले यांचे कार्य संशोधनातून मोठय़ा कष्टपूर्वक अधोरेखित करणे हे त्यांचे योगदान अपूर्व म्हणावे असेच आहे. केवळ मुलींच्या पहिल्या शाळेचे संस्थापक यापलीकडे जोतिबा फुले यांचे अनेक पातळय़ांवरील कार्य तेवढेच महत्त्वाचे आणि उत्थानाचे होते, याचे भान नरके यांना अगदी तरुणपणीच आले होते. त्यामुळे आपले सारे आयुष्य समाजात विधायक बदल घडवून आणणाऱ्या समाजसुधारकांच्या कार्याचा अभ्यास करण्यासाठी आणि ते कार्य ग्रंथरूपाने समाजासमोर आणण्यासाठी उपयोगात आणण्याचे त्यांनी ठरवले आणि तसेच ते जगले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रा. हरी नरके यांच्या या कामाला अनेक पातळय़ांवरून मिळालेला प्रतिसाद त्यांना पुढील कार्यासाठी मदत करणारा ठरला. लेखनाबरोबर उत्तम वक्तृत्व असल्यामुळे नरके गेली किमान तीन दशके महाराष्ट्रभर फिरत राहिले आणि समाजसुधारकांचे काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी झटत राहिले. ‘महात्मा फुले – शोधाच्या नव्या वाटा’ हे त्यांचे पुस्तक त्यांच्या संशोधक वृत्तीचे महत्त्वाचे उदाहरण आहे. फुले-आंबेडकर या द्वयीचे विचारधन संकलित करून त्याबद्दलचा एक कोश सिद्ध करण्याची त्यांची योजना होती. त्यासाठी त्यांनी अथक परिश्रमाने साधने गोळा करायलाही सुरुवात केली होती. हे काम प्रचंड आहे, याची कल्पना असल्याने, त्यासाठी मिळेल तेथून साधने जमा करण्यासाठी ते सतत प्रयत्नशील होते. अभ्यासाच्या या महत्त्वाच्या विषयांबरोबरच मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. मराठी ही संस्कृत, कन्नड, तेलुगू या भाषांप्रमाणेच अभिजात असल्याचे संशोधन करण्यासाठी रंगनाथ पाठारे यांच्या अध्यक्षतेखालील समितीचे ते समन्वयक होते.

या समितीने तयार केलेल्या अहवालासाठी नरके यांनी खूप कष्ट घेतले. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले. राज्यातील अनुसूचित जाती-जमाती, अन्य मागासवर्गीय याबाबत त्यांचा विशेष अभ्यास असल्यामुळे, या सगळय़ांच्या मागण्या, त्यांची सामाजिक-आर्थिक परिस्थिती याचा अभ्यास नरके यांनी केला. या आयोगाला सरकारकडे शिफारशी करण्याचा अधिकार असल्याने, त्यांच्या या अभ्यासाचा आयोगाच्या कामात मोठा फायदा होत होता. आयुष्यात शिकायचे असते, याची प्रेरणाच मुळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मिळाल्याने हरी नरके यांच्या आयुष्यात त्यांचे स्थान अतिशय महत्त्वाचे होते. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या चळवळीत ओढले गेल्यानंतर झालेल्या तुरुंगवासात विचारवंतांच्या सहवासात महात्मा फुले यांचे कार्य, त्याचे महत्त्व याच्याशी परिचय झाल्यानंतर नरके यांनी तोच आपल्या अभ्यासाचा विषय निवडला आणि त्यामध्ये अक्षरश: जीव ओतून काम केले. त्यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या संशोधन आणि अभ्यासाच्या क्षेत्रातील एक महत्त्वाची व्यक्ती हरपली आहे.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Information about prof hari narke life zws
Show comments