अपारंपरिक ऊर्जा क्षेत्र आणि त्यातील उज्ज्वल संधींबाबत आज जगभरात सर्वत्रच बोलबाला आहे. देशातील सर्वच बडी उद्योग घराणी मोठमोठय़ा गुंतवणूक नियोजनासह या क्षेत्रावर सध्या बाजी लावून आहेत. मात्र अडीच-तीन दशकांपूर्वी स्वच्छ-हरित ऊर्जेचे स्वप्न उराशी बाळगून ते प्रत्यक्ष साकारण्याची धमक दाखविली ती तुलसी आर. तांती यांनी. काळाच्या किती तरी पुढे पाहण्याच्या त्या झपाटलेपणाची पुरेपूर ‘किंमत’ही त्यांना मोजावी लागली. पवन ऊर्जेच्या क्षेत्रात सुझलॉन एनर्जी ही भारतात पुण्यात मुख्यालय असलेली जागतिक कंपनी त्यांनी साकारली आणि ध्येयासक्तीने कोणता चमत्कार घडू शकतो याचा प्रत्ययही दिला. पुण्याच्या सीमेवरील ‘वन अर्थ’ या मुख्यालयाच्या चित्ताकर्षक संकुलात पत्रकारांशी बोलताना, ‘वर्ष दोन-वर्षांत सुझलॉन ही जगातील पवन ऊर्जा क्षेत्रातील सर्वात मोठी व नफाक्षम कंपनी बनेल, पाहा..’ असे तांती तडफेने सांगायचे. हे सांगण्याचा प्रसंग एकदा नव्हे तर, २०११, २०१४, २०१९ असा प्रत्येक तीन-चार वर्षांच्या अंतराळात वारंवार त्यांच्यावर आला. पण प्रत्येक वेळी ते तितक्याच प्रांजळतेने व निर्धारपूर्वक बोलताना अनेकांनी पाहिले असतील. आता मागे वळून पाहायचे नाही.. वाईट काळासह सर्व समस्याही आता इतिहासजमा होतील, अशा जोमानेच त्यांचे वादळी दौरे आणि बैठका अगदी शेवटच्या श्वासापर्यंत सुरू होत्या.

सुरुवात वस्त्रोद्योगापासून करणाऱ्या तांती यांनी उत्पादनासाठी येणारा विजेचा खर्च खूपच जास्त असल्याचे लक्षात आल्यावर, स्वस्त, पर्यायी विजेच्या शोधातून १९९५ मध्ये सुझलॉन या कंपनीला जन्म दिला. अल्पावधीत भारतातील पवन ऊर्जा उद्योगातील अग्रगण्य कंपनी आणि दशकभरानंतर, जगातील अव्वल पाच पवनचक्क्या उत्पादकांमध्ये तिने स्थान मिळविले. वेगाने पावले टाकत जग पादाक्रांत करण्याची धडाडी जोखीमयुक्त पण जगाला हेवा वाटावी अशी होती. जागतिक विंड टर्बाइन उत्पादक जर्मन कंपनी ‘आरई पॉवर’चे २००७ मधील त्यांनी केलेले संपादन तर संपूर्ण जगाला धडकी भरवणारे होते. पण काळाची पावले उलटी पडू लागली, २००८ सालच्या जागतिक अरिष्टाने संपूर्ण व्यापारचक्रच उलटेपालटे केले. भारताअंतर्गत मात्र वेगळीच आव्हाने होती. आधीच दिवाळे वाजलेल्या राज्यांच्या वीज वितरण कंपन्यांनी देणी थकवली;  तर अनेक राज्यांतील सरकारेच सुझलॉनविरोधात नकारात्मक भूमिका घेऊन उभी ठाकली. व्यवसाय विस्तारासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड उत्तरोत्तर जिकिरीची बनत गेली. याचा अपरिहार्य परिणाम म्हणजे दिवाळखोरीच्या कार्यवाहीला कंपनीला २०१९ मध्ये सामोरे जावे लागले. कर्जबाजारी सुझलॉनचे अपयश हे खरे तर देशाच्या शाश्वत ऊर्जेच्या महत्त्वाकांक्षी नियोजनाचे अपयश ठरले असते. धनको व कर्जदात्या बँकांच्याही हे ध्यानात आले. संपलेच सारे काही.. असे वाटत असतानाच पुन्हा उसळी मारून झेप घेतल्याचे प्रसंग एका व्यक्तीच्या आयुष्यात इतक्यांदा येतात हेच खरे तर अतीव नवलाचे. कंपनीला तोटय़ातून नफ्यात आणण्याचा कायापालट त्यांनीच चालू वर्षांत घडवून दाखविला. कर्ज ओझे कमालीचे कमी करीत जून २०२२ अखेर ३,२७२ कोटींवर आणले गेले. ते आज नसले तरी, कंपनीने योजलेली हक्कभाग विक्रीची आणि त्यायोगे १,२०० कोटी रुपये उभारण्याची योजना नियोजित वेळापत्रकाप्रमाणे पार पडणार असल्याचेही दिसत आहे. वाऱ्याच्या वेगाचाच शक्ती म्हणून वापर करणाऱ्या तुलसी तांती यांनीही मग कायम वादळाची स्वारी करणे हे केवळ क्रमप्राप्तच आणि ओघाने होतही राहिले. पण अशा स्वारीसाठी काळ जेव्हा अनुकूल बनला तेव्हा ते आपल्यात नाहीत, हे दु:खदच!

Prices will increase due to reduced arrival of chillies Nandurbar news
यंदा लाल तिखटाचा भडका उडणार; मिरचीची आवक घटल्याने दर वाढणार
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
red sanders smuggling
Pushpa Box Office Collection : चंदन तस्करीवर बेतलेल्या ‘पुष्पा’नं कमवले १५०० कोटी; पण खऱ्याखुऱ्या रक्तचंदनाला मात्र ग्राहकच नाही
honda and nissan merging plan
बड्या जपानी मोटारकंपनीला घरघर… होंडा-निस्सानने विलिनीकरणचा पर्याय का निवडला?
Onion auction in Solapur stalled for four days due to Mathadi protest
माथाडींच्या आंदोलनामुळे सोलापुरात चार दिवस कांदा लिलाव ठप्प
nashik Angry farmers protested on Manmad Yewla Road halting auction due to falling onion prices
येवला बाजार समितीत शेतकऱ्यांकडून लिलाव बंद, मनमाड रस्त्यावर ठिय्या
How harmful is the destruction of the cypress forests on the Vasai and Palghar coasts for the environment
वसई, पालघर किनाऱ्यावरील सुरूची वनराई नष्ट होणे पर्यावरणासाठी किती हानीकारक?
Vasai Municipal corporation action against unauthorized construction begins
अनधिकृत बांधकामावर पालिकेची कारवाई सुरू
Story img Loader