‘मेलँकली’चा इंग्रजी-मराठी शब्दकोशांतला अर्थ विषाद, विषण्णता असा दिला जातो, पण मेलँकलीचा अनुभव स्पष्ट व्हायचा असेल तर ‘पाकीज़ा’ चित्रपटातल्या ‘चलते चलते..’ या गाण्याआधी वाजणारे किंवा देव आनंदच्या ‘काला पानी’मधल्या ‘हम, बेखुदी में तुम को पुकारे चले गए’च्या मधल्या तुकड्यांतून भिडणारे सारंगीचे स्वर ऐकायलाच हवे. पं. रामनारायण यांनी हे सारंगीचे आर्त फिल्मी गाण्यांमधून श्रोत्यांपर्यंत पोहोचवलेच; पण पुढे सारंगी या साजिंद्यांपुरत्याच वाद्याच्या ‘एकल वादना’चे कार्यक्रम भारतासह अनेक देशांत करणारे ते पहिले ठरले. वयाच्या ९६ व्या वर्षी, परवाच्या शनिवारी हे जग सोडताना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार (१९७५), पद्माश्री (१९७६), पद्माभूषण (१९९१), पद्माविभूषण (२००५), यांपेक्षाही ५०० हून अधिक शिष्यांच्या स्वरश्रीमंतीचे समाधान त्यांना होते.
हेही वाचा >>> व्यक्तिवेध: रवींद्र आपटे
‘पं. रामनारायण’ याच नावाने १९४३ पासून ऑल इंडिया रेडिओच्या लाहोर केंद्रावर कारकीर्द सुरू करणाऱ्या या कलावंताचे आडनाव बियावत. त्यांच्या घराण्यात संगीत होते, पण सारंगीला तेव्हा शास्त्रीय दर्जा नव्हता. त्यामुळे घराणेदार शास्त्रीय संगीत मात्र घराबाहेरच त्यांना शिकावे लागले. हे प्राथमिक संस्कार किराणा घराण्याचे होते आणि गायकीचे होते. परंतु वडील केवळ कीर्तनांच्या साथीला वाजवत असलेली सारंगी रामनारायण यांनी त्या काळात गाजणाऱ्या संगीताच्या ‘कॉन्फरन्स’मध्ये आणली. आमीरखाँ यांच्यापासून हिराबाई बडोदेकरांपर्यंत अनेकांना साथ केली. मूळचे उदयपूरनजीकच्या अम्बरचे, मग लाहोर, फाळणीकाळात आधी दिल्लीला, लगेच १९४९ मध्ये मुंबईत आणि कमाईचे साधन म्हणून चित्रपटांकडे त्यांचा प्रवास झाला. पण १९६० च्या दशकापर्यंतच त्यांची सारंगी फिल्मी गाण्यांमध्ये वाजली (‘उमराव जान’च्या गाण्यांमधली तितकीच उत्कृष्ट सारंगी, त्यांच्यानंतरचे मोठे सारंगिये सुलतान खान (जन्म १९४०- मृत्यू २०११) यांची आहे.)
हेही वाचा >>> अन्वयार्थ: ‘हिताचा’ निकाल…
साथीच्या वाद्याने फक्त गायकाच्या ताब्यात राहायचे, हा काळ पालटण्यासाठी ज्या वादकांचा स्वाभिमान उपयुक्त ठरला, त्यांमध्ये रामनारायण यांचे नाव मोठे. साठच्या दशकात म्हणे त्यांनी ठरवून टाकले- साथ करायचीच नाही! सतारवादक पं. रविशंकरांचा ‘आदर्श ठेवून’ नव्हे, तर मनोमन त्यांच्या स्पर्धेतच उत्तरून सारंगीवरही आलाप- जोड- झाला- गत सारे काही श्रवणीयच असते; भूपापासून भैरवीपर्यंत आणि मारव्यापासून मालकंसापर्यंत साऱ्या रागांची तिन्ही लयींत मांडणीही सारंगी करू शकते, हे त्यांनी जगाला दाखवून (किंवा ऐकवून!) दिले. कॅनडात राहणाऱ्या, आता साठीतल्या त्यांच्या कन्या अरुणा या पहिल्या महिला सारंगीवादक म्हणून ओळखल्या जातात, पण ‘माझ्यासाठी सारे शिष्य सारखेच’ म्हणणाऱ्या रामनारायण यांनी सारंगीचेच पालनपोषण अधिक सार्थपणे केले.