‘आयर्न मॅन’ या चित्रपटातल्या अब्जाधीशाचे प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेता रॉबर्ट डाऊनी जुनिअरने साकारलेले ‘टोनी स्टार्क’ हे पात्र आठवत असेलच! आता कल्पना करा की, असे वास्तवातले टोनी स्टार्क आपल्या आसपास जगात वावरत आहेत. ते बंदुकांपासून ड्रोन्स, क्षेपणास्त्रे, आधुनिक लढाऊ विमानांचा व्यापार करताहेत. जगात कुठे युद्धे चालू असतील तरच यांची पोटे भरतात. अशा परिस्थितीत स्वत:चे उखळ पांढरे करण्यासाठी हे वास्तवातले टोनी स्टार्क नवीन संघर्ष चालू होण्यास प्रोत्साहन देतात, अस्तित्वात असलेले संघर्ष चिघळवतात तर कधी त्यांच्या देशांना दुसऱ्या देशावर आक्रमण करण्यासाठी भाग पाडतात. अमेरिकेची लॉकहीड मार्टीन, रेथिओन, जनरल डायनॅमिक्स, रशियाची रोस्टेक, चीनची नॉरिंको, स्वीडनची साब, फ्रान्सची दसौ एव्हिएशन, जपानची मित्सुबिशी ही जगभर पसरलेल्या खासगी संरक्षण उत्पादकांची काही नावे! शस्त्रांना मागणी असेल तर नवीन संशोधन आकारास येईल आणि या खासगी कंपन्यांची तिजोरी भरली तर ते सत्ताधाऱ्यांना निधीच्या स्वरूपात आशीर्वाद देतील अशी काहीशी आकारास आलेली राज्यव्यवस्था! आणि, अब्जावधी डॉलर्सची घडामोड होत असेल तर तिसऱ्या जगातील काही हजार जीव गेले तर काय फरक पडतो? हा यांचा साधा-सोपा विचार! यामुळे भूराजकीय संघर्षाचा भडका उडण्यापेक्षा नियंत्रित आचेवरील त्यांचे लटकणे हे तंत्रज्ञानाच्या विकासानंतर खासगी कंपन्या, राजकीय आणि लष्करी लागेबांधे या सर्वांच्याच सोयीचे झाले आहे.
लष्करी-औद्याोगिक संकुल
लष्करी-औद्याोगिक संकुल (मिलिटरी- इंडस्ट्रिअल कॉम्प्लेक्स – एमआयसी) हा शब्द एखाद्या राष्ट्राच्या सैन्य, संरक्षण कंत्राटदार आणि राज्यसंस्था यांच्यातील शक्तिशाली युतीबद्दल वापरला जातो. १९६१ मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ड्वाइट आयसेनहॉवर यांनी हा शब्दप्रयोग सर्वप्रथम केला तेव्हा त्यांचा हेतू त्यामागचे धोके उलगडण्याचा होता. ‘एमआयसी’ आता फक्त रणगाडे, लढाऊ विमाने आणि क्षेपणास्त्रे यांच्या उत्पादनापुरते मर्यादित नाही. ते कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), स्वयंचलित प्रणाली आणि विदा-आधारित युद्धतंत्रावर बहरत आहेत. यामुळे युद्धाचे एकमेव स्थापत्यकार असलेली सरकारे आता खासगी कंपन्यांवर केवळ शस्त्रांसाठीच नव्हे, तर आधुनिक संघर्षाला पाठबळ देणाऱ्या माहिती आणि तंत्रज्ञानासाठीही अवलंबून आहेत. हा बदल जागतिक शक्तिसंतुलन बदलत आहे, राज्यांचे सार्वभौमत्व कमी करत आह. यामुळे युद्ध हा नफ्याचा व्यवसाय बनतोआहे.
शीतयुद्धाच्या काळात महाशक्तींच्या संघर्षांला धार येऊन शस्त्रास्त्र स्पर्धा धारदार झाली. बरे, आता संशोधनाची संहारकता आणि कल्पकता जगाला दाखवणेदेखील गरजेचे! पुन्हा या संशोधनाचा खर्चही निघाला पाहिजे. त्यामुळे २० व्या शतकात मध्य अमेरिकेतील होंडुरास, मेक्सिको, निकाराग्वा या देशांत कधी क्रांतीच्या नावाखाली तर कधी अमली पदार्थांच्या उत्पादकांच्या विरोधातील मोहीम वगैरे कारणे सांगून ‘सीआयए’ या अमेरिकेच्या गुप्तहेर संघटनेने या देशांवर आक्रमण केले. तीच गोष्ट नासरच्या इजिप्तची, संघर्षात बरबटलेल्या मध्य आफ्रिकेची आणि आपल्या सीमेवरील अफगाणिस्तानची. मध्यपूर्व तर या संकुलाचे आवडते खेळणे! तेलाच्या व्यापारामुळे आलेला अमाप पैसा याच पाश्चिमात्य देशांमधून येत होता. तो माघारी घेण्यासाठी या देशांनी मग इराण, इराक, सौदी यांचीच अंगणे पेटविण्यास सुरुवात केली. इस्रायलचा बागुलबुवा दाखवून आणि आपापसात संघर्ष पेटवून त्यांनी दोन्ही बाजूंना अमर्याद शस्त्रे विकून स्वत:चे उखळ पांढरे करून घेतले. राष्ट्रवादाचा आदर्श मिरविणारा इस्रायल एवढा व्यवहारी की, १९८० च्या इराण-इराक युद्धात शत्रुराष्ट्र असूनदेखील ते इराणला अत्याधुनिक हवाई तंत्रज्ञान विकण्यास कचरले नाहीत. बशर असादच्या सीरियामध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी बंडखोरी मोडून काढताना अत्याधुनिक शस्त्रांचे प्रदर्शन सीरियाच्या भूमीवर मांडले जेणेकरून मध्यपूर्वेतील इतर राष्ट्रे रशियाकडे आकृष्ट होतील. २००३ मध्ये अमेरिकेच्या इराकवरील आक्रमणानंतर हॅलिबर्टन या कंपनीने डिक चेनी (जे नंतर अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष झाले) यांच्या नेतृत्वाखाली कोट्यवधी डॉलर्सची रसदपुरवठा आणि पुनर्निर्माण कंत्राटे घेतली. काही तज्ज्ञांच्या मते या आक्रमणामागे ‘एमआयसी’चा मोठा वाटा होता. सध्या मध्यपूर्वेपासून आफ्रिकेपर्यंत अमेरिका, युरोप, रशिया, चीन या सर्वच राष्ट्रांचे हितसंबंध गुंतल्यामुळे आणि ज्यांचे जळत आहे त्यांचा आवाज क्षीण असल्यामुळे शांतता प्रस्थापित करण्यात कोणत्याच घटकाला रस नाही.
९/११ नंतरचे संघर्ष
सप्टेंबर २००१ मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने जागतिक दहशतवादाविरुद्ध युद्ध पुकारले. ब्राऊन विद्यापीठाच्या ‘कॉस्ट्स ऑफ वॉर प्रोजेक्ट’ नुसार, ९/११ नंतरच्या युद्धांवर अमेरिकेने ८ ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त खर्च केला आहे आणि महत्त्वाचे वाटेकरी लॉकहीड मार्टिन, रेथिओन आणि बोईंगसारखे संरक्षण उत्पादक आहेत. याच काळात तंत्रज्ञानाचा विकास आणि प्रसार वेगाने होत होता. ड्रोनसारख्या उपकरणांनी हवाई हल्ले आणि प्रत्यक्ष मानवी सहभागाची किमान गरज यांमुळे अमेरिकेला दूरच्या राष्ट्रांमध्ये हल्ले नियंत्रित करणे सोपे झाले. ‘जनरल अॅटोमिक्स’सारख्या ड्रोनचे उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या नफ्यात गेल्या दशकात कमालीची वाढ झाली आहे. २०२३ मध्ये, जागतिक लष्करी ड्रोन बाजाराचे मूल्य १२ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त होते, ज्यामध्ये खासगी कंपन्यांनी या क्षेत्रात वर्चस्व टिकवले आहे. दहशतवादाविरुद्धच्या युद्धामुळे लष्करी कार्यांचे आउटसोर्सिंग ही एक सामान्य प्रथा झाली आहे. ब्लॅकवॉटर (आताचे नाव ‘अकॅडमी’) सारख्या खासगी कंत्राटदारांना सुरक्षा, रसद आणि अगदी लढाऊ भूमिकांसाठी नियुक्त केले जाऊ लागले. एआय आणि स्वयंचलित प्रणालींच्या विकासामुळे ही प्रवृत्ती आणखी वेगवान झाली आहे. आज, सरकारे खासगी कंपन्यांवर केवळ शस्त्रे पुरविण्यासाठीच नव्हे, तर त्यांना चालवणाऱ्या अल्गोरिदमचे विकसन आणि नियंत्रण यांसाठीही अवलंबून आहेत.
२१ व्या शतकातील तीन संघर्ष आधुनिक युद्धांची वैशिष्ट्ये दर्शवितात. मध्य आशियातील नागोर्नो-काराबाख संघर्ष, रशिया-युक्रेन युद्ध आणि इस्रायल-हमास! विशेष म्हणजे या तिन्ही संघर्षांमध्ये खासगी घटकांचा सहभाग चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत जाणारा आहे. मध्य रशियाची रणभूमी पूर्णपणे ड्रोन संग्रामाने गाजविली तर युक्रेनमधील युद्ध हे पाश्चात्त्य ‘एमआयसी’ला मिळालेले आवतण होते. पुतिन यांनी युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर कीव्हला भेट देणारी पहिली अमेरिकन बडी हस्ती होती ‘पॅलान्तीर’ या विदा व्यवस्थापक कंपनीचे प्रमुख! त्यानंतर गूगल, इलॉन मस्कचे स्टारलिंक या सर्वांनी युक्रेनमध्ये प्रयोगशाळाच उभी केली. ‘स्वार्मर’ या युक्रेनच्या स्वयंचलित ड्रोन्स बनविणाऱ्या स्टार्टअपने मागच्या वर्षी रणभूमीवरील कौशल्यप्रदर्शनामुळे २७ लाख डॉलरचे बीजभांडवल उभारण्यात यश मिळविले. इस्रायलच्या सैन्यदलाने तर, अनेक खासगी प्रणालींचे एकत्रीकरण करून ‘हबसोरा’ या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीला जन्म दिला, जिचा वापर हवाई लक्ष्य निर्धारणासाठी केला जातो. ही प्रणाली काही मिनिटांत शेकडो लक्ष्यांचा भेद करू शकते.
स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (सिप्री) नुसार, २०२२ मध्ये जागतिक लष्करी खर्च २.२४ ट्रिलियन डॉलर्स इतका झाला, त्यात अमेरिकेचा वाटा ३९ टक्के होता. अमेरिकेतील प्रमुख संरक्षण कंत्राटदार कंपन्यांच्या उत्पन्नाचा विचार करता, लॉकहीड मार्टिनने २०२२ मध्ये ६५ अब्ज डॉलर्स कमावले, तर रेथिओनचा नफा १२ टक्क्यांनी वाढला. २०२२ मध्ये अमेरिकेतील बड्या पाच संरक्षण कंपन्यांनी ६० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम लॉबिइंगवर खर्च केली. इस्रायल आणि स्वीडनसारख्या देशांनी शस्त्रे आणि तंत्रज्ञान निर्यात करून समृद्ध संरक्षण उद्याोग उभारले आहेत. २०२२ मध्ये इस्रायलची संरक्षण निर्यात १२.५ अब्ज डॉलर्स इतकी होती. इस्रायल, युक्रेन आणि स्वीडनसारख्या देशांनी शस्त्रे आणि तंत्रज्ञान निर्यात करून समृद्ध संरक्षण उद्याोग उभारले आहेत. २०२२ मध्ये इस्रायलची संरक्षण निर्यात १२.५ अब्ज डॉलर्स इतकी होती. यामुळे युद्धात शांतता, संहार अथवा विजय ही पारंपरिक उद्दिष्टे बाजूला पडून नफेखोरी बळावली आहे.
तिसऱ्या जगातील सामान्य माणसाच्या अस्तित्वाचे संकट आणि उद्देशविहीन जगण्याची ससेहोलपट मर्ढेकरांच्या ‘गणपत वाण्या’च्या बिडी चर्वणातून नजरेस पडते. दुसरीकडे पहिल्या जगातील ग्रेगरी (रेथिओनचे प्रमुख) यांच्यासारखे लोक त्याच बिडीने रॉकेट आणि बॉम्बचा धूर करोडोंच्या स्वप्नांवर सोडत नफ्याची गाथा वाचत आहेत. या पाश्चात्त्य वाण्यांच्या जळत्या काड्या तिसऱ्या जगाच्या जमिनीत रुततात. अमेरिकेत नफा जन्म घेतो, तर आफ्रो-आशियात घरे उद्ध्वस्त होतात!