गाव चेप्पड, जिल्हा आलपुळा, केरळ.. शालाबाह्य मुलांना शोधत आलेली शिक्षिका दारात उभी होती. उंबरठय़ावर बसलेली नव्वदीपार गेलेली, कमरेत वाकलेली, हाडकुळी कार्तियानी अम्मा म्हणाली, ‘मला शिकायचे आहे, तू शिकवशील का?’ अम्माला केरळ सरकारच्या ‘अक्षरलक्षम’ या प्रौढ साक्षरता कार्यक्रमांतर्गत शाळेत प्रवेश मिळाला आणि आयुष्याची ९०-९५ वर्ष मंदिर, रस्ते आणि लोकांच्या घरी साफसफाई करण्यात गेलेली अम्मा ९६व्या वर्षी शिक्षणामुळे कॉमनवेल्थची शिक्षणविषयक सदिच्छादूत झाली. नारीशक्ती पुरस्कार विजेती ठरली.. शिक्षणासाठी वयाची मर्यादा नसते, त्याचे हे प्रेरणादायी उदाहरण.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> व्यक्तिवेध : चार्ल्स फीनी

केरळ सरकारने संपूर्ण राज्य साक्षर व्हावे या दृष्टिकोनातून ‘राज्य साक्षरता मिशन’ हाती घेतले होते. त्याअंतर्गत प्रौढ साक्षरतेसाठी ‘अक्षरलक्षम साक्षरता परीक्षा’ घेण्यात येईल, अशी घोषणा २६ जानेवारी २०१८ रोजी करण्यात आली होती. त्या वर्षी ४० हजार ३६३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ३० ऑक्टोबरला निकाल लागला. कार्तियानी अम्मा सर्वात ज्येष्ठ परीक्षार्थी तर होत्याच, शिवाय १०० पैकी ९८ गुण मिळवून त्या पहिल्याही आल्या. मुलाखती घेण्यासाठी दारात पत्रकारांची गर्दी जमली. अतिशय निरागसपणे त्या म्हणाल्या, ‘‘दोन गुण गेले नसते तर १०० गुण मिळाले असते. मी लहान असताना मला शिक्षण घेता आले नाही. शिकले असते तर सरकारी नोकरी मिळाली असती. पण आता मी दहावीपर्यंत शिकणार आहे. मरेपर्यंत शिकत राहणार आहे. मला इंग्रजीसुद्धा शिकायचे आहे.’’ त्यांची यादी संपतच नव्हती. ‘‘मला कॉम्प्युटर हवा आहे म्हणजे फावल्या वेळात मी तोसुद्धा शिकू शकेन,’’ असे त्या म्हणताच हशा पिकला. इतरांनी हे विधान गंमत म्हणून घेतले असले, तरीही तत्कालीन शिक्षणमंत्री सी. रवींद्रनाथ यांनी खरोखरच अम्मांना लॅपटॉप दिला. गव्हर्नमेंट एलपीएस शाळेतील त्यांच्या शिक्षिका सांगतात, अम्मा त्या वयातही नित्यनेमाने पहाटे उठून गृहपाठ करत. त्यांनी त्यांची आवडती पेन्सिल खास परीक्षेसाठी सांभाळून ठेवली होती.

हेही वाचा >>> व्यक्तिवेध: अ‍ॅन राइट

परीक्षेतील यशाबद्दल १ नोव्हेंबर २०१८ ला त्यांचा केरळ सरकारच्या वतीने सत्कार करण्यात आला. हा सत्कार समारंभ त्रिवेंद्रम येथे होणार होता. तिथवर जाणार कसे? गावच्या पंचायतीने कार्तियानी अम्मांना सत्कारस्थळी नेण्याची जबाबदारी स्वीकारली. पुढे २०२० साली त्या कॉमनवेल्थच्या ‘लर्निग गुडविल अ‍ॅम्बेसिडर’ झाल्या. त्याच वर्षी महिलादिनी त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोिवद यांच्या हस्ते २०१९ साठीच्या ‘नारीशक्ती पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. कार्तियानी अम्मांच्या या कल्पितकथेसमान वाटणाऱ्या प्रवासावरचा ‘द बेअरफुट एम्प्रेस’ हा माहितीपट १३ मे २०२१ रोजी प्रदर्शित झाला. याच नावाचे लहान मुलांसाठीचे चित्रमय पुस्तकही प्रकाशित झाले आहे. अम्मांचे बुधवारी १०१व्या वर्षी निधन झाले. सरकारी धोरणे सामान्यांच्या आयुष्यात किती आमूलाग्र बदल घडवू शकतात, याचे कार्तियानी अम्मा हे झळाळते उदाहरण ठरले. एखादे राज्य संपूर्ण साक्षर होते, तेव्हा परिवर्तन करण्याची क्षमता असणाऱ्या योजना, त्या तेवढय़ाच नेटाने राबविणारे प्रशासन आणि त्यांचा पुरेपूर लाभ घेऊन पुढे जाण्याची जिद्द बाळगणारे लाभार्थी हे गणित जुळून यावे लागते. केरळला जे साधले, ते इतर राज्यांनाही साध्य करता येऊ शकते.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inspirational story of karthyayani amma zws