अमेरिकेत लॉस एंजलिस येथे २०२८मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये क्रिकेटचा समावेश होण्याच्या निर्णयावर सोमवारी मुंबईत शिक्कामोर्तब होईल. लॉस एंजलिस संयोजन समितीने सुचवलेल्या पाचही खेळांच्या समावेशाला मान्यता देण्याचे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) ठरवले. क्रिकेट, बेसबॉल/सॉफ्टबॉल, स्क्वॉश, लॅक्रॉस आणि फ्लॅग फुटबॉल हे ते पाच खेळ. यांतील शेवटचे दोन आपल्याला परिचित असण्याचे फारसे कारण नाही. बेसबॉल  या स्थानिक खेळाचा प्रसार ऑलिम्पिकच्या माध्यमातून व्हावा, अशी संयोजक देशाची म्हणजे अमेरिकेची विनंती मान्य झाली. स्क्वॉश हा तसा जागतिक खेळ आणि त्याच्या समावेशाविषयी अनेक वर्षे हालचाली सुरू होत्या. पण या सगळय़ा खेळांमध्ये दर्शकव्याप्तीच्या बाबतीत क्रिकेट नि:संशय मोठा आहे. आयओसीचे अध्यक्ष थॉमस बाख हे सध्या मुंबईत आहेत. त्यांनीच दिलेल्या माहितीनुसार, गतवर्षी लॉस एंजलिस संयोजन समितीत क्रिकेटविषयी चर्चा झाली होती. तेव्हा संयोजन समितीनेच क्रिकेटच्या समावेशाविषयी अनुकूलता दर्शवली. क्रिकेट हा खेळ अद्याप अमेरिकेमध्ये म्हणावा तसा विकसित झालेला नाही. परंतु दक्षिण आशियाई स्थलांतरितांनी (यात अर्थातच प्राधान्याने भारतीय) हा खेळ त्या देशात लोकप्रिय केला. यंदा प्रथमच त्या देशात आयपीएलसारखी फ्रँचायझीकेंद्री क्रिकेट लीग खेळवली गेली. शिवाय पुढील वर्षी होत असलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेचे सहयजमानपद अमेरिकेला मिळालेले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> आरोग्याचे डोही: ओंजळीतल्या सांजसावल्या..

अर्थात लोकप्रियता आणि सुविधांची उपलब्धता हे क्रिकेटच्या ऑलिम्पिक समावेश प्रक्रियेतील कळीचे मुद्दे नव्हते. खरा मुद्दा वेगळाच होता. उत्तेजक चाचणी प्रक्रिया आणि नियमावलीशी संलग्नता ही आयओसीची कोणत्याही खेळाच्या ऑलिम्पिक समावेश प्रक्रियेतील पहिली अट असते. यासाठी जागतिक उत्तेजकविरोधी संस्था अर्थात वल्र्ड अँटी डोपिंग एजन्सी (वाडा) ही कार्यरत असते. या संस्थेशी संलग्न असलेली भारतीय संस्था म्हणजे नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी अर्थात ‘नाडा’ देशांतर्गत उत्तेजकविरोधी मोहिमेत प्रधान असते. या संस्थेच्या कक्षेअंतर्गत येण्यास भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने अनेक वर्षे विरोध दर्शवला होता. हा विरोध ‘वाडा’ आणि ‘नाडा’च्या अचानक चाचणी (रँडम टेस्टिंग) नियमावलीस होता. ‘आमचे क्रिकेटपटू सरसकट उत्तेजक चाचणीसाठी आपल्या प्रयोगशाळांमध्ये येऊ शकणार नाहीत’, ही बीसीसीआयची भूमिका. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ज्यावेळी ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेशाची तयारी सुरू केली, त्यावेळी काही मंडळांनी विरोध केला, त्यात बीसीसीआय आघाडीवर होते. बीसीसीआयचा आवाजही मोठा असल्यामुळे समावेशाचे घोडे पुढे सरकत नव्हते. पण २०१९पासून बीसीसीआय उत्तेजक चाचणीविषयी नियम स्वीकारण्यास राजी झाले.

या सहस्रकाच्या पहिल्या दशकात क्रिकेटच्या ऑलिम्पिक समावेशाची चर्चा सुरू झाली, त्यावेळी ऑलिम्पिक समितीने टी-२० क्रिकेटचा विशेष उल्लेख केला होता. तीन-साडेतीन तासांचे हे सामने ऑलिम्पिकच्या व्यग्र कार्यक्रमात आणि सुविधा उभारणीच्या गुंतागुंतीमध्ये सामावून घेता येतील, असे समितीचे म्हणणे होते. ऑलिम्पिकमध्ये यापूर्वी १९०० साली क्रिकेट खेळवले गेले. पण तो जवळपास विनोदी प्रकार होता, कारण ब्रिटन आणि फ्रान्स असे दोनच संघ होते. त्यात ब्रिटनच्या संघाकडून काही क्लब दर्जाचे खेळाडू खेळले, तर फ्रान्सच्या संघात तिथे स्थायिक झालेले ब्रिटिश होते! आता तशी परिस्थिती नसेल. २०२८मध्ये किमान सहा संघ खेळतील. त्यामुळे आणखी एका खेळामध्ये भारताला ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकण्याची शक्यता निर्माण होते. अर्थात अशा स्पर्धाना प्राधान्य देण्याविषयी बीसीसीआय खरोखर किती गंभीर आहे हे पाहणे उद्बोधक ठरेल. परवाच्या आशियाई स्पर्धेसाठीही अखेरच्या क्षणी भारताचे पुरुष आणि महिला संघ धाडण्यास बीसीसीआय राजी झाले. नंतर लगेच विश्वचषक स्पर्धा सुरू होणार असल्याचे कारण त्यावेळी दिले गेले. खरे म्हणजे भारतासारख्या ऑलिम्पिकमध्ये अजूनही पदकदरिद्री राहिलेल्या संघाला अशा बहुराष्ट्रीय स्पर्धामध्ये धाडण्याविषयी बीसीसीआय तत्पर आणि उत्साही असायला हवे. तो उत्साह आणि तत्परता जितकी फ्रँचायझी क्रिकेटच्या बाबतीत आपल्याकडे दाखवली जाते, तशी ती इतर वेळी दिसत नाही.

हेही वाचा >>> समोरच्या बाकावरून: पाच राज्यांमध्ये काँग्रेस आणि भाजपची कसोटी!

ऑलिम्पिक स्पर्धा सहसा जून ते ऑगस्ट या काळात होतात. त्यामुळे मार्च-एप्रिल-मे या काळात आपल्याकडे होणाऱ्या आयपीएलमध्ये व्यत्यय येण्याची चिन्हे नाहीत. मात्र आयपीएलला केंद्रस्थानी ठेवून हल्ली आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा कार्यक्रम आखला जातो. त्यामुळे तशी एखादी तहकुबीतली स्पर्धा ऑलिम्पिकच्या वेळी झाली, तर तिच्यासाठी ऑलिम्पिकवर पाणी सोडण्याचे ‘कठोर औदार्य’ बीसीसीआयने दाखवू नये इतकीच अपेक्षा. शिवाय क्रिकेटच्या खऱ्याखुऱ्या जागतिकीकरणासाठी अशा प्रकारे ऑलिम्पिक किंवा आशियाई किंवा राष्ट्रकुल स्पर्धामध्ये खेळावेच लागेल. दहा(च) देशांच्या ‘विश्वचषका’तून ते साधणारे नाही!

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: International olympic committee approves t20 cricket in 2028 los angeles olympics zws