वर्तमानाचा प्रवास विस्ताराकडून संक्षेपाकडे होत असल्याची अनेक उदाहरणं देता येतील; पण त्याचं व्यवच्छेदक रूप मुलाखती होय. तासनतास चालणाऱ्या मुलाखती हल्ली सेकंदाच्या प्रतिक्रियेवर येऊन ठेपल्यात. मुलाखत हे माणसाचा एका विशिष्ट प्रश्नी असलेला दृष्टिकोन समजून घ्यायचं साधन. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींनी पहिली मुलाखत दिली १९४९ मध्ये, तर शेवटची मृत्यूच्या आदल्या दिवशी म्हणजे २६ मे, १९९४ रोजी. या ४५ वर्षांच्या कालावधीत सुमारे शंभरएक मुलाखती त्यांनी दिल्याची नोंद आढळते. हाती लागल्या फक्त पाऊणशेच्या आसपास. मुलाखती मुत्सद्दी माणसांच्या घेण्याचा रिवाज विसाव्या शतकात होता. त्यातही ‘सार्वजनिक चरित्र’ असणाऱ्यांच्या मुलाखतीस तत्कालीन सामाजिक, साहित्यिक, धार्मिक, वैचारिक, संस्कृतिक आणि राजनीतिक क्षेत्रात असाधारण महत्त्व होतं. तर्कतीर्थांचा संचार या सर्व क्षेत्रांत होता.

तर्कतीर्थांनी दिलेल्या मुलाखतीत काही आत्मपर आहेत, तर काही परात्मपर ! त्या व्यक्तिकेंद्रित आहेत, तशाच विचारकेंद्रितही. शिवाय त्या धर्म, शिक्षण, तत्त्वज्ञान, राजकारण, समाजकारण, साहित्य, भाषा, शिक्षणावर भाष्य करणाऱ्याही दिसतात. त्यांच्या मुलाखती प्रा. मे. पुं. रेगे, पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर, श्री. पु. भागवत, माधव गडकरी, प्रा. रा. ग. जाधव, प्रा. म. द. हातकणंगलेकर, डॉ. सुधीर रसाळ, डॉ. सदानंद मोरे, अनिल जोशी, अरुण शेवते प्रभृती मान्यवरांनी घेतलेल्या आहेत. ‘रिडल्स’, ‘नामांतर’, ‘मंदिर-मशीद वाद’, ‘रामजन्मभूमी’, ‘मंडल आयोग’ अशा तत्कालीन प्रक्षोभक विषयांवर तर्कतीर्थांनी मुलाखती दिल्यात. त्यात कधी त्या वादग्रस्त ठरल्या, तर कधी शिरोधार्हही मानल्या गेल्या. जवळपास सर्व मराठी वृत्तपत्रे, साप्ताहिके, पाक्षिके, मासिके, त्रैमासिके, वार्षिक (दिवाळी अंक) यांतून तर्कतीर्थांच्या मुलाखतींना प्रसिद्धी मिळत होती. त्या अग्रक्रमाने वाचल्या जात; त्यांच्यावरील प्रतिसाद, प्रतिक्रिया प्रकाशित होत. काही वेळा वादविवाद घडत. उदाहरणार्थ, ‘रिडल्स’वरील ‘सुटलेली कोडी’ शीर्षकाची प्रा. मे. पुं. रेगे यांनी घेतलेली मुलाखत. त्यावर प्रा. अरुण कांबळे यांनी दीर्घलेख लिहून प्रतिवाद केला होता.

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी आणि त्यांची मुलाखत घेणारे हाही समसमासंयोग असायचा. ‘फुलासंगे मातीस वास’ की ‘मृद्गंधे कुंभ शोभायमान’ याचा निर्णय करणे कठीण! त्यांची एक मुलाखत ‘द टेलिग्राफ’नं कोलकात्यात घेतली होती. ‘ऑफ मार्क्स अँड एन्सायक्लोपीडियाज्’ या शीर्षकाची ती इंग्रजी मुलाखत जगभर वाचली गेली; ती ‘कोशकार’ म्हणून आणि मराठी, संस्कृत, इंग्रजी, हिंदीत केलेलं लेखन लक्षात घेऊन. त्या मुलाखतीचे महत्त्व नंतर स्पष्ट होणार होते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी ‘मराठी विश्वकोश’ लेखन पद्धती १९६२-६५ च्या दरम्यान ठरवलेली. त्यातील नोंदीत ‘बाणांकन पद्धती’ (संदर्भ विस्तार सूचकता) होती. हा कोश २००३च्या दरम्यान आपण मृदांकित (सॉफ्टकॉफी / डिजिटाईज) केला, तर त्यात आपोआप दुवे (लिंक्स) तयार झाले. ही होती कोशकार म्हणून तर्कतीर्थकृत परिणत प्रज्ञा! आणि कोशलेखनाची भविष्यलक्ष्यी शैली. बुद्धिप्रामाण्यवादी तार्किक असतात, यातच दुसरा अर्थ ते गणिती असतात. मुत्सद्दी राजकारण्यांचं गणित पक्कं असतं, हे वेगळं सांगायला नको.

मुलाखत देताना, उत्तरं देताना तर्कतीर्थ हजरजबाबी राहिले आहेत. त्यांच्या अधिकांश मुलाखती दीर्घोत्तरी होत; पण ‘सवाल-जवाब’ शैलीच्या (रॅपिड फायर) मुलाखती सुधीर गाडगीळ, अनंत विष्णू पाटणकर, पु. ल. देशपांडे यांनी घेतल्या असून, त्या तितक्याच रोचक होत नि खोचक उत्तरांनी भरलेल्या आढळतात. तर्कतीर्थ मनुष्यवेल्हाळ होते, तितकेच मुलाखतवेल्हाळही! मुलाखतींसंदर्भात लोकक्षोभ लक्षात घेऊन त्यांनी आपल्या मतांची काही वेळा घेतलेली माघार लक्षात घेता, आज कळते की, त्यांचंच मत भविष्यलक्ष्यी होतं. ‘मंडल आयोगा’वरील मुलाखत त्याचं उदाहरण होय. महाराष्ट्रातील एका माळेतील राजकीय मुत्सद्दी म्हणजे तर्कतीर्थ, यशवंतराव नि शरद पवार. कोण गुरू, कोण शिष्य कळणे, ठरवणे अवघड! हे भाष्य नव्हे. याचा आधार तर्कतीर्थ साहित्य आहे.

डॉ. सुनीलकुमार लवटे

drsklawate@gmail