डॉ. सुनीलकुमार लवटे

रिडल्स इन हिंदुइझम’ ग्रंथाचे प्रकाशन महाराष्ट्र शासनाने १९८७ मध्ये केले. हा ग्रंथ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ मध्ये लिहिलेला होता. तो अपूर्ण होता. या ग्रंथात त्यांनी राम, कृष्ण इ. हिंदू देवतांवर लेखन केले आहे. प्रकाशन झाल्यावर ते वादग्रस्त ठरले. समर्थक व विरोधकांचे लेखन व आंदोलने झाली. शेवटी शासनाने ‘या ग्रंथात व्यक्त झालेल्या मतांशी महाराष्ट्र सरकार सहमत असेलच असे नाही,’ अशी तळटीप टाकण्याच्या तडजोडीवर वाद मिटविला गेला. या पार्श्वभूमीवर ‘सुटलेली कोडी’ शीर्षकांतर्गत प्रा. मे. पुं. रेगे यांनी घेतलेली तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची मुलाखत ‘नवभारत’ मासिकाच्या मे, जून १९८८च्या अंकात प्रकाशित झाली होती.

या मुलाखतीत तर्कतीर्थांनी स्पष्ट केले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म समजून घ्यायचा म्हणून जी टिपणे केली होती, ती प्रामुख्याने पाश्चिमात्य इंग्रजी विचारक मॅक्सम्युलर विल्सन, मूर इत्यादींच्या ग्रंथांवरून. संस्कृतमधील त्यांचे संदर्भ भाषामर्यादेमुळे तोकडे होते. डॉ. आंबेडकरांना त्या काळात धर्मासंबंधी पडलेली कोडी बहुतांशाने सुटलेली आहेत. उदाहरण सांगायचे, तर जन्मसिद्ध जातीवर आधारित चातुर्वर्ण्य व्यवस्था आता कायद्याने अमान्य आहे. दुसरी गोष्ट, पूर्वी वेद अपौरुषेय मानले जायचे. या कल्पनेतून समाज बाहेर आला आहे. तिसरे असे की, वेदांचे सार तरी काय? हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर शोधू, लिहू पाहात होते. यासंदर्भात तर्कतीर्थ स्पष्ट करतात की, वेदांमध्ये ‘ऋग्वेद’ सर्वाधिक प्राचीन आहे. त्यात तात्त्विक महत्त्वाचे काहीच नाही. यासंदर्भातला महत्त्वाचा प्रश्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पडलेला होता. तो असा की, ‘ऋग्वेद’ बहुदेवतावादी आहे की एकदेवतावादी? त्याचे उत्तर ‘एकं सद विप्रा: बहुदा वदन्ति’ या पहिल्या मंडलातील ६४ व्या सूक्तात स्पष्ट आहे. सत्य एकच आहे; पण शहाणे लोक त्याचे वर्णन वेगवेगळ्या रूपात करतात. डॉ. आंबेडकरांच्या टिपांत त्रुटी आहेत. प्राचीन ग्रंथसंदर्भ अध्याय, पाद आणि मग सूत्र असे सूक्ष्माने पाहिले पाहिजेत. केवळ सूत्रसंदर्भ स्थूल ठरतात. प्राचीन धर्मग्रंथ अध्ययन, मीमांसा पद्धतीची एक परंपरा व पद्धती आहे. तिच्या ओघाने अभ्यास पूर्णत्वास जात असतो. हिंदू धर्म कालौघात बदलत गेला आहे, ते लक्षात घेऊन धर्मचिकित्सा झाली पाहिजे, मग वादाचे प्रसंग उद्भवत नाहीत. तर्कतीर्थांच्या या मुलाखतीवर आलेल्या प्रतिक्रिया ‘नवभारत’च्या ऑगस्ट, १९८८च्या अंकात आहेत. ‘वादे वादे जायते तत्त्वबोध:’ हेच खरे. सत्यशोधक हा न संपणारा मानवी प्रवास व वाटचाल आहे.

या मुलाखतीतील विविध प्रश्नांना तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी विस्तृत उत्तरे दिली आहेत. यातून लक्षात येते की, त्यांनी बालपणापासून ते वयाच्या ९०व्या वर्षापर्यंत अनेक बदलांना सामोरे जात ते आत्मसात केले आहेत. त्यांनी स्पष्ट केले आहे की, त्यांचा अध्यात्माकडून इहवादाकडे जो वैचारिक विकास घडून आला, त्याचे कारण शिक्षण होय. त्यांनी आयुष्याच्या वेगवेगळ्या काळात, वेगवेगळ्या वळणांवर अनेक व्यक्तिविचार अनुभवले. स्वातंत्र्यचळवळ, गांधीवाद, मार्क्सवाद, रॉयवाद, नवमानवतावाद, काँग्रेस समाजवाद असे जे आयुष्यातले टप्पे आहेत, ते नवविचार ओढ नि आकर्षणातून निर्माण झाले. तर्कतीर्थांनी भौतिकवाद, भांडवलवाद अभ्यासला. अर्थशास्त्राची जी जाण आली ती या व्यासंगामुळेच. तर्कतीर्थांनी प्रसंगोपात जगाचा इतिहास, घडून आलेली विविध परिवर्तने यांचा अभ्यास केला होता. रशियन क्रांती (१९१७) ते गोर्बाचेव्ह यांच्या ग्लासनोस्त, पेरिस्त्रोइकापर्यंतच्या क्रांती, उत्क्रांतीची त्यांना चांगली जाणीव व समज असल्याचे या मुलाखतीतून स्पष्ट होतेे.

नवतंत्रज्ञान हे सार्वत्रिकतेची शक्ती घेऊन जन्मत असल्याने त्याचा प्रसार, प्रचार गतीने होतो व ते अनिवार्य बनवून जाते, त्यामुळे विकास घडून येतो. जीवनास गती येते. सूचना व संपर्कक्रांती समजून घेणे आवश्यक होते, ते तिच्या या व्यापक स्वरूपामुळे.

निसर्गनियमांचा शोध म्हणजे प्रकाश. तो न्यूटनसारख्या अनेक वैज्ञानिकांनी घेतला तो जिज्ञासेपोटीच. तर्कतीर्थांचा ‘वेद ते वेब’ प्रवास, अभ्यास मला यापेक्षा वेगळा वाटत नाही.

drsklawate@gmail.com