जगातील पहिल्या अणुचाचणीचे जनक रॉबर्ट ओपनहायमर चाचणीच्या यशानंतर गीतेतले प्रसिद्ध सुभाषित पुटपुटले होते, ‘आता मी साक्षात मृत्यू झालो आहे, जगाचा विनाशक’… एकापरीने, प्रत्यक्ष जगाच्या निर्मात्याचे हे विधान. जेव्हा एखादा थोर शास्त्रज्ञ याची अनुभूती घेतो तेव्हा हा आत्मविश्वास निर्माण करणारा घटक कोणता असेल तर तो म्हणजे तंत्रज्ञान. त्यानंतर पुढचे अर्धे शतक जगाचे राजकारण केवळ याच आण्विक तंत्रज्ञानाच्या छायेत गेले हे देखील एक वास्तव. पुढे जाऊन माहिती तंत्रज्ञान क्रांतीमुळे हाती असणारा मोबाइलच संमतीशिवाय विदा गोळा करून आपल्या विरोधातील शस्त्र झाला हे कळले नाही. आधी युद्धे ही सीमांवर लढली जायची. आता युद्धाची व्याप्ती वाढून प्रत्येक स्वतंत्र नागरिक हा लक्ष्य झाला आहे. आणि आघात करण्यासाठी शरीर अपुरे ठरत असून मानवी मन हे आघाताचे नवे माध्यम बनले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचे युग येईल म्हणता म्हणता आले सुद्धा… ही सगळी घडामोड होण्याचे कारण म्हणजे तंत्रज्ञानातील बदल!
जेव्हा २०व्या शतकात तेलाची क्रांती झाली आणि मुक्त बाजारव्यवस्थेची पायाभरणी झाली तेव्हा जगातील शक्तिशाली राष्ट्रांनी या तेल पुरवठादार राष्ट्रांवर वर्चस्व प्रस्थापित करण्याचे प्रयत्न केले. त्याच सुमारास, वसाहतीचे राजकारण नव्या मूल्यांच्या निर्मितीनंतर नाकारले जाऊ लागले आणि बाजार नियंत्रणाच्या राजकारणाद्वारे या देशातील घडामोडींवर नियंत्रण मिळविणे चालू झाले. पुन्हा अशांत रियाध आणि तेहरान पाश्चात्त्य देशांच्या फायद्याचे ठरू लागल्यानंतर छुपी युद्धे तेवत ठेवून मध्यपूर्व आणि दक्षिण अमेरिका हे तेलसंपन्न प्रदेश धुमसणे नित्याचे झाले. नवउदारमतवादाच्या काळात बाजारव्यवस्थेची नवी समीकरणे उभी राहताना चीन हा वस्तू उत्पादनाचे आगर बनला. आयर्लंड, बहामा बेटे, कॉनरी बेटे वगैरे करमुक्त प्रशासनासाठी कॉर्पोरेट कंपन्यांना आकर्षित करू लागली. एकूणच नव्या व्यवस्थेत सत्ता, संघर्ष, बाजार सर्वांनी आपले स्थान निश्चित केले. सध्याच्या युगात तंत्रज्ञानाच्या प्रगतीनंतर ‘विदा हीच सत्ता गाजविण्याची गदा’ हे लक्षात आल्यानंतर राष्ट्रांनी त्यांच्या भूमिकेत बदल करायला सुरुवात केली. २० व्या शतकातील व्यवस्थेवर उभे असलेले जगाचे प्रारूप, उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या प्रगतीनंतर आमूलाग्र बदलाच्या प्रतीक्षेत आहे.
हेही वाचा : कर्तृत्वमर्यादांमुळे भाजपचे पतन निश्चित!
गेल्या काही वर्षांतील युद्धे पहिली तर आपल्या लक्षात येईल की, आधी युद्धनिपुणतेसाठी मनुष्यबळाची गरज असायची. नंतर तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे हजारो सैनिकांपेक्षा काही तंत्रकुशल सैनिक निर्णायक ठरू लागले. आता मात्र प्रत्यक्ष शस्त्र चालविण्यासाठीसुद्धा मनुष्यबळाची गरज लागणार नाही. गाझा युद्धात इस्राएलने तयार केलेल्या ‘लॅव्हेंडर’ प्रणालीमध्ये लक्ष्य निवडण्याचा आणि त्याचा भेद करण्याचा निर्णय एका स्वायत्त यंत्रणेद्वारे घेतला जात आहे ज्यात मानवी हस्तक्षेप शून्य आहे. रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनचा निभाव लागणार नाही असे मानले जात होते, पण पाश्चात्त्य तंत्रज्ञानाच्या जिवावर युक्रेन रशियाला जड जात आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये प्रत्यक्ष हल्ला झाल्यानंतर युक्रेनसह उच्च दर्जाची बैठक करणारा हा कोणत्याही देशाचा राष्ट्रप्रमुख नव्हता तर ‘पलांतीर’ या विदा विश्लेषण करणाऱ्या अमेरिकन कंपनीचा प्रमुख होता. बदलत्या काळात युद्धाचे संपूर्ण व्यवस्थापन केवळ तंत्रज्ञानाद्वारे होणे शक्य आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या एका अहवालानुसार २०२५ मधील जगासमोरील महत्त्वाच्या पाच आव्हानांमध्ये ‘तंत्रज्ञान प्रशासन’ हे एक आहे.
तंत्रज्ञान हा प्राचीन काळापासून भूराजकीय बदलांवर प्रभाव टाकत आहे. ‘सिकंदर’ अलेक्झांडरच्या भारतावरील आक्रमणात भारतीय राजांच्या हत्तींपेक्षा ग्रीक सैन्याचे चपळ घोडे प्रभावी ठरले. मुघल सम्राट बाबरचा भारतातील प्रवेश, ईस्ट इंडिया कंपनीचे भारतातील आक्रमण या सर्वांमध्ये तंत्रज्ञान कौशल्य हा कळीचा मुद्दा ठरला. एकूणच तंत्रज्ञान हे सत्ताधीशांना शक्तिशाली बनविते तर तंत्रज्ञानातील बदल ही नव्या सत्ता समीकरणांची नांदी असते. तंत्रज्ञान बदल हा नवीन तंत्रज्ञानाचा शोध, अस्तित्वात असलेल्या तंत्रज्ञानात सुधारणा आणि तंत्रज्ञानाचा प्रसार या गोष्टींवर अवलंबून असतो. ढोबळमानाने तंत्रज्ञान बदलाचा राजकारणावर पाच प्रकारे प्रभाव पडतो. तंत्रज्ञान बदल विविध घटकांना नवीन संधी उपलब्ध करून देते, ज्यामुळे अस्तित्वात असलेल्या व्यवस्थेमध्ये बदल अपरिहार्य ठरतो. उदाहरणार्थ, डिझेल आणि टर्बो इंजिनच्या शोधानंतर दळणवळणाची गती वाढली आणि जागतिकीकरण आणि उदारमतवादाचे बाजारू प्रारूप फोफावले.
दुसरी गोष्ट म्हणजे तंत्रज्ञान बदल राजकारणात वाटपानुसार भेद निर्माण करते. एकेकाळी बलाढ्य समजली जाणारी ‘नोकिया’ कंपनी ‘आयफोन’च्या प्रसारानंतर लयास गेली, ज्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानातील फिनलंडचे नाव नामशेष होऊन बाजारपेठ अमेरिकाकेंद्रित झाली. काही प्रकारचे तंत्रज्ञानात्मक बदल विद्यामान कौशल्ये, तज्ज्ञता आणि उत्पादन क्षमतांना प्रोत्साहन देतात, ज्यामुळे विद्यामान आघाडीवर असलेल्या संस्थांचे वर्चस्व अधिक मजबूत होते. तर काही प्रकारचे तंत्रज्ञानात्मक बदल पूर्णपणे वेगळी कौशल्ये, तज्ज्ञता आणि उत्पादन क्षमता आवश्यक करतात, ज्यामुळे नव्यांना प्रवेशाची संधी मिळते.
हेही वाचा : अन्वयार्थ : मुंबईकर जात्यात…
तिसरे म्हणजे, तंत्रज्ञानात्मक बदल हे महान शक्तींमधील विद्यामान स्पर्धेसाठी बाह्य (exogenous) किंवा अंतर्गत (endogenous) कारक असू शकतात. अंतर्गत बदलांचे उदाहरण म्हणजे, ज्या प्रकारे हिटलरने आपल्या सर्व स्राोतांचा वापर तंत्रज्ञान सुधारणेसाठी करून लष्करी उत्पादन वाढविले त्याचा फायदा जर्मनीला दुसऱ्या महायुद्धात आघाडी घेताना झाला. तर औद्याोगिक क्रांतीचा फायदा युरोपीय राष्ट्रांना आशिया आणि आफ्रिका खंडात वसाहती मिळविताना झाला हे बाह्य बदलाचे उदाहरण!
चौथी बाब म्हणजे तंत्रज्ञानात्मक बदल. तंत्रज्ञान नवीन संधी उघडून देत असताना, त्याच्या बदलाचा कालावधी, प्रकार, दिशा, तीव्रता आणि त्याचे परिणाम यांबद्दल अनिश्चितता निर्माण करतो. आण्विक शस्त्रांच्या निर्मितीनंतर भविष्याबद्दल निर्माण झालेली अनिश्चितता अजूनही शंकाखोरांना झपाटत आहे. पण, तंत्रज्ञानातील बदल एका अलिप्त परिस्थितीत होत नाहीत : नवीन तंत्रज्ञानासाठी प्रत्यक्षात अतिरिक्त पायाभूत सुविधा आणि नवीन/ भिन्न कौशल्यांची आवश्यकता असू शकते. सेमीकंडक्टर चिप उत्पादनात तैवानने आघाडी घेतल्यानंतर प्रशस्त निर्मिती कारखाने, भांडवल आणि कुशल मनुष्यबळ यांचा समुच्चय तिथे झाला. आणि जागतिक अर्थव्यवस्थेत तैवानचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन त्याचे चीनच्या आक्रस्ताळेपणापासून संरक्षण करणे हे अमेरिकेचे प्राथमिक कर्तव्य बनले.
एकूणच तंत्रज्ञान केवळ युद्धशास्त्रात निर्णायक घटक न राहता त्याचे सामाजिक आर्थिक परिणाम खोलवर रुजले; याचे प्रतिबिंब राजकारणावर दिसत आहे. सध्याचा काळ हा तंत्रज्ञान आणि समाज यांच्या संबंधांवर मूलभूत प्रभाव टाकणारा आहे. फाईव्ह जी, कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वान्टम कम्प्युटिंग, कृत्रिम जीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान आदींच्या शोधामुळे, विकासामुळे आणि प्रचारामुळे सामाजिक-राजकीय गणिते दूरवर घडणार-बिघडणार आहेत. या पार्श्वभूमीवर या लेखमालेत आपण तंत्रज्ञान आणि भूराजकीय घडामोडींचा संबंध पाहणार आहोत. इतिहासापासून सुरुवात करून आण्विक युगापर्यंत अनेक उत्कंठावर्धक घटनांची ओळख या लेखमालेतून करून घेऊ. सध्याच्या काळातील उदयोन्मुख तंत्रज्ञानामुळे आपले जग कसे बदलत आहे आणि त्याचा राजकारणावर, राष्ट्रातील परस्परसंबंधांवर काय परिणाम होत आहे हे पाहणे देखील तितकेच किंबहुना अधिकच उत्कंठावर्धक ठरेल. अत्यंत आधुनिक आणि गतिशील असलेल्या या विषयाची ओळख करून देण्याचा प्रयत्न या लेखमालेतून राहील. हा प्रवास केवळ माझा एकट्याचा न राहता वाचकांचाही व्हावा यासाठी बहुमूल्य अभिप्राय आणि सूचनांचे स्वागत आहे.
हेही वाचा : लोकमानस : शांततेत कार्टर यांचे योगदान मोलाचे
तंत्रज्ञान हे निखळ पाण्यासारखे आहे. राजकीय घडामोडींच्या प्याल्यात ओतले की त्याला रंग चढू लागतो… कधी शांततेचा पांढरा, कधी प्रगतीचा हिरवा आणि हो… रक्ताचा लालदेखील. एकूणच तंत्रज्ञान, त्याचे बदल आणि भूराजकीयता यांचे संबंध उलगडणे म्हणजे सामाजिक पटलावरील इंद्रधनुष्य पार करण्यासारखे आहे. तंत्रज्ञान हे केवळ निमित्त आहे, तंत्रनिर्माती राष्ट्रे असोत वा जगड्व्याळ कंपन्या – खरी भूक आहे वर्चस्वाची, सत्ता गाजविण्याची. तर या सदरातून आढावा घेऊ राजकारणातील तंत्रज्ञानाचा आणि तंत्रज्ञानाच्या राजकारणाचा… अर्थात ‘तंत्रकारणा’चा…