इंग्लंडच्या काही आघाडीच्या क्रिकेटपटूंना इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या काही संघांकडून वार्षिक करारनाम्याविषयी विचारणा झाल्याचे वृत्त मध्यंतरी ‘द टाइम्स’ या लंडनस्थित वृत्तपत्राने दिले. क्रिकेटपटूंच्या आंतरराष्ट्रीय संघटनेचे (फिका) प्रमुख हीथ मिल्स यांनीही एका प्रसिद्ध वेबसाइटला, अशा प्रकारची चर्चा ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज आणि न्यूझीलंडच्या काही क्रिकेटपटूंमध्ये स्वतंत्रपणे काही महिने सुरू असल्याचे सांगितले. ‘द टाइम्स’ म्हणजे काही एखादे टॅब्लॉइड लंगोटीपत्र नव्हे. सज्जड पुरावे असल्याखेरीज व्यक्त होण्याची आणि निव्वळ सनसनाटी बातम्या पेरण्याची या पत्राची परंपरा नाही. त्यामुळे उच्चपदस्थ सूत्रांकडून खातरजमा झाल्यानंतरच त्यांनी आयपीएलसंबंधी वृत्त दिले असेल हे नक्की. क्रिकेटपटूंच्या संघटनेत सहभागी होण्याची परवानगी श्रीमंत भारतीय क्रिकेटपटूंना अर्थातच नाही. पण या संघटनेच्या प्रमुखांचा इतर देशांतील क्रिकेटपटूंशी संपर्क असतो. तेव्हा त्यांच्या म्हणण्यातही तथ्य असेलच. अद्याप संबंधित आयपीएल फ्रँचायझी किंवा खेळाडूंनी जाहीरपणे या प्रकाराची वाच्यता केलेली नाही. मात्र अशा प्रकारचे संपर्क अभियान सुरू असल्याची आता केवळ कानोकानी कुजबुज राहिलेली नाही, हे नक्की. खरे म्हणजे आयपीएल फ्रँचायझींना जगभर ओळख व बळ ज्या लीगमुळे मिळते, त्या लीगचे खरे धनी आहेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय. तेव्हा अशा प्रकारची चर्चा सुरू झाल्यानंतर आतापर्यंत बीसीसीआयकडून खुलासा किंवा स्पष्टीकरण यायला हवे होते. कारण फ्रँचायझींवर नियंत्रण हे बीसीसीआयचेच असते. या फ्रँचायझींना जगात हातपाय पसरण्याची संधी मिळते, ती संबंधित देशांतील मंडळांच्या संमतीने नव्हे तर बीसीसीआयच्या संमतीने! पण असा खुलासा या मंडळाने केलेला नाही आणि बहुधा करण्याची शक्यताही नाही. मात्र यानिमित्ताने काही मूलभूत प्रश्न उपस्थित होतात, त्यांची चर्चा आवश्यक ठरते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा