‘दारू, सिगारेट, तंबाखू यांच्या विक्रीतून मिळवलेला पैसा दान केला, तर काय एवढे?’ असा प्रश्न चार्ल्स ऊर्फ चक फीनी यांच्याबद्दल बिल गेट्स किंवा वॉरन बफे यांना पडला नाही. उलट २०१४ मध्ये बफे यांनी त्यांना ‘फोर्बस कारकीर्द गौरव’ पुरस्कार प्रदान करतेवेळी ‘फीनी हे माझे वा गेट्सचेच हिरो नसून सर्वांचेच नायक आहेत’ असे जाहीर कौतुक केले होते. याचे कारण फीनी यांनी ९२ वर्षांच्या आयुष्यात अव्याहत सुरू ठेवलेला दानयज्ञ. हे फीनी सोमवारी निवर्तले, त्यापूर्वी दान केलेल्या एकंदर आठ अब्ज डॉलरपैकी, गेल्या काही वर्षांमधील दोनेक अब्ज डॉलर वगळता बाकी साऱ्या देणग्या या अजिबात वाच्यता न करता दिलेल्या होत्या. दान म्हणजे गुंतवणूक नव्हे, हे तत्त्व पाळणाऱ्या फार थोडय़ांमध्ये त्यांची गणना मृत्यूनंतरही होत राहील. बहुतेक उद्योगपती स्वत:च्या नाव/ आडनावाचे न्यास किंवा प्रतिष्ठाने स्थापून देणग्या देत असताना, फीनी यांनी ‘अटलांटिक फिलँथ्रॉपीज’ या प्रतिष्ठानामार्फत कोटय़वधी डॉलर दान केले व नामानिराळे राहिले.
हेही वाचा >>> व्यक्तिवेध: अॅन राइट
होय, ‘दारू, सिगारेट, तंबाखू यांच्या विक्रीतून’ त्यांनी पैसा मिळवला, पण या व्यसनवस्तूंखेरीज अन्य अनेक वस्तू त्यांच्या ‘डय़ूटी फ्री शॉप’ या दुकान-साखळीद्वारे विकल्या जात. आंतरराष्ट्रीय कस्टम वा अन्य करमुक्त भोग्यवस्तूंच्या अशा दुकानाची कल्पना १९४७ मध्ये प्रत्यक्षात आल्यानंतरही तिचा प्रसार होत नव्हता, तो व्याप चार्ल्स फीनी यांनी रॉबर्ट मिलर यांच्यासह वाढवला. या दोघा अमेरिकी भागीदारांनी १९६० पासून तर हाँगकाँगमध्ये ‘डय़ूटी फ्री शॉपिंग ग्रूप’ (डीएफएसजी) ची स्थापना केली आणि अनेक विमानतळांवर बस्तान बसवले. यातून मिळणारा पैसा फीनी यांनी बांधकाम, मालमत्ता यांमध्ये गरजेपुरताच गुंतवला आणि मिळकतीतला बराच वाटा ते दान करत राहिले. मात्र ‘अटलांटिक फिलँथ्रॉपीज’ म्हणजे चार्ल्स फीनी, हे गुपीत १९९६ पर्यंत कायम राहिले. त्या वर्षी ‘डीएफएसजी’तील वाटा फीनी यांनी विकून टाकला, तेव्हा न्यू यॉर्क टाइम्सने या दानशूर फाऊंडेशनचा सारा पैसा फीनींचाच असल्याची बातमी फोडली. पण व्यवसायातही पैसा याच प्रतिष्ठानाचा असल्याने, करभरणा चोख होता. त्यांचे वाडवडील आयर्लंडहून अमेरिकेत आलेल्यांपैकी. त्यामुळे असेल, पण फीनी यांच्या देणग्या ‘शिन फेन’लाही मिळत. ‘शिन फेन’ हा आयर्लंडच्या ‘स्वातंत्र्या’साठी लढणाऱ्या ‘आयरिश रिपब्लिकन आर्मी’ला धार्जिणा राजकीय पक्ष! पुढे आयरिश बंडखोरांशी जेव्हा स्वायत्तता करार झाले, तेव्हा ब्रिटनने फीनी यांनाही आनंद साजरा करण्यासाठी निमंत्रित केले. आंतरराष्ट्रीय ख्याती तर त्यांना १९९६ पासून मिळतच गेली. अनेक विद्यापीठांचे, ऑस्ट्रेलिया वा आयर्लंड आदी देशांचे मानसन्मान त्यांनी स्वीकारले. कृतकृत्य जगण्याचे रहस्य म्हणजे जिवंतपणीच देत राहा, असा प्रचार ते उत्तरायुष्यात करत. २०१६ मध्ये ‘अटलांटिक फिलँथ्रॉपीज तर्फे दिलेली ही शेवटची देणगी’ म्हणत एकंदर १.२ अब्ज डॉलर त्यांनी ‘कॉर्नेल विद्यापीठा’सह विविध संस्थांना दिले. ‘साधेपणाने, एका अपार्टमेंटमध्येच ते जगले. श्रीमंतीच्या खुणा न वागवता त्यांनी जगाला समृद्ध केले,’ अशी आदरांजली त्यांना अनेकांनी वाहिली आहे.