गिरीश कुबेर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हार्वर्ड विद्यापीठाच्या अध्यक्ष क्लॉडिया गे यांनी फक्त हमासचा निषेध करून गप्प बसावं ते नाही, त्या इस्रायलविरुद्धही बोलू लागल्या. अखेर त्यांच्याबद्दल विद्यापीठाच्या संचालक मंडळानंच निर्णय घ्यावा, असं ठरलं..

अमेरिकेत सामाजिक, राजकीय जीवनावर यहुदींचा आणि त्यामुळे इस्रायलचा वरचष्मा असतो. समाजजीवनाचं एकही अंग त्या देशात असं नाही की ज्यात यहुदी प्रभावशाली नाहीत. अमेरिकेच्या रिझव्‍‌र्ह बँकेचे, ‘फेड’च्या प्रमुखपदी राहून गेलेले बेन बर्नाके, विख्यात अ‍ॅलन ग्रीनस्पॅन, प्रचंड मोठया हेज फंडचा बिल अ‍ॅकमन, माजी अध्यक्ष ट्रम्प यांची पत्नी इव्हान्का आणि जावई जेराड कुशनेर, हेन्री किसिंजर, गायक बॉब डिलन, गोल्डमॅन-सॅक ही जगातली सर्वात मोठी वित्तसंस्था आणि ‘मेट्रो गोल्डविन’ ही चित्रपट-निर्माती संस्था यांचे सर्व संस्थापक, स्टीव्हन स्पीलबर्ग, अनेक माध्यमांतले वरिष्ठ.. नावं सांगावीत तितकी कमी. अमेरिकी माध्यमं आणि वित्तसंस्था यांवर या मंडळींचं नियंत्रण नजरेत भरावं असं.

इतकं की १९१२-१३ च्या आसपास जेव्हा हेन्री फोर्ड म्हणत होते की, ‘हे यहुदी बँकर्स जागतिक महायुद्ध घडवून आणतील’ तेव्हा त्यांचं हे विधान छापायलाही माध्यमं तयार नव्हती. फोर्ड यांचं म्हणणं होतं की बँकांत अतिरिक्त पैसा जमा झालाय.. यहुदी बँकर्सना कळत नाहीये इतक्या पैशाचा विनियोग कुठे कुठे करावा. त्यामुळे हा पैसा एकगठ्ठा जाळण्यासाठी ही यहुदी बँकर्स मंडळी युद्ध घडवतील. पण हे छापणार कोण? कारण माध्यमांवर तर यहुदींचं नियंत्रण. ते इतके प्रभावी होते की फोर्डसारख्यांची विधानंही छापायला ‘नाही’ म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. अमेरिकी समाजजीवनात यहुदींचा दबाव किती असतो हे सांगणाऱ्या ‘द लॉबी’ पुस्तकाचा परिचय ‘लोकसत्ता’त ‘बुक-अप’ स्तंभात करून दिल्याचं या विषयात रस असणाऱ्यांना कदाचित आठवेल.

हेही वाचा >>> बुकमार्क : लोकशाही वर्षभर वाचली; पण..

अर्थात हे सगळेच्या सगळे लगेच यहुदींसाठी आणि म्हणून इस्रायलसाठी दबाव गट म्हणून काम करत असतात असं नाही. तसं म्हणणंही योग्य नाही. पण जरा कोणी इस्रायलविरोधात काही बोललं की काही यहुदी दबावगट कामाला लागतात. झालेली टीका कितपत गंभीर आहे, त्यामागे कोण आहे, एकटी-दुकटी व्यक्ती की काही संघटना/राजकीय पक्ष यात गुंतलेत असा ‘शोध’ सुरू होतो. कुजबुज आघाडी कामाला लागते. टीका फारच तीव्र आणि इस्रायलवर परिणाम करणारी असेल तर लगेच ‘टीकाकार ‘अँटी-सेमिटिझम’ गटातला आहे,’ असे हाकारे द्यायला सुरुवात होते. अँटी-सेमाइट म्हणजे यहुदीविरोधी. एका अर्थी हे एखाद्याला जातीयवादी म्हणण्यासारखं आहे. या संकल्पनेचा उगम अर्थातच हिटलरच्या जर्मनीतला. त्या देशात यहुदी ही एक ‘जमात’ – सेमाइट – मानली गेली. जसे कृष्णवर्णीय-विरोधी म्हणजे व्हाइट सुप्रीमसिस्ट तसे यहुदीविरोधी म्हणजे अँटी-सेमाइट. हिटलरच्या काळात या यहुदीविरोधकांनी किती भीषण अत्याचार केले त्याच्या करुण कहाण्या आजही अंगावर काटा आणतात.

पण म्हणून यहुदीविरोधातली प्रत्येक टीका ही काही वांशिक विचारांतून झालेली नसते. पण एकदा का एखाद्याला अँटी-सेमाइट म्हटलं की ती व्यक्ती एकदम कानकोंडी होते. आपल्याकडे एखाद्याला दलितविरोधी वा ब्राह्मणविरोधी म्हणण्यासारखं हे. तसे आरोप होऊ लागले की परिस्थिती त्या व्यक्तीसाठी किती हळवी होते याचे अनेक अनुभव आपल्याकडे आढळतील. अमेरिका वा युरोपात तसे अँटी-सेमिटिझमचे सापडतील. त्यात आता नुकतीच एक भर पडली.

हेही वाचा >>> अन्वयार्थ : ग्रँडमास्टर भावंडांत थोरली!

तीदेखील जागतिक पातळीवरच्या अत्यंत प्रतिष्ठित अशा हार्वर्ड विद्यापीठात. त्या विद्यापीठाच्या अध्यक्ष क्लॉडिया गे यांच्या बाबतीत हा प्रकार घडला. गेबाई आफ्रिकी आहेत. कृष्णवर्णीय. ही बाब अशासाठी नमूद केली की या वर्गाला वंशवादाच्या वेदनांची झळ बसलेली असते. त्यांतून त्यांची मतं बनलेली असतात.

हमास’च्या निषेधानंतर..

तर झालं असं की ७ ऑक्टोबरला ‘हमास’नं इस्रायलींवर भयानक हल्ला करून १४०० जणांचा हकनाक जीव घेतला. त्याचे तीव्र पडसाद जगभर उमटले. ‘हमास’चा सार्वत्रिक निषेध झाला. तसा तो या विद्यापीठातही झाला. अमेरिका, इंग्लंड इथली विद्यापीठे चळवळया विद्यार्थ्यांच्या उद्योगांनी सतत सळसळत असतात. अमेरिकेतली अख्खी कृष्णवर्णीय चळवळ ही या विद्यापीठांतनं आकाराला आली. साठच्या दशकात अमेरिकी विद्यापीठांत ‘ब्लॅक पँथर’चा मोठा झंझावात होता. (आपल्याकडच्या दलित पँथर्सचं मूळ या ‘ब्लॅक पँथर्स’मध्ये आहे.) त्या देशांचं वैशिष्टय असं की विद्यापीठांचं प्रशासन स्थानिक असो वा राष्ट्रीय. ते या विद्यार्थ्यांना ‘राजकारणापासून दूर राहा’, ‘अभ्यासावर लक्ष केंद्रित करा’, ‘चळवळींत सहभागी होऊ नका’ वगैरे उपदेशामृत पाडायला अजिबात जात नाहीत. वास्तविक राजकारणापासून दूर राहा यासारखा थोतांड सल्ला नाही आणि ‘मला राजकारणातले काही म्हणजे काही कळत नाही’ यासारखी लोणकढी नाही. असो.

तर या हमासच्या कृतीमुळे हार्वर्डही ढवळून निघालं. कोणत्याही विषयावर असतात तसे इथेही दोन तट होते. एक पॅलेस्टिनींचा. आणि दुसरा इस्रायलींचा. यातल्या दुसऱ्या गटाने ‘हमास’चा कसा नि:पात व्हायला हवा वगैरे मागण्या सुरू केल्या. त्या योग्य असल्यानं त्यांना पाठिंबाही मिळत गेला. पण नंतर इस्रायलचा लष्करी वरवंटा फिरू लागला आणि जनमत त्या देशाविरोधात जायला लागलं. इस्रायल अतिच करतोय असा साक्षात्कार अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेनबाबा यांनाही आता झालाय. नवीन पिढीला तो आधीच होत होता. त्यामुळे इस्रायलविरोधातही आणि मुख्य म्हणजे पॅलेस्टिनींच्या बाजूनं जनमत गोळा होऊ लागलं. ‘हमास’ म्हणजे पॅलेस्टाइन नव्हे, ‘हमास’चा बीमोड करा, पण सामान्य पॅलेस्टिनींना किती छळणार, हा मुद्दा समोर येऊ लागला. तो मांडणाऱ्यांचा आवाजही वाढू लागला.

आणि क्लॉडिया गे यांनी या आवाजांत आपला आवाज मिसळला. हमासच्या दहशतवादाचा त्यांनी धिक्कार केलाच; पण नंतरच्या इस्रायलच्या अमानुष वागण्याविरोधातही त्यांनी आपली मतं ठामपणे मांडली. झालं..! वादळच उठलं त्यामुळे. अमेरिकेतल्या अन्य माध्यमांप्रमाणे हार्वर्डच्या अंतर्गत नियतकालिकातही इस्रायलींचं प्राबल्य आहे. त्या दैनिकानं आपल्याच विद्यापीठाच्या अध्यक्षांविरोधात भूमिका घेतली. गेबाईंना त्यानं काहीही फरक पडला नाही. त्या अधिक जोमानं इस्रायलविरोधात बोलू लागल्या. बाहेरच्या माध्यमांनी विचारल्यावर आपलं मत मांडायला जराही त्यांनी कमी केलं नाही. त्या बोलत गेल्या.

आणि व्यवस्थापन अधिकाधिक अस्वस्थ होत गेलं. त्याला कारणही तसं आहे. हॉर्वर्डचे मोठमोठे देणगीदार रिपब्लिकन पक्षाशी निगडित आहेत आणि हा पक्ष पूर्णपणे इस्रायलवादी आहे. या सगळय़ांनी गेबाईंना अडचणीत आणण्यासाठी आपला ठेवणीतला आरोप काढला.

‘क्लॉडिया गे या अँटी-सेमाइट आहेत’. त्या कशा इस्रायलविरोधी आणि म्हणून पॅलेस्टिनवादी आहेत, त्यांना इस्रायलविरोधात जो नरसंहार झाला त्याविषयी काहीही ममत्व नाही वगैरे आरोप होऊ लागले. त्याची तीव्रता इतकी वाढली की हा मुद्दा राष्ट्रीय स्तरावर गेला. अमेरिकी प्रतिनिधीगृहाला यावर सुनावणी घेण्याची गरज वाटली. त्या देशातल्या महत्त्वाच्या दैनिकांत, आंतरराष्ट्रीय माध्यमांत यावर वाद सुरू झाले. त्यातूनच मोहीम सुरू झाली : गेबाईंना हाकलून द्या! यात आघाडीवर होते रिपब्लिकन पक्षाचे अब्जाधीश देणगीदाते. पहिल्या परिच्छेदात उल्लेखलेले बिल अ‍ॅकमन हे यातले बिनीचे वीर. त्यांनी तर पण केला. गेबाईंना काढणं हे त्यांचं एकमेव उद्दिष्ट बनलं. रिपब्लिकनांनी इतकं काहूर माजवल्यावर डेमॉक्रॅट्सची अडचण झाली. या बाईंना पाठिंबा द्यायचा तरी कसा असा प्रश्न निर्माण झाला. त्यातूनच मागणी पुढे आली. हॉर्वर्डच्या संचालक मंडळाची बैठक बोलवून तीत या बाईंबाबत निर्णय घ्यायला लावायचा. दोनच दिवसांपूर्वी ही संचालक मंडळाची बैठक झाली. त्यांनी एकमताने निर्णय घेतला..

क्लॉडिया गे यांच्या पाठीशी उभं राहण्याचा. त्यांनी पायउतार होण्याची अजिबात गरज नाही, असं संचालकांचं मत पडलं. देणगीदारांच्या मतांना त्यांनी केराची टोपली दाखवली.

त्याआधी दोन दिवस आपल्याकडे बातमी होती काही विद्यापीठांत विद्यार्थी निदर्शनांवर, राजकीय चळवळींवर, पत्रकांवर वगैरे बंदी घालण्याची. तरीही ‘सा विद्या या विमुक्तये..’ असं आपण आपलं म्हणत राहू या!

girish.kuber@expressindia.com     

@girishkuber

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Israel hamas war article about harvard university president claudine gay israel comments zws