गाझा पट्टीमधील पॅलेस्टिनी नागरिकांसाठी जवळपास साडेसहा टन औषधसामग्री आणि ३२ टन संकट निवारण सामग्री घेऊन भारतीय हवाईदलाचे विमान रविवारी रवाना झाले. ही मदत इजिप्तमार्गे लवकरच गाझा पट्टीमध्ये दाखल होईल. सध्या गाझातील युद्धग्रस्तांसाठी आंतरराष्ट्रीय मदत पाठवण्याचा हाच एकमेव मार्ग इस्रायलकडून खुला झाला आहे. गेल्या शनिवारी म्हणजे ८ ऑक्टोबर रोजी हमास या पॅलेस्टिनी दहशतवादी संघटनेने इस्रायली हद्दीत घुसून विविध वस्त्या आणि एका सांगीतिक कार्यक्रमात केलेल्या हल्ल्यामुळे शेकडो इस्रायली नागरिक ठार झाले. अनेक इस्रायलींचे अपहरण करून त्यांना ओलीसही ठेवण्यात आले. या हल्ल्याचा ‘बदला’ घेण्यासाठी इस्रायलकडून गाझा पट्टीवर सुरू झालेल्या हवाई आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर जीवित व वित्तहानी होते आहे. अनेक वस्त्या जमीनदोस्त होत असून शेकडोंनी नागरिक बेघर होत आहेत. अशा परिस्थितीत संयुक्त राष्ट्रांसह अनेक देशांनी सर्वसामान्य पॅलेस्टिनींच्या दुर्दशेबद्दल रास्त चिंता व्यक्त केली. तशी ती भारतानेही व्यक्त केली. पण केवळ तेवढय़ावर न थांबता भारताने औषध आणि मदतसामग्री पाठवली, याचे स्वागत केले पाहिजे. नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटांच्या काळात मानवतावादी मदत आणि पथके पाठवण्यात भारताने नेहमीच पुढाकार घेतला आहे. ताजी घटना हा या मालिकेतील प्रयत्नांचाच एक भाग म्हटला पाहिजे. सध्याच्या काळात भारतीय स्थलांतरित जगाच्या कानाकोपऱ्यांत स्थिरावलेले असल्यामुळे कोणत्याही संकटकाळात संबंधित प्रदेशांतून या नागरिकांना सुरक्षित मायदेशी आणण्यास आपले प्राधान्य असते. ती जबाबदारी आपण अतिशय कार्यक्षमतेने पार पाडतोच. पण काही जबाबदाऱ्या राष्ट्रीयत्वापलीकडे विचार करून पार पाडावयाच्या असतात. पॅलेस्टाईनला म्हणजे संघर्षग्रस्त गाझा पट्टीतील पॅलेस्टिनींना ही मदत पोहोचवून आपण या उदात्त परंपरेची अनुभूती दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा