गाझामधून हमास नामशेष केल्याशिवाय आमची कारवाई थांबणार नाही, अशी गर्जना इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी पुन्हा केली आहे. गाझातून हमासचा समूळ नायनाट, गाझा टापूचे संपूर्ण निर्लष्करीकरण आणि पॅलेस्टाइनमधून इस्लामी मूलतत्त्ववादाचे उच्चाटन ही या कारवाईवजा युद्धाची तीन उद्दिष्टे असल्याचे नेतान्याहूंनी ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’मध्ये सोमवारी प्रकाशित झालेल्या लेखात म्हटले आहे. ते सोमवारीच दुसऱ्यांदा युद्धोत्तर गाझामध्ये जाऊन आले. युद्ध अद्याप संपलेले नाही. आपण संपवल्याशिवाय त्याचा अंत संभवत नाही. तसेच शस्त्रविरामाबाबत इस्रायल अनुकूल असल्याच्या काही माध्यमांनी चालवलेल्या बातम्या तथ्यहीन असल्याचे नेतान्याहूंनी त्यांच्या लिकुड पक्षाला पाठवलेल्या संदेशात म्हटले आहे. याचा अर्थ गाझातील अपरिमित जीवितहानीचे सत्र थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाकडून येत असलेल्या दबावाला नेतान्याहूंनी पुन्हा एकदा झुगारून दिले आहे. इस्रायलचा बारमाही मित्र असलेल्या अमेरिकेनेही नेतान्याहू सरकारला शस्त्रविरामाबाबत आणि जीवितहानी अधिकाधिक टाळण्याबाबत खंडीभर पोक्त सल्ले दिले. या सल्ल्यांचा अजिबात उपयोग झालेला दिसत नाही. परंतु हे सल्ले एकीकडे देत असताना, संयुक्त राष्ट्रांच्या इस्रायलविरोधी ठरावांमध्ये नकाराधिकार वापरणे अमेरिकेनेही सोडलेले नाही. त्यामुळे सद्य:स्थितीत नेतान्याहूंवर ना अमेरिकेचा अंकुश आहे ना संयुक्त राष्ट्रांचा. त्यांच्यावर दबाव असेलच, तर तो एतद्देशीयांचा आणि स्वपक्षीयांचाच. इस्रायलच्या इतिहासातील सर्वात कडव्या उजव्या विचारसरणीच्या सरकारच्या अमदानीतच हमासकडून आजवरचा सर्वाधिक नृशंस हल्ला इस्रायलच्या नागरिकांवर व्हावा हा जसा योगायोग नाही, तसाच याच सरकारातील काहींच्या दबावामुळे हमासविरोधी कारवाई हजारोंच्या प्राणांची किंमत देत दीर्घकाळ सुरू राहते हाही योगायोग नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> दिल्लीत इस्रायली दूतावासाजवळ स्फोट, घटनास्थळी राजदूतांच्या नावाने पत्र अन्…, स्पेशल सेलकडून तपास सुरू

ज्या हमासविरोधात इस्रायलची कारवाई सुरू आहे, त्या संघटनेच्या एकाही महत्त्वाच्या म्होरक्यास इस्रायलला अद्याप जेरबंद करता आलेले नाही. हमासचे अनेक लष्करी कमांडर इस्रायलच्या प्रतिहल्ल्यांमध्ये ठार झालेले आहेत; तरीही राजकीय नेतृत्व ठेचले जात नाही तोवर हमास शरणागती पत्करणार नाही. इस्रायलच्या दृष्टीने परिस्थिती नाजूक आहे, कारण अद्याप १३० इस्रायली ओलीस हमासच्या ताब्यात आहेत. त्यांना सोडवण्यासाठी लष्करी कारवाई सुरूच ठेवावी लागणार, असे नेतान्याहूंनी म्हटले आहे. परंतु अशाच एका कारवाईत १५ डिसेंबर रोजी तीन ओलीस मारले गेले होते. त्यामुळे या कारवाईचे नेमके फलित काय, याचा हिशेब नेतान्याहूंना किमान इस्रायली जनतेसमोर मांडावाच लागेल. तो मांडता येत नाही यासाठीच अधिकाधिक काळ कारवाई लांबवली जात आहे. काही दिवसांनी यापायी होणाऱ्या मनुष्यहानीची गणती थांबवावी लागेल अशी स्थिती आहे. उदा. गाझातील मनुष्यहानी गेल्याच आठवडयात २० हजारांपलीकडे गेल्याचे पॅलेस्टिनी प्रशासन आणि आंतरराष्ट्रीय मदत संघटनांनी म्हटले होते. ‘रॉयटर्स’ वृत्तसंस्थेच्या ताज्या आकडेवारीनुसार सोमवार रात्रीपर्यंत २०,७०० गाझावासी मारले गेले होते. यातील २५० हे गेल्या २४ तासांत मारले गेले. त्यातीलही १०० एका रुग्णालयावरील हल्ल्यात दगावले. मध्य गाझातील हे रुग्णालय अनेक निराधार, बेघर गाझावासीयांचे आश्रयकेंद्र होते. ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलमध्ये हमासने अनेक ठिकाणी केलेल्या हल्ल्यांत जवळपास १२०० इस्रायली नागरिक ठार झाले होते. तर २७ ऑक्टोबरपासून इस्रायलने गाझामध्ये सुरू केलेल्या लष्करी कारवाईदरम्यान सोमवापर्यंत १५४ इस्रायली सैनिक ठार झाले होते. या मृतांच्या नातेवाईकांचा, ओलिसांच्या नातेवाईकांचा दबाव नेतान्याहू सरकारवर आहेच. त्यामुळेदेखील कारवाईमध्ये ढिलाई येण्याची शक्यता मंदावली आहे. परंतु या सगळया घटकांपेक्षा अधिक धोकादायक ठरतो आहे तो नेतान्याहू सरकारचा धोरणगोंधळ. इस्रायलच्या कारवाईतून आजवर केवळ एका इस्रायली ओलिसाची सुखरूप मुक्तता झालेली आहे. उलट तिघांचा बळी गेला आहे. लष्करी कारवाईपेक्षा किती तरी अधिक ओलीस शस्त्रविरामाच्या काळात सुखरूप परतले आहेत. शस्त्रविरामासाठी हमास आग्रही आहे. कारण ओलिसांच्या बदल्यात हमासच्या हस्तकांचीही इस्रायली तुरुंगातून सुटका झाली. पण शस्त्रविराम इस्रायलला नको आहे. गाझातील बोगद्यांमध्ये दडून बसलेल्या हमासच्या अतिरेक्यांना वेचून बाहेर काढू, असे कारवाईच्या सुरुवातीस सांगण्यात आले. ते उद्दिष्ट अद्याप सफल झालेले नाही. हमासशी चर्चेबाबतही सातत्य दिसत नाही. कतारच्या पुढाकाराने सुरू झालेल्या वाटाघाटींमध्ये सहभागी होण्यास नकार देणाऱ्या इस्रायलने पुढे गोपनीयरीत्या वाटाघाटी सुरू ठेवल्याच. हमासचा पराभव केल्यानंतर गाझाच्या प्रशासनाबाबत कोणती भूमिका राहील, हजारो गाझावासीयांना पूर्वायुष्य सुरू करण्यासाठी कशी मदत करणार याबाबतही गोंधळ आहे. या सगळया मुद्दयांवरून हमासपेक्षा नेतान्याहूंचीच कोंडी झालेली दिसून येते. पण कोंडीत सापडलेले नेतान्याहू अधिक संहारक ठरत आहेत हे पॅलेस्टाइन आणि इस्रायलचेही दुर्दैव!

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Israel pm netanyahu article warn hamas published in the wall street journal zws