‘कॅम्प’ याच नावानं कला-प्रदर्शनांत सहभागी होणारं एक जोडपं मुंबईत आहे. शायना आनंद आणि अशोक सुकुमारन ही त्या दोघांची नावं. या दोघांनी सामाजिक स्थितीच्या ‘दृश्य’ आकलनाचा एक भारी मार्ग वापरला – ‘आकलनविषय’ ठरणाऱ्या समाजातल्याच माणसांना मोबाइल कॅमेऱ्यांतून शूटिंग करायला सांगायचं, ते तुकडे मग ‘कॅम्प’नं जोडायचे. अरबी समुद्रातून साध्या लाकडी लाँचमधून थेट सोमालियापर्यंत मालवाहतूक करणाऱ्या खलांशाच्या साथीनं या ‘कॅम्प’नं सिद्ध केलेला जीवनानुभवपट ‘डॉक्युमेण्टा’ महाप्रदर्शनात (२०१२) दाखवला गेला होता. याच प्रकारे, इस्रायली ‘सेटलर’ लोकांच्या वाढत्या पसाऱ्याच्या छायेत राहणाऱ्या सात पॅलेस्टिनी लोकांकडून २००९ ते २०११ या काळातलं सीसीटीव्ही मोबाइल- ध्वनिचित्रमुद्रण ‘कॅम्प’नं मिळवलं होतं! ‘नेबर बिफोर द हाउस’ या नावानं तो लघुपट काही कला-प्रदर्शनांत प्रदर्शित झाला. या ‘कॅम्प’च्या एकंदर कामाबद्दल जितकं लिहावं तितकं कमीच; पण सध्या महत्त्वाचं हे की, पॅलेस्टिनींबद्दल इतकी आस्था असलेल्या या ‘कॅम्प’वाल्या कलावंतांनी याएल बर्ताना हिचा कार्यक्रम मुंबईत ठेवला होता. डिसेंबर २०१७ मध्ये हा कार्यक्रम मरोळच्या सिनेपोलीस सिनेमागृहात झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आता मुख्य विषय…

याएल बर्ताना हिनं कधीतरी (मुंबईत नाही), स्वत:ची ओळख ‘देशाच्या राजकीय सीमा न मानणारी ज्यू दृश्यकलावंत’ अशीही करून दिली होती. तिनं फोटोग्राफीची पदवी इस्रायलमधूनच घेतली. पुढं शिकायला मात्र न्यू यॉर्कला गेली, तिथून अॅमस्टरडॅमच्या ‘राइक्सअकॅडमी’त… या शिक्षणानंतर तिनं कल्पित असूनही सामाजिक/ राजकीय वास्तवाशी जबरदस्त संबंध असणारे लघुपट साकारले. राजकीय दुराग्रहांना त्यातून आव्हान दिलं. त्याहीपेक्षा, ‘‘सांस्कृतिक ओळख आणि राष्ट्रवाद, वंश/ धर्म आणि राष्ट्रवाद यांचा चोथाच चघळून स्वत:चं आणि इतरांचंही नुकसान करणारे लहानपणापासून पाहिलेत मी’’ असं काहीतरी कलाप्रेक्षकांच्या डोळ्यांना तिच्या या कलाकृती सांगू लागल्याचा अनुभव आठवतो आणि याएल बर्तानाबद्दलचा आदर वाढतो.

हेही वाचा >>> भूगोलाचा इतिहास : धरतीची जन्मकथा

तिच्या कलाकृती बऱ्याच आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांत, बिएनालेत वगैरे प्रदर्शित झाल्या आहेत. व्हेनिस बिएनालेत २०११ साली तिची ‘अॅण्ड युरोप विल बी स्टन्ड’ ही लघुपटत्रयी पोलंडच्या दालनात होत्या (या एकेका देशाच्या दालनासाठी ‘पॅव्हिलियन’ (इटालियन- ‘पादिग्लिऑन’) हा व्हेनिस बिएनालेत हमखास वापरला जाणारा शब्द). ‘पोलंडहून दुसऱ्या महायुद्धकाळात बऱ्याच ज्यूंना स्थलांतर करावं लागलं. हे पोलंडला मायभूमी मानणारे ज्यू होते… अशा मूळ पोलिश ज्यूंची संख्या आज ३३ लाख आहे. ते सारे ज्यू लोक आपल्या मायभूमीत परत येऊन इथेच पोलंडमध्ये राहावेत, अशी आमच्या ‘ज्यूइश रेनेसाँ मूव्हमेंट इन पोलंड’ (जेआरएमआयपी) नामक चळवळीची मागणी आहे’ अशी या कलाकृतीमागची कल्पना! ती कपोलकल्पित नाही… वास्तवाशी तिचा संबंध आहे, पण ‘जेआरएमआयपी’ ही चळवळ मात्र कल्पित. पोलंडमध्येच राहणारा एक वयस्कर ज्यू कार्यकर्ता आहे- या त्रयीपैकी एका लघुपटाचा बराचसा भाग त्याच्या भाषणाचा- ‘‘हीच आमची मायभूमी, इथंच आम्ही नांदू- इथून जावं लागलेल्यांनीही परत यावं’’वगैरे एकदम फर्डं भाषण. ते त्याच्या कळकळीतून आलेलं, खरंखुरं. पण मुळात ‘इस्रायल हीच आमची आश्वासित भूमी’ म्हणत तिथं गेलेल्या ज्यूंना कोणी परत आणणार नाही, त्याअर्थी याएल बर्तानाची ही कलाकृती कल्पितावरच आधारलेली. तरीही अस्वस्थ करणारी. मायभूमी म्हणजे काय, देश कोणाचा असतो किंवा असायला हवा, जी बापजाद्यांनी पाहिलीसुद्धा नाही अशा भूमीला ‘आमची हक्काची भूमी’ म्हणत तिथलेच होण्यात- वर त्याचा दुरभिमान बाळगण्यात काय अर्थ आहे… असे प्रश्न या लघुपट त्रयीनं निर्माण केले. याएल बर्ताना स्वत: बर्लिन आणि अॅमस्टरडॅम इथं राहाते. तिनं पोलंडमध्ये २००७ पासून या लघुपटत्रयीचं काम करण्यासाठी बऱ्याच चकरा मारल्या, इतकंच.

पण खुद्द पोलंडमध्ये मात्र या त्रयीला विरोध झाला. वास्तविक पोलंडच्या ‘पॅव्हिलियन’मध्ये ही कलाकृती असल्यानं, ‘आमच्या देशातर्फे ही कलाकृती आम्ही व्हेनिसच्या द्वैवार्षिक महाप्रदर्शनात यंदा धाडतोय’ असं विधान आधीच झालेलं होतं. त्यावर पोलंडच्या एका मंत्र्यांनी कठोर टीका केली. आजतागायत पोलंडमध्ये या कलाकृतीचं जाहीर प्रदर्शन झालेलं नाही. थोडक्यात, २०११ मध्येच पोलंडच्या बहुसंख्याकांनी ‘कधीकाळी इथून गेलेले लोक आता परत आले, तर आम्ही त्यांना स्थलांतरितच मानणार’ – असा पवित्रा घेतला होता! गंमत म्हणजे, इस्रायलमध्ये मात्र ही लघुपटत्रयी खुश्शाल प्रदर्शित होऊ शकली (तेव्हाही तिथं नेतान्याहूच सत्ताधीश होते)- कदाचित तिथल्या लोकांना या कलाकृतीतले प्रश्न जाणवलेच नसतील का? यानंतरही याएल बर्तनानं अनेक प्रकारच्या कलाकृती केल्या असतील, त्यापैकी पाहायला मिळालेली कलाकृती पुन्हा व्हेनिसच्या बिएनालेतच- यंदाच्या खेपेला हिचीच कलाकृती- पुन्हा फिल्मच- जर्मनीच्या दालनात होती!

चक्रावणारी कलाकृती

ती पाहून मात्र अक्षरश: चक्रावलो. एक भलीथोरली अवकाश-वसाहत. मोठ्ठ्या यानातली. तिची प्रतिकृती या पॅव्हिलियनच्या एका भागात होती. तर पुढला बहुतांश भाग याएल बर्तानाच्या फिल्मनं व्यापलेला होता. अंतराळातल्यासारखा अंधार, मधूनच कवडशांसारखा स्वप्नवत् प्रकाश, झाडझाडोरा, हिरवळ… त्या हिरवळीवर फेर धरून नाचणाऱ्या आणि ज्यूं महिलांच्या जुन्या पोशाखासारखा पांढरा झगा घातलेल्या महिला… त्यांच्याबरोबर नंतर पुरुषही, पण त्यांचेही पोशाख प्राचीन ज्यूंचे वाटावेत असे… फेर धरणाऱ्या त्या साऱ्याजणांमध्ये एक घट्ट समूहजाणीव दिसते आहे. एकेकाचे चेहरे/ हातपाय अतिसमीपदृश्यात दिसतात, व्यक्तित्वं निरनिराळी लक्षात येतातही, पण हा समूहच आहे. व्यक्तिजाणीव लोप पावली आहे इथं. या समूहातच स्त्री-पुरुष जोडीचा अगदी सूचक प्रेमालाप नाचता नाचताच दिसतो, पण ते काही समूहाच्या विरुद्ध जाणारं, समूहजाणिवेला आव्हान देणारं व्यक्तिस्वातंत्र्यवादी वर्तन नव्हे. तेवढ्यात कुणीसा लांबून येतो. धावत. तो या समूहासारखा गोरा नाही, पण त्यालाही सामावून घेतलं जातं. मग या समूहात कशी कुठून कोण जाणे पण एखादी आफ्रिकावंशीय स्त्रीदेखील दिसू लागते. त्याहीनंतर काहीजण, प्राण्यांचे मुखवटे घालून इथे सहभागी! हे अन्यवंशीय, अन्यप्रजातीय त्या समूहात स्वेच्छेनं सामील झालेत (हे पाहाताना मला, इस्रायलमधल्या भारतीय बेने इस्रायलींना, आपल्या कोकणात ‘शनवारतेली’ म्हणून राहिलेल्यांच्या वंशजांना तिथं गेल्यास सूक्ष्मसाही वंशभेद सहन करावा लागलाच नसेल का, अशी शंका चाटून गेली आणि ती खोटी ठरो असंही प्रामाणिकपणे वाटून गेलं) …

… पण हे एकंदर काय चाललंय काय? कबूल की, ही कदाचित त्या प्रचंड जगड्व्याळ अशा अंतराळ-वसाहतीतल्या सुखी कल्पप्रदेशाची (नुसता कल्पित प्रदेश नाही- कल्पवृक्षासारखा सारं काही देणारा प्रदेश किंवा ‘युटोपिया’) छान छान गोष्टच वाटते आहे पहिल्यांदा. पण ज्यूंना आपल्या फिल्ममधून अस्वस्थ प्रश्नांचे चिमटे काढण्याचं याएल बर्तानाचं कसब इथं या कलाकृतीत अजिबातच कसं दिसत नाही? कुठे गेलं ते? बरं ही फिल्म जर्मनीच्या पॅव्हिलियनमध्ये विराजमान आहे. ज्यूंनी इतरांबाबत केलेली एखादी विशिष्ट कृती ही ‘अत्याचार’ या सदरात मोडणारीसुद्धा ठरू शकते, हे मान्यच करायला तयार नसणाऱ्यांपैकी महत्त्वाचा देश जर्मनी. आपल्या (म्हणजे भारतीय) रणजीत होस्कोटे यांनी कधीकाळी पॅलेस्टाइन-समर्थनाच्या एका कुठल्याशा स्वाक्षरीमोहिमेत सहभाग नोंदवल्याचा दिव्य शोध कुणालातरी लागला, म्हणून याच जर्मनीत भरणाऱ्या ‘डॉक्युमेण्टा’च्या आगामी (२०२७) आवृत्तीसाठी गुंफणकार निवडणाऱ्या समितीत होस्कोटेंचा सहभाग असल्याबद्दल व्यर्थ वाद निर्माण करण्याचा प्रयत्नही गेल्याच नोव्हेंबरात झाला होता. मग अख्ख्या निवड समितीनं राजीनामे दिले, आता नवीन समिती नेमलीय वगैरे… अशा काहीबाही ‘कलाबाह्य’ विचारांचं काहूरच माजत होतं डोक्यात, त्या ‘ज्यू पोशाखा’तल्यांना नाचताना पाहून. तरीसुद्धा आपण पाहतो आहोत, पडद्यावर दिसतंय त्यापासून हलता येत नाहीये, हेही जाणवत होतंच. भिन्नवंशीयांना त्या नृत्य-वर्तुळात सामावून घेतलं जाताना पाहून बरंही वाटत होतं. पण हा वाटण्या- जाणवण्याचा खेळ कुठे नेणारी कलाकृती आहे ही, याचं उत्तर व्हेनिसहून परतल्यावर आपसूक कधी कधी, या कलाकृतीची आठवण आल्यावर मिळू लागलं. ‘हे लोक अंतराळालासुद्धा ‘आपली वसाहत’ समजणार का?’ अशा असमंजस आकलनापासून सुरू झालेला तो व्हेनिसनंतरचा प्रवास आताशा ‘प्रत्येकालाच अशा कल्पप्रदेशाची ओढ असते आणि या कल्पप्रदेश- वास्तव्याच्या ऊर्मीचं दृश्यरूप याएल बर्ताना दाखवतेय’ इथं पोहोचलाय. ‘तिरस्कार माणसाचा नव्हे, दुर्गुणाचा करा’ हे टिपिकल सुभाषित याएल बर्तानाच्या या कलाकृतीतून ‘तारीफ कुणा समूहाची नव्हे, त्याच्या मानवी आकांक्षांचीच करा आणि तीसुद्धा जर या आकांक्षा अहिंसकपणे, विश्वबंधुत्व जपून व्यक्त झाल्या तरच करा’ असं दिसू लागलं. नंतर (जून/जुलैत) तिची एक मुलाखत वाचली. ‘युटोपिया अयोग्य माणसांच्या हाती जाणं अति धोकादायक’ असं ती म्हणते आहे! हे वाचून हायसं वाटलं. मुंबईत ‘कॅम्प’तर्फेच तिला पुन्हा निमंत्रण मिळू शकतं, याची खात्री वाटली.

‘कुठून कुठे जाणार हे इस्रायली?’ या प्रश्नावर ‘छळाकडून बळाकडे!’ हे उत्तर अनेक मराठी भाषकांच्या मेंदूंमध्ये कोरलं गेलं असेल… ते उत्तरही बदलत राहिलं तर बरंच. पण याएल बर्तानाच्या या कलाकृती असतानाचं माझं आकलन नंतरच्या दोन महिन्यांत कुठून कुठे गेलं, याचं समाधान सध्या अधिक आहे.

छायाचित्र : अभिजीत ताम्हणे

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Israeli artist yael bartana art and painting zws