हमासविरोधी कारवाईसाठी इस्रायलमध्ये पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी सर्वसहमतीने स्थापन केलेल्या आणीबाणी सरकारमध्ये मतभेद उफाळू लागले आहेत. आणीबाणी सरकार आणि या सरकारातील युद्ध मंत्रिमंडळाचे एक सदस्य बेनी गांत्झ यांनी रविवारी राजीनामा दिला. तो त्यांनी अचानक दिलेला नाही. त्याविषयी त्यांनी साधारण महिन्याभरापूर्वीच इशारा दिला होता. बेनी गांत्झ हे नेतान्याहूंचे राजकीय शत्रू क्रमांक एक आहेत. नॅशनल युनिटी ही त्यांची आघाडी गेली काही वर्षे नेतान्याहूंच्या लिकुड पक्षाविरुद्ध लढते आहे. इस्रायली कायदेमंडळाच्या (क्नेसेट) एका निवडणुकीत या आघाडीला सर्वाधिक जागाही मिळाल्या होत्या. पण तरीही गांत्झ यांना आघाडी सरकार स्थापता आले नव्हते. ते इस्रायलचे एकेकाळचे लष्करप्रमुख आणि संरक्षणमंत्री. त्यामुळे खरे तर अधिक युद्धखोर असायला हवेत. पण गांत्झ तसे नाहीत. ते नेमस्त आणि विचारी आहेत. नेतान्याहूंना राजकीय पर्याय देण्यासाठी गांत्झ यांचे प्रयत्न सुरू असतात. तरीही वेळ पडल्यास राजकीय विरोध विसरून नेतान्याहूंच्या राष्ट्रीय सरकारमध्ये सहभागी होण्यास ते तयार असतात. मागे २०२०मध्ये करोनाकाळात ते अशा प्रकारे सरकारमध्ये सहभागी झाले होते. राष्ट्रीय आपत्तीच्या काळात राजकीय विरोध बाजूला ठेवून एकदिलाने संकटांचा सामना करणे प्राधान्याचे ठरते, ही त्यामागील भूमिका. गतवर्षी ७ ऑक्टोबर रोजी झालेल्या हमासच्या हल्ल्यानंतर आणीबाणी सरकार स्थापण्यात आले आणि त्यातही गांत्झ सहभागी झाले. त्यांच्या या निर्णयाचे स्वागत झाले होते. कारण त्यांच्या रूपाने युद्ध मंत्रिमंडळाला मध्यममार्गी चेहरा मिळाला होता. मात्र नेतान्याहूंशी त्यांचे अनेक मुद्द्यांवर खटके उडत होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा