डॉ. उज्ज्वला दळवी

समाजमाध्यमांवरलं (अ)ज्ञानग्रहण आता नेहमीचंच; पण आरोग्याबाबत अशा मिथ्या माहितीवर डोळे झाकून विश्वास ठेवणं धोक्याचं ठरू शकतं..

kartik aaryan on his dating life
कार्तिकने रिलेशनशिपच्या चर्चांवर सोडलं मौन; म्हणाला, “मी तर…”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
shukra guru gochar 2024 in dhanu vrushabha astrology
७ नोव्हेंबरनंतर ‘या’ तीन राशींचे नशीब उजळणार, गुरु शुक्राच्या राशी बदलाने मिळणार भरपूर सुख अन् आर्थिक लाभ
Akshay Kumar And Shreyas Talpade
“पहिल्या दिवसापासून त्याने मला…”, श्रेयस तळपदेने सांगितला अक्षय कुमारबरोबर काम करण्याचा किस्सा; म्हणाला…
Meenakshi Seshadri
“चित्रपटाच्या करारावर सही…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या ‘त्या’ गोष्टीमुळे कोसळले होते रडू; मीनाक्षी शेषाद्री आठवण सांगत म्हणाली, “त्यामुळे मी रडत…”
maharashtra assembly election
“लोकसभेला साहेबांना खूश केलं, आता विधानसभेला मला खूश करा”; अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन!
Shani Dev Margi 2024
१५ नोव्हेंबरपासून शनी होणार मार्गी; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळेल प्रत्येक कामात यश
Kartik Aaryan
“एक वेळ अशी होती की…”, कार्तिक आर्यनने सांगितली संघर्षाच्या काळातील आठवण; म्हणाला…

‘एमआरएनए- लशीमधून कोविड विषाणूचा सर्वात घातक जनुक आपल्या शरीरात घुसतो’; त्याने ‘आपल्या जनुकांत कायमचे दोष निर्माण होतील’, ‘कोविडचा फैलावच होईल’, ‘हार्ट अ‍ॅटॅक येईल.’ अशा संदेशांचा आंतरजालातल्या व्हॉट्सअ‍ॅप -इन्स्टाग्राम- फेसबुक वगैरे माध्यमांतून अजूनही भडिमार सुरू आहे.

 एकविसाव्या शतकात सार्स, एमआरएसए, एबोला, कोविड यांसारख्या भयानक साथी एकीमागोमाग आल्या. कोविडबद्दल शास्त्रज्ञांनाही काही माहिती नव्हती. त्या वेळी जिवाच्या भयाने धास्तावलेल्या लोकांनी समाजमाध्यमांमध्ये बुडत्याला काडीचा आधार शोधला. त्या काळात अनेक विघ्नसंतोषी लोकांनी, ‘ब्लीच प्या’, ‘भीमसेनी कापूर खा’, वगैरे अनेक खोटे उपाय तर पसरवलेच, पण एमआरएनए- लशीविरुद्ध गैरसमजांची- भयाची- असुरक्षिततेची साथ फैलावली. खरं तर विषाणूशिवाय स्पाईक- प्रोटीन- एमआरएनए- लस म्हणजे आपल्या लढाऊ पेशींच्या ताब्यात येणारी सैनिकाशिवायची बंदूक. पण जनुक वापरून, घाईघाईने बनवलेली लस हा सर्वसामान्यांना बागुलबुवाच वाटत होता. त्या विचारांना पुष्टीच मिळाली. घाबरलेले लोक लस घेईनात. मौल्यवान लस वाया गेली; साथ आटोक्यात आणणं कठीण झालं. म्हणून आंतरजालावरची मिथ्या माहिती ओळखणं अत्यावश्यक आहे.

काही रिकामटेकडे लोक गंमत म्हणून असे सनसनाटी संदेश घडवतात. गेल्या शतकापर्यंत त्यांना विशेष वाव मिळत नव्हता. वर्तमानपत्रं, मासिकं, रेडिओ, भाषणं यांतून मिळणारी माहिती खात्रीलायक असे. तिचं कसून संपादन केलं जाई. चुकीची माहिती पसरत नसे. अर्थात, जाहिरातींतली अतिशयोक्ती लोक धरून चालतात. पण त्याखेरीज एरवी छापून आलेल्या मजकुरावर पूर्ण विश्वास ठेवणं ही सामाजिक मनोवृत्ती होती आणि अजूनही टिकून आहे. स्वत: पाहिलेलं-ऐकलेलं अजूनही खरंच वाटतं.

आंतरजालावरच्या बहुतेक समाजमाध्यमांत संपादन अस्तित्वातच नसतं. त्यामुळे कुणीही उठावं, काहीही लिहावं, कशाचाही व्हिडीओ करावा आणि ते हजारो-लाखोंनी वाचावं, पाहावं, ऐकावं हे आता रोजचंच झालं. ते स्थित्यंतर झपाटय़ाने, समाजमानस बदलण्यापूर्वी झालं. रोजच्या माहितीच्या लोंढय़ात जनतेची विचारशक्ती गुदमरली. म्हणून तशा मिथ्या माहितीचा जगभरातल्या अनेक मोठय़ा विद्यापीठांनी कसून अभ्यास केला. त्याच्यावरून ब्रिस्टल-हार्वर्डसारख्या इंग्लंड-अमेरिकेतल्या आणि ऑस्ट्रेलिया-जर्मनीमधल्याही तालेवार विद्यापीठांनी मोठे शोधनिबंधही प्रकाशित केले.

सनसनाटी संदेश घडवणारे लोक कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने खऱ्याखोटय़ाचं बेमालूम मिश्रण करतात. खोटय़ाचं भूत खऱ्याचा बुरखा पांघरून येतं. ‘ब्लीच प्याल्याने कोविडचा व्हायरस मरतो,’ या विधानातलं ‘ब्लीचने व्हायरस मरतो,’ हे खरंच आहे. पण ‘ते पिऊन माणूस बरा होतो,’ हे विधान जळजळीत खोटं. काही दुष्ट धोरणी लोक मुद्दाम दिशाभूल करायला समाजमाध्यमांचा वापर करतात. त्या माध्यमांचे संगणकी हेर वाचकाचे पूर्वग्रह, मनोवृत्ती, वैचारिक कल यांची बितंबातमी मिळवतात आणि वाचकाला सहज पटणारी, त्याची दिशाभूल करणारी मिथ्या माहिती त्यांच्यापर्यंत सतत पोहोचवण्याची तजवीज करतात. तसा रोजचा भडिमार होत राहिला की ती माहिती कितीही चमत्कारिक असली, तरी खरीच वाटू लागते. अनेक आजारांची मिथ्या माहितीत सांगितलेली लक्षणं वाचून लोक स्वत:च्या दुखण्याखुपण्याचं निदान करतात आणि भलभलते उपायही करतात (हाच ‘सायबरकाँड्रिया’)!

शिवाय आजकालचं विज्ञानही अनेकदा कल्पनेहून अद्भुत असतं. त्यामुळे ‘असेलसुद्धा!’ असं वाटून भाबडे सामान्यजन फसतात. त्यांनाही त्यात काही तरी अतिरंजित वाटतंच. पण ती सुरस आणि चमत्कारिक कथा इतरांना सांगायला ते उत्सुक होतात. कित्येकदा तर ‘वेगळं वाटतंय,’ म्हणून पूर्ण वाचायचेही कष्ट न घेता तो अतिरंजित, अतिशयोक्त संदेश आपल्या अनेक गटांत पाठवून देतात.

आता साथ ओसरून दोन वर्ष झाली. तरी २०२३ मध्येही, ‘त्या लशीमधून ग्राफीनचे सूक्ष्म कण किंवा मारबुर्ग विषाणू आपल्या शरीरात घुसवले आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा ४ ऑक्टोबरचा आणीबाणी-संदेश संगणकावर उघडलात तर ते कण-विषाणू तुमच्या मेंदूवर तुटून पडतील; तुम्ही अबोध झॉम्बी व्हाल,’ असा संदेश समाजमाध्यमांवरून सगळीकडे पसरला. त्यावर विश्वास ठेवून अमेरिकेतल्या लाखो लोकांनी आपले फोन ४ ऑक्टोबरला बंद ठेवले!

अनेकदा तशा संदेशांच्या कुंकवाचा धनी असलेल्या कुण्या डॉक्टरचं नाव एखाद्या जगप्रसिद्ध विद्यापीठाला जोडलेलं असतं. कंबर कसून शोध घेतला तर तसा डॉक्टर त्या विद्यापीठात नसतोही. काही संदेशांखाली संदर्भ म्हणून तालेवार जर्नलची लिंक असते. ती लिंक उघडली तर तिथला खरा संदेश पूर्णपणे वेगळाच असतो. शिवाय कृत्रिम बुद्धिमत्तेच्या कर्तृत्वामुळे कुठलाही संदेश सुप्रसिद्ध डॉक्टरांच्या तोंडी घालून खोटा व्हिडीओ तयार करता येतो.

मिथ्या माहितीच्या भडिमारामुळे गैरसमज पक्के झालेले असतात. खरी माहिती देताना अनुषंगाने गैरसमजांचीही उजळणी होते आणि भाबडय़ांच्या मनात तेच पक्के होतात. म्हणून भाबडय़ांनीच सुजाणपणे खोटय़ाची भुतं ओळखायला शिकावं.  पण भुताचे उलटे पाय जाणकारांनाच दिसतात. बाकीच्यांनी काय करावं?

 थोडा विचार केला तर राईतला राजगिरा वेचता येतो. तसे राजगिरे त्यांच्या भाषेवरून, एकंदर रोखावरूनही लक्षात येतात. ‘अनेक महागडे डॉक्टर, औषधं, फिजियोथेरपी करून आमचं दिवाळं निघालं होतं. डॉ. अमुक यांनी कनवाळूपणे, फी न घेता, त्यांचं प्रभावी औषध देऊन अर्धाग ताबडतोब, पूर्ण बरा केला. ते औषध अर्धागाच्या कुठल्याही रुग्णाला लागू पडेल. ते नैसर्गिक, झाडपाल्याचं औषध असल्यामुळे त्याला दुष्परिणाम अजिबात नाहीत. आपमतलबी औषध कंपन्यांच्या कारस्थानामुळे त्या औषधाला प्रसिद्ध मिळाली नाही,’ असं सांगणारे व्हिडीओ यूटय़ूबवर दिसतात. त्यांच्यात भावना, रडारड भरपूर असते. अर्धाग कसा, कधी झाला; औषध कुठलं, किती दिलं हा तपशील नसतो.

ते खरं असतं तर मोठमोठय़ा विद्यापीठांत त्या डॉक्टर अमुकांच्या औषधांवर आंतरराष्ट्रीय संशोधन झालं असतं; त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं असतं. कदाचित त्याच्याही आधी, कानफाटय़ा औषध कंपन्यांनी डॉक्टरांची सुवर्णतुला करून त्यांचं गुपित विकत घेतलं असतं, पण अर्धाग, पार्किन्सनचा आजार, कर्करोग वगैरेंच्या रुग्णांची मेटाकुटीला आलेली कुटुंबं तसल्या व्हिडीओंनी फसतात.

‘कार्डिऑलॉजिस्ट बायपास-अँजियोप्लास्टी करून रुग्णाला लुबाडतात; खोऱ्याने पैसा ओढतात. डॉ. तमुकांनी कित्येक वर्षांच्या संशोधनाने शोधलेल्या क्रांतिकारक, अभूतपूर्व तंत्राने, रक्ताच्या २५ बाटल्या चढवून हृदयाच्या सर्व वाहिन्या स्वच्छ होतात; बायपास टळतो. पुन्हा हृदयविकार होत नाही. साधं रक्तच चढवल्यामुळे दुष्परिणाम मुळीच नाहीत,’ असे संदेशही भाबडय़ांना भुलवतात. योग्य इलाज राहून जातो. रक्तामुळे होणारं हार्ट फेल्युअर, भलभलते विषाणू-संसर्ग नंतर समजतात. तशी ‘लाखों की एक, अक्सीर दवा’ असलेली गुलबकावलीची फुलं खरी नसतात.

‘जीभ बाहेर काढून डोक्यावर टपल्या मारल्या तर हार्ट अ‍ॅटॅक टाळता येतो,’ या विधानातला सोपेपणाच अतिरंजित आहे. तशा व्हिडीओतलं एखादं स्थिरचित्र गूगल-लेन्ससारख्या शोधस्थळाला दाखवलं की तो खोडसाळ संदेश असल्याचं उत्तर मिळू शकतं. संदेश कुणाकडून आला आहे; ती व्यक्ती किंवा संस्था विश्वसनीय आहे का, हे पाहावं. संदेशांचा खोटेपणा जोखणारी  snopes. com,  factcheck. org सारखी संकेतस्थळं असतात. तिथून कानोसा घ्यावा. सर्वसामान्य माणसांना खरी माहिती देणारी  MedlinePlus,  WebMD,  Harvard THChan School of Public Health,  Stanford Health Care,  CDC,  WHO,  FDA  यांच्यासारखी आणि . ॠ५चं शेपूट असलेली खात्रीलायक संकेतस्थळं अद्याप सगळय़ांसाठी खुली आहेत. तिथे जाऊन अँजियोप्लास्टी, कर्करोग, आल्झायमर्स वगैरेंविषयी खरी माहिती वाचावी. चॅट-जीपीटीसारखी संगणकी साधनं अद्याप यासाठी कामाची नाहीत.  UpToDate नावाच्या महागडय़ा स्थळावर डॉक्टर नसलेल्या, जिज्ञासू लोकांसाठी सोप्या इंग्रजीतून, अद्ययावत, विश्वासार्ह, भरपूर माहिती असते. वाचकगटांनी एकत्रित वर्गणी भरली तर लाभ घेता येईल.

ज्या लोकांची आंतरजालाशी दोस्ती असते त्यांना ते सगळं जमेल. ज्यांना ते जमत नाही त्यांच्यासाठी सोप्या मायबोलीतून वैद्यकाविषयी अद्ययावत खरी माहिती देणारं अधिकृत ठिकाण हवं. सरकार, इंडियन मेडिकल असोसिएशन, नामांकित वैद्यकीय विद्यालयं, ज्ञानी डॉक्टर्स वगैरे सगळय़ांनी एकत्रित प्रयत्न केला तर ‘व्हॉट्सअ‍ॅप’ला ‘व्हॉट? गप्प!’ करणं कठीण नाही. तोवर आपणच थोडा विचार, शोधकार्य केलं तर आंतरजाळय़ातलं मायाजंजाळ टाळून निर्मळ माहितीजळ प्राशन करता येईल. प्रकृतीही आपली, बुद्धीही आपलीच आणि जबाबदारीही आपलीच!