गदिमांच्या ‘गीतरामायणा’नंतर सुमारे १४ वर्षांनी, १९७० मध्ये जलबाला वैद्य- गोपाल शर्मन् या दाम्पत्याचे ‘रामायण’ हे इंग्रजी नाटक आले. रामायणातील पात्रांच्या भावभावना समजून घेण्याचा प्रयत्न या नाटकातही होता. जलबाला वैद्य यांनी कथावाचक आणि रामायणातील सर्व पात्रांच्या भूमिका एकटीने केल्या, हे या ‘रामायण’च्या प्रयोगाचे वैशिष्टय़ होते! त्या एकपात्री प्रयोगासह जलबाला- गोपाल जगभर हिंडले. गोपाल यांचे निधन २०१६ मध्ये झाले, तर जलबाला यांनी परवाच्या शनिवारी- नऊ एप्रिल रोजी अखेरचा श्वास घेतला.
जलबाला वैद्य यांनी गोपाल यांच्या प्रेमात पडून आधीचा संसार १९६५- ६६ मध्ये मोडला, तेव्हा गोपाल हे ‘नचिकेत’ या टोपणनावाने उपनिषदांवर ‘सण्डे स्टॅण्डर्ड’ या वृत्तपत्रात लेखमाला लिहीत. तत्कालीन राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन हे त्या लेखमालेचे वाचक होते आणि चाहतेही! मोतीिबदूमुळे वाचण्यास त्रास होऊ लागल्याच्या काळात राधाकृष्णन यांनी ‘नचिकेत’ला भेटण्याची आणि त्याच्याकडूनच लेखांचा ऐवज ऐकण्याची इच्छा काही पत्रकारांपुढे व्यक्त केली, तेव्हा गोपाल यांना प्रकट व्हावे लागले. लेख वाचून दाखवण्याची विनंती राधाकृष्णन यांनी केली तेव्हा मात्र, मी नव्हे- जलबाला चांगले वाचेल, तिला नाटकाची आवड आहे, असे गोपाल यांनी सुचवले. हे वाचन ऐकून प्रभावित झालेल्या राधाकृष्णन यांनी ‘याचा जाहीर प्रयोगही करा’ असे तर सुचवलेच, पण पुढे दिल्लीच्या खडकसिंग मार्गावर, राममनोहर लोहिया रुग्णालयाच्या परिसरातच ‘अक्षरा थिएटर’साठी जागा दिली. त्यावर छोटेसेच, पण देखणे नाटय़गृह गोपाल यांनीच बांधले. ‘ते लाकडी आहे- त्यामुळे आवाज न घुमता, नीट पोहोचतो’ असे जलबाला सांगत. लेखवाचनाचा झालेला जाहीर प्रयोग परदेशी राजदूतांनीही पाहिला आणि लंडनच्या ‘रॉयल शेक्सपीअर कंपनी’च्या महोत्सवात ‘असाच, पण नवा प्रयोग करा’ असे निमंत्रण आले.. म्हणून पुढले ‘रामायण’ घडले! त्या इंग्रजी रामायणाचे दोन हजार प्रयोग झाले. ब्रिटनमधील प्रयोग पाहणाऱ्या एका ख्रिस्ती धर्मसाधकाने थेट व्हॅटिकनचे निमंत्रण देऊन तत्कालीन पोपची भेट या जोडप्याशी घडवली, इटलीतील एका चित्रवाणी वाहिनीवरून हे ‘रामायण’ दिसले. अमेरिकेचे निमंत्रणही लवकरच आले, त्यामुळे ब्रॉडवेप्रमाणेच ‘वेस्ट एण्ड’ अशा दोन्ही नाटय़पंढऱ्यांमध्ये खेळ मांडता आला. ५० वर्षांनी पुन्हा, काही प्रसंग जलबाला वैद्य यांचे एकपात्री, तर काहींमध्ये भूमिकांनुसार पात्रयोजना असा संमिश्र प्रयोग ‘अक्षरा थिएटर’मध्ये झाला. तोवर अन्य नाटकेही या दाम्पत्यानेच सादर केली होती.
आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी यांनी ‘मी हुकूमशहा वाटते का?’ असे विचारल्यावर, ‘ते वाटू नये, यासाठी आम्ही एक प्रहसन सादर करू का? ‘दूरदर्शन’ ते दाखवील का?’ असा हजरजबाब गोपाल यांनी दिला.. शूटिंगही सुरू झाले, पण इंदिराजींची ‘आधी पाहण्या’ची इच्छा या जोडप्याने टोलवल्यामुळे काम पुढे गेले नाही. ‘लेट्स लाफ अगेन!’ हे प्रहसन रंगमंचावरच सादर झाले. संगीत नाटक अकादमीच्या ‘टागोर सम्मान’सह अन्य पुरस्कार लाभलेल्या जलबाला ‘अक्षरा थिएटर’च्या आधार होत्या.