या महिन्यात तो ४२ वर्षांचा होईल. त्याने कसोटी पदार्पण केले, त्या वेळी म्हणजे २००३ मध्ये स्मार्टफोन, समाजमाध्यमांचा उदय झाला नव्हता. ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटही जन्माला आले नव्हते. या २१ वर्षांमध्ये १०० क्रिकेटपटूंनी इंग्लंडसाठी पदार्पण केले. काही चमकले, काही विस्मृतीत गेले. परंतु जेम्स मायकेल अँडरसन मात्र अचल राहिला, खेळत राहिला. लॉर्ड्स २००३ ते आता लॉर्ड्स २०२४ या काळात अँडरसन १८७ कसोटी सामने खेळला. लॉर्ड्सवर वेस्ट इंडिजविरुद्ध बुधवारी सुरू झालेला सामना त्याचा १८७वा आणि शेवटचा कसोटी सामना. या प्रदीर्घ कारकीर्दीत अँडरसनने ७०० बळी घेतले. यात शेवटच्या सामन्यात आणखी भर पडेलच. ही कामगिरी करणारा तो एकमेव मध्यम तेज गोलंदाज. त्याच्यापेक्षा अधिक बळी घेतलेले मुथय्या मुरलीधरन (८००) आणि दिवंगत शेन वॉर्न (७०८) हे फिरकी गोलंदाज होते. सर्वाधिक बळी घेतलेल्यांच्या यादीमध्ये जेम्स अँडरसन नंतरचा अनिल कुंबळे (६१९) हाही फिरकी गोलंदाजच.
हेही वाचा >>> लोकमानस : राज्यात आर्थिक अराजकाची नांदी
नवीन सहस्राकामध्ये कसोटी क्रिकेटपेक्षा मर्यादित षटकांच्या क्रिकेटचे महत्त्व अधिक वाढले. खेळाडूंच्या प्राधान्यक्रमातही आधी एकदिवसीय आणि आता तर ट्वेंटी-ट्वेंटी आणि त्यातही फ्रँचायझी क्रिकेटचा क्रमांक वरचा असतो. जेम्स अँडरसन मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येही चमकला. पण त्याचे प्राधान्य मात्र नेहमीच कसोटी क्रिकेटला राहिले. त्यासाठी २०१५मध्ये त्याने मर्यादित षटकांच्या क्रिकेटचा निरोप घेतला हे विशेष. अँडरसनच्या कारकीर्दीची सुरुवात पाहता, तो इतकी मजल मारू शकेल असे कोणाला वाटले नव्हते. बऱ्यापैकी वेग आणि अनुकूल परिस्थितीत – म्हणजे बहुतेकदा इंग्लंडमध्ये – चांगला स्विंग अशी माफक हत्यारे त्याच्या भात्यात होती. इंग्लिश संघात त्याच्यापेक्षा चांगले गोलंदाज होते. काही गोलंदाज चांगली फलंदाजीही करू लागले. त्या आघाडीवर अँडरसन फार काही करू शकत नव्हता. त्यामुळे इंग्लिश संघात तो पहिल्या पसंतीचा गोलंदाज नव्हता. ही परिस्थिती बदलली गेल्या दशकाच्या सुरुवातीस. स्विंग आणि सीम गोलंदाजी करून वाटेल त्या परिस्थितीत बळी घेण्याची ईर्षा त्याने सोडून दिली. त्याऐवजी अचूक टप्पा आणि अचूक दिशा यांवर भर दिला. बळी मिळवण्यास प्राधान्य न देता, धावा रोखून फलंदाजाची कोंडी करण्यावर भर देण्यास सुरुवात केली. आक्रमक फलंदाजांच्या बदलत्या युगात हे डावपेच यशस्वी ठरले. अँडरसनला फलंदाज स्वत:हून विकेट बहाल करू लागले! त्याच्या ७०० बळींपैकी सर्वाधिक १४९ भारतीय फलंदाज होते ही बाब विशेष उल्लेखनीय. एकदिवसीय क्रिकेटमध्ये २६९ बळी ही कामगिरी चांगली खरीच. पण जेम्स अँडरसनने कसोटी क्रिकेटवर अधिक प्रेम केले आणि या क्रिकेटने या महान गोलंदाजाला भरभरून दिले. कारकीर्दीची सुरुवात आणि अखेर लॉर्ड्ससारख्या क्रिकेटपंढरीत होणे हा मात्र सुखद योगायोग.