अमेरिकेतला वर्णभेद अखेर कायद्याने संपण्यासाठी १९६७ उजाडले, तोवर जेम्स अर्ल जोन्स हे रंगमंचावर आलेले होते. जॅक जॅक्सन या कृष्णवर्णीय मुष्टियोद्ध्याच्या जीवनकहाणीवर बेतलेल्या त्या नाटकात मुख्य भूमिका जोन्स यांची होती. तोवर जॅक्सन (मृत्यू १९४६) इतिहासकथा बनले होते, पण कॅशियस क्ले- अर्थात मोहम्मद अली- याचा उदय तेव्हा झालेला होता. जोन्स यांच्या भूमिकेने क्ले (अली) पछाडूनच गेला…‘हे नाटक माझे करा- त्यातले नायकाचे गौरवर्णीय मुलीशी प्रेमप्रकरण वगैरे काढून टाका आणि त्याचा काळ बदला- मला जोन्स यांना पाहताना मीच दिसतो आहे’ असे म्हणू लागला! ‘द ग्रेट व्हाइट होप’ या त्या नाटकावर त्याच नावाचा चित्रपट आला, तेव्हा नायक म्हणून जोन्स यांच्याखेरीज कुणाचाही विचारच होणे अशक्य होते. या भूमिकेसाठी त्यांना १९७१ मध्ये ‘ऑस्कर’ नामांकन देण्यात आले, पण पुरस्कार हुकला. तेव्हापासून ४० वर्षांच्या अभिनय-कारकीर्दीनंतर, २०११ मध्ये मात्र त्यांना कारकीर्दगौरवाचे विशेष ऑस्कर बहाल झाले… सत्यजित राय यांना देण्यात आले होते, तसे! इतक्या गुणी, ५० हून अधिक चित्रपट, ८० हून अधिक मालिकांत झळकलेल्या या हॉलीवूड नटाचे निधन सोमवारी- ९ सप्टेंबर रोजी- झाल्याच्या वार्तेने किती भारतीय हळहळले असतील?

हेही वाचा >>> व्यक्तिवेध: डॉ. अविनाश आवलगावकर

loksatta editorial on union minister nitin gadkari says no more subsidies on electric vehicles
अग्रलेख : विजेला धक्का
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
RSS chief Mohan Bhagwat remark on Manipur violence
अग्रलेख : सरसंघचालकांचे तरी ऐका…
Loksatta editorial on Gau rakshak killed Brahmin boy Aryan Mishra in Faridabad
अग्रलेख: वाद आणि दहशत
Loksatta editorial on pm Narendra modi dig at China in Brunei over supports development not expansionism
अग्रलेख: ‘या’ विस्ताराचे काय?
loksatta editorial on tax on medical insurance premium issued in gst council meeting
अग्रलेख: आणखी एक माघार…?
donald trump kamala harris presidential debate
अग्रलेख : वीज म्हणाली…
readers comments on loksatta editorial readers reaction on loksatta articles
लोकमानस : सिंह यांचा राजीनामा घेणेच हिताचे

कदाचित, फार कमी. हॉलीवूडमध्ये ज्यांची मुद्दामहून प्रसिद्धी झाली अशांपैकी तर ते नव्हतेच, शिवाय गेल्या ३० वर्षांत त्यांनी चित्रपटांपेक्षा चित्रवाणीतला राबता वाढवला होता. नायकापेक्षा चरित्रभूमिकांतूनच ते जास्त दिसू लागले होते. मात्र तरीही, भारतातल्या हॉलीवूडप्रेमींना जोन्स यांच्या ओळखीची एक खूण चटकन पटेल… त्यांचा आवाज! ‘धिस इज सीएनएन’ या सुरुवातीच्या उद्घोषणेचा आवाज जोन्स यांचाच आहे. हाच आवाज ‘स्टार वॉर्स’मधल्या लोखंडी चेहऱ्याच्या ‘डार्थ व्हेडर’ला तिन्ही मुख्य स्टार वॉर्स-पटांत जोन्स यांनी दिला होता. ‘लायन किंग’ या डिस्ने सचेतपटातल्या मुसाफा या सिंह-वडिलांचा आवाजही त्यांचाच.

या आवाजाची मोठीच गोष्ट जेम्स अर्ल जोन्स सांगायचे. वयाच्या १४ व्या वर्षीपर्यंत त्यांच्यात तोतरेपणा होता. मग, शाळेत ते कुणाशी बोलायचेच नाहीत- मूक असल्याचे भासवायचे (दैववशात हाच त्यांचा पहिला अभिनय) गरजच असेल तर लिहून दाखवायचे. पण हायस्कुलात टेनिसनपासून वॉल्ट व्हिटमनपर्यंत अनेकांच्या कविता शिकताना त्यांचा नाद जाणवू लागला- पेनाने लिहिताना हात थरथरणाऱ्या मुलाने कुंचला हाती येताच सफाईने चित्रे रंगवावीत, तसे जेम्स अर्ल जोन्स यांचे झाले. कविता मोठ्याने वाचण्याच्या छंदातून आवाजाचा आत्मविश्वास असा काही वाढला की पुढे वक्तृत्व स्पर्धांत बक्षिसेही त्यांनी मिळवली.

‘द मॅन’मधले अमेरिकी राष्ट्राध्यक्ष, ‘फील्ड ऑफ ड्रीम्स’ मधला बेसबॉल प्रशिक्षक, ‘क्राय द बिलव्हेड कंट्री’मधला धर्मगुरू, ‘अ फॅमिली थिंग’मधला कुटुंबापासून दूर वाढलेला भाऊ… अशा त्यांच्या अनेक भूमिका पाहाताना त्यांची महती कळेल. अभिनेता नायकच हवा असे नसते, हेही उमगेल!