जेम्स थॉमस मोल्सवर्थ (१७९५-१८७२) याने १८३१ मध्ये ‘मराठी-इंग्रजी शब्दकोश’ निर्मिला. तत्पूर्वी अशा प्रकारचे कोश डॉ. विल्यम कॅरी (१८१०) आणि वॅन्स केनेडी (१८२४) यांनी केले होते. त्यांची शब्दसंख्या अनुक्रमे दहा हजार नि २५ हजार होती; पण मोल्सवर्थ रचित मराठी-इंग्रजी शब्दकोशात ही संख्या ६० हजारांवर गेली. यातून मोल्सवर्थचे योगदान लक्षात येईल. १८१२ ला लष्करी अधिकारी म्हणून आलेला मोल्सवर्थ त्या वेळी अवघा १७ वर्षांचा होता. पुढे ६० वर्षे त्याने अविवाहित राहून मृत्यूपर्यंत अविरत मराठी भाषा विकासास आयुष्य समर्पित केले. ‘मोल्सवर्थ’स् मराठी-इंग्लिश डिक्शनरी’, १८५७ मध्ये पुनर्मुद्रित झाली; पण पुढे शंभर-सव्वाशे वर्षे ती पुनर्मुद्रित न झाल्याने सर्वसामान्य वाचकास अप्राप्त होती. ती उपलब्ध करून देण्याचे ऐतिहासिक कार्य शुभदा-सारस्वत प्रकाशन, पुणेच्या शरद गोगटे यांनी अविनाश ओगले यांच्या प्राथमिक अर्थसाह्याने केले. त्यास पूर्णत्व देण्याचे कार्य तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे २५ हजार रुपयांचे तदर्थ अनुदान देऊन केले. १९७५ ला तत्कालीन शिक्षण राज्यमंत्री शरद पवार यांना या शब्दकोश प्रकाशनाची आर्थिक अडचण समजली तेव्हा त्यांनी आणखी ५००० रुपयांचे अर्थसाहाय्य प्रकाशन समारंभात देऊन नवा वस्तुपाठ घालून दिला होता.

या शब्दकोशास तर्कतीर्थांनी पुरस्कारपर दोन शब्द (फोरवर्ड) इंग्रजीत लिहिले आहेत. त्यात त्यांनी स्पष्ट केले आहे की, हा शब्दकोश मराठी भाषा विकासाचा अभ्यास करण्याचे आधुनिक साधन आहे. गेल्या सुमारे दीडशे वर्षांतील मराठी शब्दविकासाचे मूल्यमापन करायचे झाल्यास यासारखा दुसरा स्राोत सापडत नाही. या शब्दकोशामुळे मराठी गद्याविकासास मोठी मदत झाली. मराठीस आधुनिक भाषा बनविण्याचे कार्य या शब्दकोशामुळे घडून आले. त्यामुळे त्याच्या पुनर्प्रकाशनाचे कार्य करणारे अभिनंदनास पात्र आहेत.

शब्दकोश संपादनाची भारतीय परंपरा सुमारे तीन हजार वर्षांची आहे. या काळात मराठी भाषेसाठी असे कार्य करण्याची प्रेरणा अपवादाने दिसून येते. मोल्सवर्थपूर्वी इतके बृहद् शब्दसंग्रहाचे कार्य नेटकेपणाने व वैज्ञानिक पद्धतीने झालेले दिसून येत नाही. या शब्दकोशामुळे मराठी शब्दसंपदा अभ्यासाची शिस्त निर्माण झाली. मराठी शब्दांचे व्याकरण, उत्पत्ती, वर्णशास्त्र, उच्चार, वाक्यशास्त्र, पदविचार इ.चा प्रारंभिक विचारही रुजला.

भारतात उपनिषद काळात (वेदान्त) संस्कृत भाषेच्या शास्त्रीय अभ्यासाचाही प्रारंभ झाला. त्यामुळे वैदिक वाङ्मयाचे सर्वांगाने मूल्यांकन शक्य झाले. शब्दकोशांची प्रारंभिक परंपरा ‘निघंटू’ निर्मितींनी सुरू झाली. इ.स.पूर्व पाचव्या शतकात पाणिनीने संस्कृत भाषेच्या व्याकरणिक अध्ययानाची, दुसऱ्या शब्दात सांगायचे तर वैज्ञानिक अभ्यासाची परंपरा सुरू केली. ‘निघंटू’, ‘धातुपाठ’, ‘गणपाठ’ हे प्रारंभिक संस्कृत शब्दकोशच होत. व्याकरण आणि शब्दकोश हे त्या त्या भाषेतील अंत:संबंध निर्माण करणारी अनिवार्य साधने होत. ही साधने त्या भाषा व साहित्यविकासाचे कार्य करत असतात. संस्कृत भाषेत १९७५ पर्यंत असे १६ शब्दकोश सिद्ध झाले होते. या कोशांचा उपयोग भाषा, साहित्य, छंद, अलंकार, काव्यनिर्मिती व अध्ययनास होत आला आहे. शब्दसंपदा, शब्दसमूह अभ्यासाचे साधन म्हणून शब्दकोशांचे सर्व भाषांत असाधारण महत्त्व असते. मोल्सवर्थने भाषा व महाराष्ट्रावर कायमचे न फिटणारे ऋण करून ठेवले आहे.

पुरस्कारातील तर्कतीर्थांच्या वरील विचारांसंदर्भात आपण मोल्सवर्थचा मराठी-इंग्रजी शब्दकोश आज अभ्यासू लागतो, तेव्हा लक्षात येते की, त्याने केवळ शब्दार्थ दिलेले नाहीत, तर ते ज्या मूळ भाषांमधून (कोकणी, अरेबिक, परशियन इ.) आलेत, त्यांचे मूळ स्राोत देण्याची तत्परता दाखविली. मूळ मोल्सवर्थ शब्दकोशात काही मुद्रणदोष होते, ते (१९७५ मध्ये मूळ पुनर्प्रकाशित आवृत्तीसाठी) दुरुस्त करण्याचे कार्य डॉ. ना. गो. कालेलकर यांनी केल्याने आपण आज निर्दोष शब्दकोश वापरत आहोत. हा मूळ कोश सिद्ध झाला तेव्हा मोल्सवर्थने पहिल्या पानावर लिहिले होते की, ‘‘भाषा हे मानवी मनाचे शस्त्रागार (आर्मरी) आहे. त्यात भूतकाळाची पदके, करंडक असतात, तद्वतच भविष्यकालीन विजयाची नवी शस्त्रेही!’’

डॉ. सुनीलकुमार लवटे

drsklawate@gmail.com