जगातील सर्वाधिक सधन आणि शक्तिशाली अशा भारतीय क्रिकेटविश्वात सध्या जे काही सुरू आहे, ते पाहिल्यावर धन आणि ताकद स्थैर्य व यशाची हमी देऊ शकत नाहीत, याची जाणीव होते. भारताचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमरा हा गेले काही महिने पाठीच्या दुखापतीने ग्रस्त होता. त्यामुळे त्याला टी-२० विश्वचषकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धेखेरीज इतर फुटकळ स्पर्धा वा मालिकांमधून खेळवले गेले नाही. टी-२० प्रकारातील गत विश्वचषक ऑस्ट्रेलियात झाला, तेथे बुमराची कामगिरी नेहमीच चांगली होते. अशा महत्त्वाच्या स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियातील गोलंदाजीचा अनुभव असलेला बुमरासारखा मोक्याचा मोहरा उपलब्ध न होणे हे येथील क्रिकेटव्यवस्थेचे मोठे अपयश होते. आता हाच बुमरा त्याच्यावरील गोलंदाजी भाराचे ‘योग्य नियोजन’ व्हावे यासाठी विद्यमान श्रीलंका आणि नजीकच्या न्यूझीलंड मालिकेतच नव्हे, तर आगामी ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेसाठीही उपलब्ध होणार नाही, अशी हवा बनवली जात आहे. ‘हवा बनवली जात आहे’ हा वाक्प्रयोग नाइलाजास्तव करावा लागतो. कारण हल्ली भारतीय संघनिवड, संघरचना, खेळाडूंच्या दुखापती-उपलब्धतेबाबत अधिकृत फारसे काही सांगितलेच जात नाही.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयच्या ट्विटर हँडलवर रात्री-अपरात्री प्रसृत होणारी बरीचशी फुटकळ निवेदने हाच या मंडळाकडून क्रिकेटविषयक घेतल्या जाणाऱ्या निर्णयांचा माहितीस्रोत. बुमराच्या दुखापतीविषयीचा सर्वात गमतीशीर भाग म्हणजे, त्याची विद्यमान श्रीलंका मालिकेसाठी निवड झाली होती! या मालिकेतील पहिल्या सामन्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे सोमवारी सराव करताना पाठ दुखू लागल्यामुळे बुमराला ऐन वेळी संघातून वगळण्याचा निर्णय झाला. त्याला विश्रांती देणे किती आवश्यक आहे वगैरे मीमांसा कर्णधार रोहित शर्माने केली. आता जवळपास सहा महिन्यांच्या विरामादरम्यान दुखापत निराकरणासोबत पुनर्वसन किंवा ‘रिहॅब’ कार्यक्रमही आखला जातो. इतके सगळे करून आल्यानंतर बुमराची पाठ पुन्हा दुखते कशी? तो तंदुरुस्त असल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतर दीर्घकाळ विश्रांती वगैरे देण्याची उपरती होते कशी? श्रीलंका किंवा न्यूझीलंडविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिका तशा बिनमहत्त्वाच्या आहेत. परंतु ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर होणारी चार कसोटी सामन्यांची मालिका अतिशय महत्त्वाची आहे. या मालिकेतील कामगिरीवर आयसीसी कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम लढतीमधील समावेश अवलंबून आहे. ही मालिका अतिशय प्रतिष्ठेचीही आहे. या मालिकेतही बुमरा खेळू शकणार नाही, हे आडून आडून जाहीर करण्याची घाई कसली? या मालिकेनंतर लगेचच आयपीएल आहे. त्यासाठीच बुमराला जपण्याची धडपड सुरू नाही ना?

एरवी बुचकळय़ात टाकणाऱ्या निर्णयांची अशी मालिका हे विस्कळीत आणि विस्कटलेल्या व्यवस्थेचे निदर्शक मानले जाते. पुढील काही मासले अभ्यासनीय ठरतात : सामनावीर ठरलेल्या एखाद्या फिरकी गोलंदाजाला (कुलदीप यादव), पुढील कसोटीतून वगळले जाते. एकदिवसीय सामन्यात दुर्मीळ द्विशतक झळकावणाऱ्या फलंदाजाला (ईशान किशन), पुढील सामन्यात संधीच मिळत नाही. सातत्याने अपयशी ठरणाऱ्या यष्टिरक्षक फलंदाजाला (के. एल. राहुल), फलंदाजीबरोबरच नेतृत्वामध्ये अपयशी ठरल्यानंतरही वारंवार संधी दिली जाते. टी-२० विश्वचषकातील अपयशानंतर  निवड समिती अध्यक्षासह बरखास्त केली जाते आणि नवीन निवड समितीत पुन्हा पदच्युत अध्यक्षाचीच वर्णी लागते. बदलत्या टी-२० परिप्रेक्ष्यात डावपेच, व्यूहरचना, कामगिरी, तंदुरुस्ती अशा सर्वच आघाडय़ांवर कालबाह्य आणि म्हणून अपयशी ठरलेल्या वलयांकित क्रिकेटपटूंना स्वत:च स्वत:चे भविष्य ठरवण्याचे स्वातंत्र्य देण्याचा अगाध निर्णय घेतला जातो.

टी-२० विश्वचषकातून गच्छंती झाल्यानंतर, अशा महत्त्वाच्या स्पर्धा हल्ली भारतीय क्रिकेट व्यवस्थेच्याच प्राधान्यक्रमात नाहीत असे ‘लोकसत्ता’ने म्हटले होते. बुमरा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत खेळणार नाही, पण आयपीएलमध्ये खेळेल. गेल्या काही वर्षांमध्ये दुखापतग्रस्त खेळाडू आयपीएलमध्ये मात्र कसे खेळले, यावर स्वतंत्र लेख होऊ शकतो. त्याचबरोबर, बंगळूरुस्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या दुखापत निराकरण व्यवस्थापनाबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित होतात. या कार्यक्रमात सहभागी न होता, स्वतंत्र तज्ज्ञाची मदत घेण्याचा निर्णय मागे एकदा बुमरानेच घेतला होता. भारतीय खेळाडूंमागील दुखापतींचा ससेमिरा संपण्याचे नाव घेत नाही. अकादमीतून फेरतंदुरुस्त झालेले खेळाडू वर्ष-दीड वर्षांतच पुन्हा जायबंदी होतात. तेव्हा नेमके कोणते तज्ज्ञ बंगळूरुत कार्यरत आहेत याचा आढावा घेतला जावा. भारताकडे गुणवत्तेची श्रीमंतीच इतकी आहे, परंतु तरीही कोणत्याच स्पर्धेत सर्वोत्तम संघ उतरवण्यासाठीचे गणित जुळूनच येत नाही, हा खरा मुद्दा आहे. बुमराच्या दुखापतीचा जुमला हेच दाखवून देतो.

Story img Loader