श्रीरंजन आवटे

मुळात परंपरा एका बिंदूपाशी संपते आणि तिथून आधुनिकता सुरू होते, असे परंपरा विरुद्ध आधुनिकतेचे सरधोपट द्वैत नेहरूंनी उभे केले नाही.

nyaymurti mahadev govind ranade lokrang article
प्रबोधनयुगाच्या प्रवर्तकाचे विचार
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
pune mns Office bearers and activists became Active during elections time
पुण्यात ‘मनसे’ला मराठी माणसाची पुन्हा आठवण
Gandhi assassination Hindu Mahasabha Mangutiwar Narayan Apte Gwalior
‘गांधीहत्या’ म्हणताच काय आठवते?
loksatta article on constitutional ethics
घटनात्मक नैतिकता म्हणजे नेमके काय?
Lakshman Shastri Joshi Manusmriti Dahan and Tarkatirtha
तर्कतीर्थ विचार: मनुस्मृती दहन व तर्कतीर्थ
painting show woman in the Byzantine period
दर्शिका: बाईच्या जातीनं कसं दिसायला हवं…?
Rahul Gandhi list on dishonest people
‘आप’च्या बेईमानांच्या यादीत राहुल गांधींचाही समावेश, भाजपानंतर आता थेट काँग्रेसही लक्ष्य

‘‘मला कोणी ब्राह्मण आहे की ब्राह्मणेतर आहे की अजून कोणी; यामध्ये तीळमात्रही रस नाही. मला मुळात या जातींचा संदर्भच लक्षात येत नाही. लग्न व्यक्तीशी होतं; जातीशी किंवा समूहाशी नाही.’’

काश्मिरी पंडित असलेल्या नेहरूंनी गांधींना १९३३ साली लिहिलेल्या पत्रात हा उल्लेख केला आहे. या पत्राला संदर्भ आहे तो त्यांच्या धाकटय़ा बहिणीच्या- कृष्णाच्या लग्नाचा. आपल्या बहिणीने काश्मिरी ब्राह्मणाशीच लग्न केले पाहिजे, असा अट्टहास असता कामा नये, अशी जवाहर यांची भूमिका. यावरून त्यांचा त्यांच्या आईशी वाद झाल्याचे चरित्रकार बी. आर. नंदा यांनी नोंदविले आहे. जातव्यवस्थेशी जोडलेल्या कर्मठ परंपरांना नेहरूंचा कडाडून विरोध होता. धर्मशास्त्र सांगते म्हणून अमुक एखादी गोष्ट केली पाहिजे, हे त्यांना अमान्य होते. परदेशातून परतल्यावर प्रायश्चित्त घेतले पाहिजे, शुद्धीकरण केले पाहिजे, अशी त्या वेळची धार्मिक श्रद्धा होती कारण परदेशगमन हे पाप समजले जाई. नेहरूंना असा विधी करण्याविषयी सांगितले, तेव्हा त्यांनी ठामपणे विरोध केला.

आंतरजातीय विवाहाचा आग्रह आणि परदेशगमनानंतर प्रायश्चित्त घेण्यास/ कर्मकांड करण्यास नकार या दोन्हीही खासगी अवकाशातील कृती नेहरूंची आधुनिक दृष्टी स्पष्ट करतात. त्यांनी आत्मचरित्रात म्हटले आहे- ‘परिवर्तनाची नदी आपण रोखू शकत नाही किंवा तिच्या प्रवाहापासून अलिप्तही राहू शकत नाही. मानसिक पातळीवर तर आपण सर्वानी इडनच्या बागेतले सफरचंद खाल्ले आहे, त्यामुळे ती चव विसरूही शकत नाही आणि आदिम अवस्थेतही जाऊ शकत नाही.’

इडनच्या बागेतील अ‍ॅडम-इव्हच्या गोष्टीतील सफरचंदाचे मिथक बायबलमधील आहे. त्याचा संदर्भ देत नेहरू परिवर्तनाचा अटळ नियम सांगतात आणि त्याच वेळी त्यातील अडचणही स्पष्ट करतात. परिवर्तनाची दिशा निर्धारित करण्यासाठी आधुनिक दृष्टीची आवश्यकता असते. ‘आधुनिक’, ‘परिवर्तन’ असे सारेच शब्द सापेक्ष असतात त्यामुळे आधुनिकतेचा प्रकल्प, असे संबोधताना नेहरूंना नेमके काय म्हणायचे आहे, ते समजून घेतले पाहिजे.

नेहरूंच्या विचारांच्या केंद्रस्थानी आधुनिकतेचा समग्र प्रकल्प होता. त्यांची आधुनिकतेबाबतची दृष्टी प्रामुख्याने दोन घटकांतून जन्माला आली- १. युरोपीय प्रबोधनातून (Enlightenment) विकसित झालेला मूल्यप्रवाह २. भारतीय परंपरेतील परिवर्तनवादी विचारप्रवाह.

हॅरो स्कूल आणि नंतर केम्ब्रिज विद्यापीठात शिकल्यामुळे पाश्चात्त्य सभ्यतेशी त्यांचा जवळून परिचय झाला होता. पुढे ब्रिटिशांशी लढताना युरोपीय साम्राज्यवादी संस्कृतीशी संघर्ष झाला. युरोपीय प्रबोधनामुळे नेहरू प्रभावित झाले होते. केवळ अनुभवातूनच नव्हे तर वैचारिक, बौद्धिक पातळीवर नेहरू प्रबोधनातल्या मूल्यप्रवाहाशी घनिष्ठरीत्या जोडले गेले होते. त्यामुळेच कार्ल मार्क्‍स, सिग्मंड फ्रॉइड, चार्ल्स डार्विन, ऑस्कर वाइल्ड, फ्रेडरिक नित्शे यांसारख्या अवघ्या मानवी सभ्यतेच्या जागतिक पातळीवरील विचारविश्वात घुसळण घडवून आणणाऱ्या सामाजिक आणि नैसर्गिक शास्त्रातील तज्ज्ञांच्या विचारांचा प्रभावही त्यांच्यावर होता. 

दुसरीकडे ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’सारख्या पुस्तकातून भारतीय परंपरेशी नेहरूंचे नाते स्पष्ट होते. वेदांतातील अद्वैती तत्त्वज्ञानाकडे ते आकृष्ट झाले होते. कवी तुलसीदासाचे रामचरितमानस हे सुंदर ‘आध्यात्मिक आत्मचरित्र’ आहे, असे त्यांना वाटे. अकबराचा राज्यकारभार त्यांना आश्वासक वाटत असे. बुद्ध त्यांना जवळचा वाटे. बुद्धाच्या दिशेने गेले पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. भारतीय परंपरेविषयीच्या नेहरूंच्या आकलनाला दोन कौटुंबिक आयाम आहेत. कौटुंबिक पार्श्वभूमीतील बहुलता (Plurality) आणि कर्मठपणाला विरोध (Heterodoxy).

नेहरूंनी आत्मचरित्राच्या सुरुवातीलाच राज कौल या आपल्या पूर्वजाचा उल्लेख केला आहे. राज कौल हे संस्कृत आणि पर्शियन भाषेतील विद्वान होते. नेहरूंचे काका नंदलाल नेहरूदेखील पर्शियन भाषेतील विद्वान होते. त्यांना अरबी भाषेची जाण होती. काश्मिरी पंडित असल्याने हिंदू परंपरेची जाण असणारे तर अनेक नातलग होते. नेहरूंनीच नोंदवल्याप्रमाणे त्यांची अनेक चुलतभावंडे कर्मठ परंपरांच्या विरोधात होती. पुराणमतवादी अंधश्रद्धांची खिल्ली उडवण्याइतपत ते परिवर्तनवादी होते. या दोन्ही घटकांमुळे नेहरू युरोपीय सभ्यतेला सामोरे जाईपर्यंत आधुनिकतेच्या भारतीय मुशीत घडले होते. त्यामुळे जात, धर्म, लिंगभाव, देश यांसारख्या जन्माधारित ओळखींना (scribed identities) प्रश्नांकित करत नेहरूंचा प्रवास कर्तृत्वाधारित ओळखीकडे (acquired identities) सुरू झाला होता. हा प्रवास ही आधुनिकतेची पहिली पायरी आहे. यामुळेच मानश फिराक भट्टाचार्जी यांनी ‘नेहरू अ‍ॅण्ड द स्पिरिट ऑफ इंडिया’ या त्यांच्या अलीकडेच प्रकाशित झालेल्या पुस्तकात नेहरूंची आधुनिकता ही दुहेरी स्वरूपाची असल्याबाबत मांडणी केली आहे.

नेहरू विवेकवादी, आधुनिक होते. विवेकवादी किंवा आधुनिक असण्याचा अर्थ परंपरा नाकारणे असा नव्हे. आधुनिक असणे म्हणजे मानवी मनाच्या आध्यात्मिक शोधाला दुय्यम लेखणे नव्हे. आधुनिक असणे म्हणजे पाश्चात्त्य पेहराव करणे नव्हे किंवा युरोपीय जीवनशैली अंगीकारणे नव्हे. उलटपक्षी परंपरेच्या गतिज (dynamic) स्वरूपाशी समरस होण्याला महत्त्व दिले. त्यांच्या आधुनिकतेच्या धारणेत मानवी मनाच्या आध्यात्मिक प्रवासाच्या आलेखाचा शोध घेण्याची प्रेरणा दिसून येते. इंग्रजी भाषेविषयी नेहरूंना प्रेम असले तरीही प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून दिले पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. इंग्रजी म्हणजे आधुनिकता, इंग्रजी म्हणजे श्रेष्ठता या समीकरणांना त्यांनी नकार दिला. त्यांची आधुनिकतेची धारणा अशी व्यामिश्र स्वरूपाची, त्यातले बारकावे लक्षात घेत विकसित होणारी आहे, हे महत्त्वाचे.

नेहरूंच्या आधुनिकतेच्या प्रकल्पात तीन प्रमुख बाबी होत्या- १. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार २. प्रगतीचे मूल्य ३. राज्यसंस्थेचे विवेकी साधन. तर्क, विवेकाला महत्त्व  देत नेहरूंनी वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अंधश्रद्धांना कडाडून विरोध केला. त्यामुळे नेहरूंच्या भारतात गणपती हे प्लास्टिक सर्जरीचे उदाहरण ठरत नव्हते. गरिबी, रोगराई, विपन्नावस्था या सगळय़ातून बाहेर पडण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन हा मार्ग असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला.

त्यांनी प्रगती साधण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानावर अधिक भर दिला. कॉरब्युसरसारख्या स्विस-फ्रेंच वास्तुविशारदाबरोबर शहरी नियोजनाचे प्रयोग केले. पी. सी. महालनोबिस यांच्यासमवेत राष्ट्रीय नियोजन केले. होमी भाभांसह वैज्ञानिक प्रकल्प हाती घेतले. इंडियन सिव्हिल सव्‍‌र्हिसेसच्या (ICS) सक्षमीकरणातून संस्थात्मक उभारणी केली.

या साऱ्या आधुनिकतेच्या भव्य प्रकल्पात तंत्रज्ञानावर त्यांची विशेष भिस्त होती. तंत्रज्ञानाच्या वापराच्या संदर्भात गांधी आणि नेहरू यांच्यात थेट मतभेद होते. ‘हिंद स्वराज’मध्ये गांधींनी पाश्चिमात्य सभ्यतेतून आकाराला येणाऱ्या तंत्रज्ञानाला विरोध केला. त्यातून मानवी श्रमाचे अवमूल्यन होत असल्याबाबतही मांडणी केली. नेहरूंच्या आधुनिकतेच्या प्रकल्पात तंत्रज्ञान ही मुक्तिदायी वाट होती. तिच्या वापरातून मानवी शोषण, अन्याय यातून बाहेर पडण्याच्या शक्यता होत्या. तंत्रज्ञानात्मक सभ्यतेतून येणाऱ्या आध्यात्मिक रितेपणाला पर्याय म्हणून नेहरू कला, साहित्य, संगीताकडे पाहात. म्हणूनच साहित्य अकादमी, संगीत नाटक अकादमी, ललित कला अकादमी यांसारख्या संस्था स्थापन करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. साहित्य अकादमीचे तर ते पहिले अध्यक्ष होते. स्वत: प्रतिभावंत लेखक होते. त्यांच्या लेखक म्हणून घडविण्यातही आधुनिकतेच्या दृष्टीची निर्णायक भूमिका होती.

आधुनिकतेच्या प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे राज्यसंस्थेचे विवेकी साधन. धर्मनिरपेक्ष, लोकशाहीप्रधान असणे हा तर राज्यसंस्थेचा गाभा असला पाहिजे, याविषयी ते सातत्याने मांडणी करत होतेच. मात्र धर्मनिरपेक्षतेचे मोल अधोरेखित करताना त्यांनी तुर्कस्तानच्या केमाल पाशाप्रमाणे आधुनिकता लादली नाही. अर्थात केमाल पाशाच्या तथाकथित आधुनिकतेत वरपांगी पाश्चात्त्य अनुसरणाला मूल्यांहून अधिक महत्त्व होते. याउलट नेहरूंच्या दृष्टिकोनानुसार, लोकप्रतिनिधी हा आधुनिक, विवेकी प्रकल्पाचा दूत असला पाहिजे, अशी त्यांची अपेक्षा होती. तसेच राज्यसंस्थेची आधुनिकतेबाबतची धारणा ही सर्वसाधारण समाजाच्या दोन पावले पुढे असली पाहिजे हा त्यांचा आग्रह होता.

थोडक्यात, आधुनिकता स्वीकारताना भारताने पाश्चिमात्यांचे अंधानुकरण केले नाही किंवा भारतीय पुराणमतवादी परंपरांचे पुनरुज्जीवन केले नाही. या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत पंतप्रधानपदी असलेल्या नेहरूंसारख्या माणसाची भूमिका निर्णायक ठरली.

मुळात परंपरा एका िबदूपाशी संपते आणि तिथून आधुनिकता सुरू होते, असे परंपरा विरुद्ध आधुनिकतेचे सरधोपट द्वैत नेहरूंनी उभे केले नाही. परंपरा आणि आधुनिकता यांची सातत्यशीलता त्यांनी महत्त्वाची मानली. शिव विश्वनाथन यांच्या मते, आधुनिकतेचे मूर्तिमंत रूप म्हणजे नेहरू होय. त्यामुळे नेहरूंसाठी ‘मिस्टर मॉडर्न’ असे संबोधन अधिक यथार्थ आहे. ब्रिटिश वसाहतवादाच्या आधुनिकतेच्या आवृत्तीला पर्यायी सांस्कृतिक संरचना देण्यात नेहरू कितपत यशस्वी ठरले हा मुद्दा विवाद्य असला तरी भारतीयांच्या हाती आधुनिकतेचा चष्मा देण्याचे मौलिक कार्य त्यांनी केले, हे निश्चित!

लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राज्यशास्त्राचे अध्यापन करतात. 

poetshriranjan@gmail.com

Story img Loader