श्रीरंजन आवटे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेहरूंनी देशासाठी काय केलं, या मुद्दय़ाभोवती अलीकडच्या काळात सार्वजनिक चर्चा फिरताना दिसते. आजच्याच राजकारणाच्या भाषेत सांगायचं तर नेहरूंनीही मंदिरंच उभारली, पण ती विज्ञाननिष्ठेची, आधुनिकतेची, औद्योगिकतेची..

‘‘परकीय वर्चस्वाखाली असलेल्या इतर देशांप्रमाणेच भारतामध्येही राष्ट्रवाद हीच सध्याची मूलभूत, केंद्रभागी असलेली विचारधारा आहे. ते स्वाभाविकही आहे. मात्र आर्थिक बाबतीतही अनेक बदल होताहेत आणि त्यातून नवं जग आकाराला येत आहे. जगभरामध्ये समाजवादी विचारांचा प्रभाव वाढतो आहे. ‘वैज्ञानिक समाजवाद’ हा भारतासाठी आणि इतर जगासाठी यथायोग्य मार्ग आहे, अशी धारणा बुद्धिवंतांमध्ये बळावत चालली आहे. याच धारणेतून काँग्रेसमधील समाजवादी गट जन्माला आला आहे. राष्ट्रवाद आणि समाजवाद यांच्या व्यवहार्य युतीचं प्रतिनिधित्व करणारा हा समाजवादी गट आहे.’’

बॉम्बे क्रोनिकलमध्ये १९ नोव्हेंबर १९३५ रोजी नेहरूंनी केलेल्या मांडणीतला हा उतारा आहे. पुढे नेहरू सांगतात की, आजच्या काळात राष्ट्रवाद कितीही जरुरीचा असला तरीही देशातील आर्थिक समस्यांचं उत्तर तो देऊ शकत नाही! देशासमोरचा सर्वात मोठा प्रश्न कृषी क्षेत्राबाबतचा आहे आणि त्यावरचा उपाय राष्ट्रवादाकडे नाही. याउलट समाजवाद अशा मूलभूत प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्यामुळे सहकारी तत्त्वावर आणि सामूहिक भागीदारीवर शेती कशी असू शकते, याचा ऊहापोह नेहरू करतात.

या सगळय़ा मांडणीमध्ये पुन्हा पुन्हा विज्ञानाच्या निर्णायक भूमिकेकडे ते लक्ष वेधून घेतात. १९ जुलै १९३३ रोजी इंदिरेस लिहिलेल्या पत्रात नेहरू म्हणतात : ‘इतिहासाच्या पानांवर नजर टाकली असता, सामान्य माणसांचं जगणं अतिशय दयनीय, दु:खीकष्टी स्वरूपाचं राहिलेलं आहे. आता कुठं विज्ञानामुळे त्यांच्यावरील कित्येक वर्षांच्या अन्यायाचं जोखड थोडंस दूर होतं आहे.’

या भूमिकेमुळेच नेहरू काँग्रेसमधील समाजवादी गटाचे प्रतिनिधी होते. वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारलेला समाजवाद त्यांना प्रिय होता. मार्क्‍सवादी परिप्रेक्ष्यातून समाजवादी उत्तरं शोधण्यावर त्यांचा भर होता. ऑगस्ट १९३६ मध्ये ‘ऑल इंडिया स्टुडंटस कॉन्फरन्स’ (AISF) या विद्यार्थी संघटनेचं उद्घाटन नेहरूंच्या हस्ते झालं. या संघटनेने ‘वैज्ञानिक समाजवाद’ हीच आपली विचारधारा असल्याचं जाहीर केलं. तरुणाईशी संवाद साधत ही नवी समाजवादाची परिभाषा नेहरू मांडत होते म्हणून तर भगतसिंगसारखा कम्युनिस्ट क्रांतिकारक त्यांच्या विवेकी विज्ञानवादी समाजवादी भूमिकेमुळे प्रभावित होत होता.

जग जपानवरच्या अणुबॉम्ब हल्ल्याने भयभीत झालं होतं आणि विज्ञानाच्या भूमिकेविषयीच साशंक होतं तेव्हा नेहरू कमालीच्या आत्मविश्वासाने, आशेने विज्ञानाकडे पाहात होते. स्वातंत्र्याच्या आधी १९४६ लाच नेहरू आयसेनहॉवरला भेटून आण्विक ऊर्जा आयोगाची मोर्चेबांधणी करत होते. अवकाश संशोधनासाठीची पायाभूत बैठक घडवत होते. होमी भाभा, मेघनाद साहा, शांति स्वरूप भटनागर, विक्रम साराभाई, पी सी महालनोबिस अशी तगडी टीम त्यांच्यासोबत होती.

या टीममुळेच तर काऊन्सिल ऑफ सायन्टिफिक अ‍ॅण्ड इंडस्ट्रियल रिसर्च (CSIR) सारखी संस्था आकाराला आली. मेघनाद साहा आणि इतर तज्ज्ञांनी मिळून १९३५ साली सुरू केलेलं नियतकालिक ‘सायन्स अ‍ॅण्ड कल्चर’ आणि काँग्रेसमधील राष्ट्रीय नियोजन समितीतील चर्चा-विमर्शाचा परिपाक म्हणजे ही संस्था. या संस्थेच्या माध्यमातून नेहरूंनी १९४८ ते १९५८ या दहा वर्षांच्या काळात २२ राष्ट्रीय प्रयोगशाळा उभारल्या. टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) तर १९४५ सालीच अस्तित्वात आलेल्या संस्थेला नेहरूंनी प्रोत्साहन दिलं. स्वातंत्र्यानंतर अवघ्या तीन वर्षांत नलिनी रंजन सरकार यांच्या अध्यक्षतेखालील २२ सदस्यीय समितीच्या प्रयत्नांमधून १९५० साली इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) ही प्रतिष्ठित संस्था पश्चिम बंगालमध्ये खरगपूरला स्थापन झाली. इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स (IISs) ची स्थापना असो की इंडियन स्पेस अ‍ॅण्ड रिसर्च ऑर्गनायझेशन (SRO)ची मुहूर्तमेढ रोवणं असो, नेहरूंनी देशाच्या विज्ञानवादी दृष्टिकोनातील विकासाचा सुकाणू हाती ठेवला. विज्ञान व तंत्रज्ञान विभाग पंतप्रधानांनी स्वत:च्या अखत्यारीत ठेवला होता, यात काय नवल! इंडियन सायन्स काँग्रेसचे वैज्ञानिक नसलेले पहिले अध्यक्षही नेहरूच.

भाक्रा नानगल प्रकल्प असो की भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) सारख्या कंपन्या किंवा विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात उभारलेल्या अनेक संस्था यांना नेहरूंनी ‘आधुनिक भारताचे मंदिर’ असं म्हटलं आहे. प्रत्यक्षात कट्टर धार्मिक नसलेल्या नेहरूंनी अनेकदा धार्मिक परिभाषा वापरत आधुनिकतेची वाट चोखाळली. त्यामुळे नेहरूंनी ‘मंदिर’ यही बनाया था!

धर्म फक्त अध्यात्माशी संबंधित आणि विज्ञान केवळ भौतिकतेशी संबंधित, या द्वंद्वात्मकतेने धर्म-विज्ञान संबंधांकडे त्यांनी पाहिले नाही. विज्ञानाकडे त्यांनी व्यापक सर्वहितैषी भूमिकेतून पाहिलं. पारलौकिकतेच्या बाता करण्याऐवजी जगण्याचे मूलभूत प्रश्न विज्ञानाच्या माध्यमातून सोडवता येऊ शकतात, यावर त्यांचा विश्वास होता.

ज्या देशात निरक्षरता, उपासमारी, बेरोजगारी, विषमता इतक्या मोठय़ा प्रमाणावर आहे, त्या देशाने अवकाश संशोधनासाठी धडपड करणं याकडे जग कुत्सित हसून बघत असताना नेहरूंच्या मनाच्या तळाशी या जमिनीवरील प्रश्नांसाठी अवकाशातल्या भरारीमध्ये दडलेलं विज्ञानाचं उत्तर होतं. नेहरू हे सारे प्रयत्न करत असताना बंगालमधील भीषण दुष्काळ देशाने अनुभवला होता. फाळणीसारखी तीव्र जखमा घेऊन देश चालला होता. अशा वेळी नेहरू विज्ञान आणि समाजवादाची सांगड घालू पाहतात आणि त्यातून आधुनिक जगाकडे प्रयाण करण्याची अंतर्दृष्टी देतात. त्यांना विज्ञान हे वेदनाशामक बाम असल्याप्रमाणे वाटतं म्हणूनच ते विज्ञानाकडे एकारलेल्या नजरेनं न पाहता एकात्म (holistic) आणि आंतरविद्याशाखीय (inter- disciplinary) दृष्टीने पाहतात.

विज्ञान हे केवळ विकासाचं, प्रगतीचं साधन नव्हे आणि समाजवाद म्हणजे निव्वळ आर्थिक प्रारूप नव्हे. विज्ञान हे आशेचं, स्वप्नांचं संप्रेरक आहे, तर समाजवाद सर्वाच्या अभ्युदयाची वाट प्रशस्त करणारं उत्प्रेरक आहे, अशी नेहरूंची धारणा होती. विज्ञान म्हणजे रसायनांचा खेळ नव्हे किंवा गतिशास्त्राच्या नियमांची जंत्री नव्हे. विज्ञान म्हणजे खुल्या मनाने विचार करण्याची खिडकी. आपल्याला अंतिम सत्य गवसलेलं नाही, हे नम्रतेनं मान्य करत सत्य शोधण्याची पराकाष्ठा म्हणजे विज्ञान. विज्ञानाचा साधनात्मक (instrumental) अर्थाने विचार न करता विज्ञानाचा मानवतावादी, मुक्तिदायी विचार नेहरू सांगत होते. अंधश्रद्धा, कर्मठ रूढी-परंपरा या दलदलीतून बाहेर पडण्याचा विवेकी मार्ग वैज्ञानिक दृष्टिकोनातून साध्य होऊ शकतो, अशी त्यांची भूमिका होती.

पाश्चात्त्य जग विज्ञानाकडे केवळ आर्थिक वाढ आणि भांडवली विकासाचं साधन म्हणून पाहात होतं तेव्हा नेहरूंच्या समाजवादी मानवतावादाने विज्ञानाला सर्वाच्या आनंदाचा मार्ग म्हणून पाहिलं. नेहरूंच्या या धोरणात्मक दृष्टीचा वसाहतवादी चौकटीतून नव्याने स्वतंत्र झालेल्या देशांच्या नेत्यांवर मोठा प्रभाव पडला. वैज्ञानिक समाजवादाचा ‘नेहरू पॅटर्न’ इतरांसाठी वस्तुपाठ ठरला.

इंडियन सायन्स काँग्रेसच्या १९३८ साली झालेल्या अधिवेशनात नेहरू म्हणाले होते, ‘‘ ज्ञान म्हणजे सुखदायी विषयांतर नव्हे; किंवा अमूर्तीकरणाची व्यवस्था नव्हे तर अवघ्या जगण्याचा पोतच (texture) विज्ञानाचा आहे. राजकारणामुळे मला अर्थशास्त्राकडे वळावं लागलं आणि अर्थशास्त्रामुळे विज्ञानाकडे. वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे सगळय़ा समस्यांच्या मुळाकडे आणि अंतिमत: जीवनाकडे.’’ जगण्याचं सम्यक आणि समग्र आकलन करून घेण्यासाठी खुल्या मनाच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचं भिंग हाती हवं, असं नेहरूंचं आग्रही प्रतिपादन आहे.

अलीकडेच नेहरूंच्या टीव्हीवरील पत्रकार परिषदेचा व्हिडीओ बीबीसीने समोर आणला. नेहरू परदेशातही (टेलिप्रॉम्प्टर नसलेल्या काळातही) पत्रकार परिषदा घेत असत, याची नोंद घेणे महत्त्वाचे ठरावे. ब्रिटिशांनी इतकी वर्षे राज्य करूनही आपण ‘कॉमनवेल्थ’मध्ये सामील होण्याचा निर्णय घेतलात. तुम्हा भारतीयांच्या मनात ब्रिटिशांप्रति नाराजी, कटुता नाही का, या क्षमाशीलतेचं कारण काय, अशा आशयाचा प्रश्न एका पत्रकाराने विचारला असता नेहरू म्हणाले, ‘‘पहिलं म्हणजे आम्ही भारतीय लोक टोकाचा विद्वेष करत नाही आणि दुसरं म्हणजे आमच्याकडं गांधी होते!’’

हे खुलं मन विज्ञानाची दृष्टी आहे. त्या खिडकीतून दिसणारा हा आसमंत आहे. द्वेष ही जगण्याची शैली असू शकत नाही. प्रेम हाच जगण्याचा धर्म असू शकतो. असं मानणारा पंतप्रधान वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारलेल्या समताधिष्ठित भारताचं स्वप्न पाहात होता, जनमानसात जागवत होता, म्हणूनच या देशाला मनोहर स्वप्नलोकाचे डोहाळे लागले आणि या विज्ञानाधिष्ठित आधुनिकतेच्या मंदिराने उपोषण, गरिबी, निरक्षरता, अंधश्रद्धा, कर्मठ रूढी, परंपरा यातून बाहेर पडण्यासाठीचं मोठं प्रवेशद्वार खुलं केलं.

लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राज्यशास्त्राचे अध्यापन  करतात.

poetshriranjan@gmail.com

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jawaharlal nehru role in nation building jawaharlal nehru contribution to india development zws