बुटकी म्हणावी अशी कृश चण, चेहऱ्यावर भाबडे भाव, आर. के. लक्ष्मण यांचा ‘कॉमन मॅन’ बहुधा यांच्यावरच बेतलेला असावा असा समज व्हावा, असे व्यक्तिमत्त्व. जयंत सावरकरांचे हे दर्शनी रूप! गुहागरमधून मुंबईत येऊन नाटकाचा ध्यास घेतलेले सावरकर नोकरी सांभाळून जमेल तसे नाटकाच्या प्रांगणात बागडू पाहत होते. वयाच्या विसाव्या वर्षी नाटय़क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या सावरकरांनी सुरुवातीला बराच काळ बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून काम केले. हौशी नाटय़संस्थांतून कामे करताकरता मुंबई मराठी साहित्य संघाच्या वर्तुळात ते आले आणि हळूहळू त्यांच्या नाटय़शाखेत प्रवेश मिळवला.
प्रारंभी त्यांनी आचार्य अत्रेंच्या ‘सम्राट सिंह’ (किंग लिअर) या नाटकात मा. दत्ताराम यांच्याबरोबर काम केले. ते नाटक फारसे चालले नाही तरी त्यांची भूमिका प्रशंसेस पात्र ठरली. अनंत दामले, केशवराव दाते, जयराम शिलेदार, नानासाहेब फाटक, बाळ कोल्हटकर, भालचंद्र पेंढारकर, रमेश देव, राजा परांजपे, रामदास कामत ते आजच्या पिढीतील मंगेश कदम, चंद्रकांत कुलकर्णी, अद्वैत दादरकर अशा तब्बल चार पिढय़ांबरोबर त्यांनी गेली
सहा-साडेसहा दशके काम केले.
संगीत रंगभूमी, बालरंगभूमी, प्रायोगिक रंगभूमी, हौशी रंगभूमी, व्यावसायिक रंगभूमी अशा सगळय़ा प्रवाहांत त्यांनी स्वत:ला आजमावून पाहिले. यादरम्यान ‘तुझे आहे तुजपाशी’तील आचार्य, ‘एकच प्याला’तील तळीराम, ‘व्यक्ती आणि वल्ली’तील अंतू बर्वा आणि हरीतात्या या भूमिकांवर त्यांनी आपली छाप पाडली. ‘एकच प्याला’तील पल्लेदार संवाद ते लिलया सादर करीत.कुणाचा प्रयोग एखाद्या कलावंताअभावी अडत असेल तर ते आयत्या वेळीही त्यात उभे राहत आणि तो प्रयोग धकवून नेत. त्यामुळे आपल्या ६०-६५ वर्षांच्या रंगमंचीय कारकीर्दीत ते नेहमीच सर्वाना हवहवेसे वाटत राहिले.
‘अपराध मीच केला’, ‘अपूर्णाक’, ‘अलीबाबा आणि चाळीस चोर’, ‘अल्लाद्दिन आणि जादूचा दिवा’, ‘अवध्य’, ‘एकच प्याला’, ‘दिवा जळू दे सारी रात’, ‘दुरितांचे तिमिर जावो’, ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘एक हट्टी मुलगी, ‘टिळक आणि आगरकर’, ‘प्रेमा तुझा रंग कसा’, ‘बेबंदशाही’, ‘मातीच्या गाडय़ाचे प्रकरण’, ‘वन रूम किचन’, ‘सूर्यास्त’, ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘लग्नाची बेडी’.. ही त्यांच्या नाटकांची नावे जरी पाहिली तरी त्यांच्या अभिनयातील वैविध्याचा अंदाज येतो. त्यांनी दूरदर्शनवरील ‘गजरा’मधील आणि आकाशवाणीच्या ‘प्रपंच’मधील भूमिकाही तेवढीच समरसून साकारली. शंभरहून अधिक मराठी चित्रपटांत आणि तीसवर हिंदी चित्रपटांत त्यांनी काम केले.
अजय देवगण, इरफान खान, जॉन अब्राहम यांसारख्या अभिनेत्यांबरोबरही त्यांनी काम केले. त्यांनी ‘मी एक छोटा माणूस’ नावाने आत्मचरित्र लिहिले. त्यांच्या या नाटय़निष्ठेचे फळ त्यांना पुरस्कारांच्या रूपात मिळाले. अ. भा. मराठी नाटय़ परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार, विष्णुदास भावे पुरस्कार, केशवराव दाते पुरस्कार, मा. नरेश पुरस्कार, शासनाचा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार अशा अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी ते सन्मानित झाले. १९९७ मध्ये ते नाटय़संमेलनाचे अध्यक्ष झाले. एकुणात कृतार्थ कारकीर्द त्यांना लाभली. त्यामुळे ते शेवटपर्यंत सुखासमाधानाने कार्यरत राहिले. त्यांना विनम्र आदरांजली.