जेसीबी प्राइझ’ हे भारतीय इंग्रजी कादंबऱ्यांसाठी २०१९ पासून सुरू झालेलं, वट्ट २५ लाख रुपयांचं पारितोषिक! या साऱ्या रोख पारितोषिकांची गंगोत्री म्हणजे ‘बुकर’, हे वेगळं सांगायला नको. तर बुकरप्रमाणेच इथंही आधी दीर्घयादी, मग पाचच पुस्तकांची लघुयादी आणि ऐन पारितोषिक समारंभातच विजेत्याची घोषणा, असा खाक्या असतो. यंदा हा सोहळा १३ नोव्हेंबरला होणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे, यंदाच्या लघुयादीतली सर्वच्या सर्व पाचही पुस्तकं ही निरनिराळय़ा भारतीय भाषांतून इंग्रजीत अनुवादित झालेली आहेत. त्यात मराठी नाही ही बातमी कधी नसतेच जणू, आणि बंगाली मात्र आहे, यातसुद्धा बातमीसारखं काही नाही.
पाचपैकी तीन पुस्तकं हिंदी किंवा बंगालीखेरीज अन्य भाषांतून अनुवादित झालेली आहेत. यापैकी मल्याळम्मधून अनुवादित झालेली कादंबरी आहे शीला टॉमी लिखित ‘वल्ली’(अनु.- जयश्री कालाथिल), मग नेपाळी कादंबरी आहे.. चुडेन काबिमो यांनी लिहिलेल्या ‘फातसुंग’ या मूळ कादंबरीची इंग्रजी ‘साँग ऑफ द सॉइल’ (अनु. -अजित बराल), खालिद जावेद यांची उर्दू कादंबरी इथं ‘द पॅराडाइज ऑफ फूड’ (अनु. – बरान फारूकी) या इंग्रजी स्वरूपात आहे, मनोरंजन ब्यापारी यांची बंगालीतून इंग्रजीत आलेली ‘इमान’ ही आत्मपर कादंबरी (अनु. – अरुणव सिन्हा) आहे, तर हिंदीतून इंग्रजीत आलेली कादंबरी आहे, बुकर इंटरनॅशनल पारितोषिकाच्या यंदाच्या विजेत्या गीतांजली श्री यांनी मुळात ‘रेत समाधी’ म्हणून लिहिलेली ‘टूम्ब ऑफ सॅण्ड’ (अनु.- डेझी रॉकवेल)! आता १३ तारखेच्या सोहळय़ात बुकरविजेती कादंबरीच इतरांवर बुलडोझर (याचा भारतीय भाषांत अनुवाद ‘जेसीबी’ असाच होतो) फिरवणार की या ‘रेत समाधी’वर मायदेशात मात्र बुलडोझर चालणार, हे पाहावं लागेल.