सन २०२० च्या ज्ञानपीठ पुरस्कारामुळे (कोंकणी साहित्यिक दामोदर मावजो यांच्यासह) आसामी कवी नीलमणि फुकन यांचे नाव देशभर चर्चेत आले खरे, पण आसामी साहित्यरसिकांना त्यांच्याबद्दल नेहमीच ममत्व होते. या कवीने १९ जानेवारी रोजीच अखेरचा श्वास घेतला असला तरी, त्यांच्या ‘अखेरच्या पत्रा’विषयीची उत्कंठा आसामी रसिकांना आजही आहे. अखेर त्या पत्रातून, केवळ फुकन यांचाच साहित्यिकाचा आत्मसन्मान पुन्हा प्रस्थापित व्हावा असे वाटणाऱ्यांची संख्याही मोठी आहे..

.. हे पत्र अर्थातच मृत्यूच्या कैक वर्षे आधी फुकन यांनी लिहिले, ते सीलबंद करविले आणि ‘माझ्या मृत्यूनंतर काही दिवसांनीच ते उघडा’ असेही जाहीर केले. साहित्यिक नित्या बोरा यांच्याकडे हे पत्र सध्या आहे. त्या पत्रातील मजकूर १९७४ साली फुकन यांच्यावर झालेल्या- आणि कालांतराने साधार खोडलासुद्धा गेलेल्या- ‘वाङ्मयचौर्या’च्या आरोपाबद्दल अधिक माहिती देणारा आणि तो खोटा आरोप करणाऱ्यांचे पितळ उघडे पाडणाराच असणार, अशी खात्री बहुतेकांना आहे. पण पत्र उघडले गेलेले नाही.

‘न उघडलेले पत्र’ जसे स्पष्ट संदेश देत नाही, अर्थाच्या शक्यता खुल्याच ठेवते, तशीच नीलमणि फुकन यांची कविता! १९३३ चा त्यांच्या जन्म आणि कवितांची पहिली वीण अर्थातच वयाच्या विशीतली, तेव्हापासूनच्या सुमारे सहा दशकांत त्यांच्या कवितेने बदल स्वीकारले खरे, पण मुळात निव्वळ भावकाव्यामध्ये रमण्याचा त्यांचा पिंड नव्हता आणि ‘सामाजिक आशय’ मांडणारी गद्यकाव्ये लिहिण्याचा तर नव्हताच नव्हता. याच्या मधली वाट समाजातील दु:खांकडे संवेदनशीलतेने पाहण्याची, त्या संवेदनेसाठी प्रतिमा शोधण्याची. त्या वाटेवरून फुकन यांची वाटचाल झाली. महाविद्यालयात साहित्याचे अध्यापन करत असताना, विश्वकवितेचा पैस त्यांनी डोळसपणे पाहिला आणि चीनपासून दक्षिण अमेरिकेपर्यंतच्या कवितेची स्थितीगती आकळून घेतली. त्यांची स्वत:ची कविताही या अभ्यासातून प्रतिमासमृद्ध होत राहिली.

चित्रकलेतील अतिवास्तववादात (सररिअ‍ॅलिझम) शोभाव्यात अशा प्रतिमा त्यांच्या कवितेत असत. याच चित्रशैलीशी नाते सांगणारा दक्षिण अमेरिकी स्पॅनिश-भाषिक साहित्यातला जादूई वास्तववादही फुकन यांच्या कवितांमध्ये डोकावू लागला. मात्र त्यांच्या एका कवितेवर ‘केरळमधून प्रकाशित होणाऱ्या ‘एको’ या नियतकालिकात नुकत्याच आलेल्या एका स्पॅनिश कवितेची ही सहीसही नक्कल’ असा आरोप एप्रिल १९७४ मध्ये कुणा ‘मृदुपबन बरुआ’ नामक व्यक्तीने ‘आमार प्रतिनिधी’ या मासिकाला पत्र लिहून केला. गीतकार- संगीतकार- गायक भूपेन हजारिका यांच्या संपादकत्वाखाली निघणाऱ्या त्या मासिकाने, ते पत्र छापले आणि फुकन यांच्यावर डाग लागला. परंतु केरळमध्ये ‘एको’ हे नियतकालिकच नाही- आणि संबंधित स्पॅनिश कवीची ‘नाइटमेअर’ या नावाने इंग्रजीत आलेली कोणतीही कविताच नाही, असे पुढे सिद्ध झाले! तरीही त्या पत्रात काय असेल? हजारिकांचीच बदनामी तर नसेल? याची उत्कंठा आसामप्रमाणे अन्य ठिकाणच्या रसिकांनाही असू शकते.

Story img Loader