परंपरेने मी एक शेतकरी आहे. तुम्ही जर माझ्या पायांकडे पाहिलं तर ते गावाकडच्या मातीने माखलेले दिसतील. काही काळ मी वकील म्हणूनही काम केलं. खेड्यातली भाषा हेच माझ्या अभिव्यक्तीचं माध्यम होतं. व्याकरणातल्या गुंतागुंतीत मी फारसा अडकलो नाही. वाक्यांचा थेट उपयोग केला. मी जीवनावर आणि माणसांवर प्रेम करतो. अस्पृश्य, वंचित, उपेक्षित आणि समाजाच्या तळाच्या वर्गातल्या घटकांशी माझं नातं खूप गहिरं आहे. त्यांच्याच सोबत मी सर्वाधिक काळ राहिलो आहे आणि त्यांच्या सुखदु:खांचा वाटेकरीही झालो. मी त्यांच्या आशा-आकांक्षांना जोजावलं आणि त्यांचं दु:खही वाटून घेतलं. ही माणसं तुम्हाला गावंढळ वाटतील, बावळट वाटतील पण त्यांची जगण्यावर जी निष्ठा आहे तिच्यावर प्रश्नचिन्ह लावलं जाऊ शकत नाही. त्यांच्यातलाच मी एक तुमच्यासमोर उभा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१९८५ साली ज्ञानपीठ मिळाल्यानंतर एका गावाकडच्या लेखकानं व्यक्त केलेली ही भावना आहे. तकषी शिवशंकर पिल्लै हे केरळातल्या कुट्टनाड प्रदेशातल्या छोट्याशा गावात जन्मलेले एक लेखक. त्यांचं मल्याळम भाषेतलं कथा आणि कादंबरी लेखन विपुल आहे. ‘जीवनाकडून मी काय शिकलो’ या त्यांच्या लेखात त्यांनी आपली आई शेतात कष्टत असताना आपला जन्म गवताच्या गंजीवर झाल्याचं सांगितलं आहे. अर्थात ते आले शेतकरी कुटुंबातून. पण आपली आई बाकीच्या मजूर स्त्रियांसोबत राबत असे असं त्यांनी नमूद केलं आहे. कादंबरी या वाङ्मय प्रकारावर त्यांची विशेष हुकुमत होती. त्यांच्या चेम्मीन, कयर, रट्टीटंगळी या अतिशय गाजलेल्या कादंबऱ्या. ‘चेम्मीन’चा ‘मछुआरे’ या नावाने हिंदीत अनुवाद आहे आणि मराठीत ती मूळ मल्याळम नावानेच अनुवादित झालेली आहे. ‘कयर’ ही कादंबरी ‘रस्सी’ या नावाने हिंदीत उपलब्ध आहे. ‘रट्टीटंगळी’ या कादंबरीचा ‘दोन शेर धान’ या नावाने अनुवाद उपलब्ध आहे. अनेक कादंबऱ्या आणि सहाशेहून अधिक कथा अशी त्यांची निर्मिती आहे. समाजातल्या तळाच्या वर्गाविषयी लिहिण्याबद्दल त्यांची तुलना अनेकदा प्रेमचंद यांच्याशीही केली जाते. एवढेच नाही तर काही लोक त्यांना मल्याळम भाषेतील प्रेमचंद असेही म्हणतात. अर्थात हे मात्र त्यांच्यावर अन्याय केल्यासारखं आणि त्यांच्या आशयविश्वाला मर्यादित केल्यासारखं आहे. त्यांची स्वत:चीच निर्मिती एवढी अफाट आहे की अन्य कोणाशी त्यांची तुलना करण्यापेक्षा त्यांचं अनन्यत्व जास्त मोलाचं ठरतं.

‘कयर’ हा जवळपास अडीचशे वर्षांचा इतिहास आहे. महाभारतातल्या कथावर्णनाची शैली त्यांना आवडली. या महाकादंबरीत पाच पिढ्यांचं वर्णन आहे. सामाजिक जीवनात जे बदल घडत आहेत त्याचंही प्रतिबिंब या कादंबरीत पाहायला मिळतं. कादंबरीत काही राजवटीही येतात, पण राजा, महाराजांचा इतिहास असं तिचं स्वरूप नाही तर ती जनतेच्या अंगाने पुढे जात राहते. महाभारतात जसं असंख्य गोष्टी आहेत, हजारो कथा आहेत तसंच ही कादंबरीसुद्धा अनेक गोष्टींचं संकलन आहे. स्वत:च्या जन्मगावालाच केंद्र मानून त्यांनी ही कादंबरी लिहिली. भारताची आपली स्वत:ची एक कथन परंपरा आहे आणि त्या आख्यान परंपरेला पुनरुज्जीवित करण्याच्या ध्यासातून ‘कयर’चं कथनतंत्र त्यांनी निश्चित केलं. गाव हेच या कादंबरीचं मुख्य पात्र आहे. रात्रीच्या जेवणानंतर महाकाव्याचं निरूपण करण्याची परंपरा त्या भागात होती. शिवशंकर पिल्ले यांचे वडील हे दररोज महाभारताची कथा सांगायचे. बालपणापासून ही कथा एवढी मनात रुतली आहे की लेखन सुरू केल्यानंतर वडिलांचा तो आवाज त्यांच्या कानात घुमत असे. स्वत:तला कथाकार जागवण्याचं काम यातून झाल्याचं त्यांनी नमूद केलं आहे.

भारतीय कादंबरीत कदाचित वर्गसंघर्ष पहिल्यांदाच माझ्या कादंबरीत आलेला आहे असा दावाही शिवशंकर पिल्लै यांनी एका मुलाखतीत केला आहे. केरळातल्या एका विशिष्ट भागात जमीन कायम पाण्याखाली असते. चर खोदून आधी हे पाणी शेतातून बाहेर काढावं लागतं. या कामात अक्षरश: ढोरकष्ट उपसावे लागतात. जमिनींचे मालक आणि शेतमजूर यांच्यातल्या संबंधांचे पापुद्रे उकलणारी त्यांची ‘दोन शेर धान’ ही कादंबरी आहे. याच कादंबरीत शेतमजुरांच्या उठावाचे आणि आंदोलनाचे काही प्रसंग आहेत. या कादंबरीचा संदर्भ त्यांनी आणखी एका मुलाखतीत दिला आहे. ही कादंबरी हिंदीत अनुवादित करण्याची प्रक्रिया साहित्य अकादमीच्या वतीने सुरू होती तेव्हा काहींनी हरकत घेतली. कादंबरी वर्गसंघर्षाबरोबरच डाव्या विचारांचं आग्रही प्रतिपादन करते आणि त्यात मजुरांवरील अत्याचारांच्या संदर्भात अप्रत्यक्षरीत्या काँग्रेसच जबाबदार असल्याचं दिसून येतं असा हा आक्षेप होता. या कादंबरीचा शेवट बदलून द्यायला तकषी यांना सांगितलं गेलं तेव्हा त्यांनी आपण एक अक्षरही बदलणार नसल्याचं सांगितलं. मामला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापर्यंत गेला. कारण ते तेव्हा साहित्य अकादमीचे अध्यक्ष होते. नेहरूंनी ही संहिता वाचली आणि उलट प्रश्न केला, यात आक्षेपार्ह असं काय आहे? ही कादंबरी त्या भाषेतली एक अभिजात साहित्यकृती आहे. तिच्यात बदल करण्याचा आपल्याला काय अधिकार आहे? खुद्द नेहरूंचाच असा अभिप्राय आल्यानंतर प्रकरण निवळलं. अर्थात या कादंबरीतल्या सामाजिक विश्लेषणाचा आधार मार्क्सवादी चिंतन असला, तरी कादंबरीचा नायक असलेला सुरेंद्रन हा तथाकथित आदर्शवादी दाखवलेला नाही. त्याच्या व्यक्तिमत्त्वातही दुभंग आहेच. त्यामुळे या कादंबरीवर डाव्यांनीही आक्षेप घेतला होता.

‘चेम्मीन’ ही या लेखकाची सर्वांत चर्चेतील कादंबरी. जेव्हा कलावादाचं मोठंच प्रस्थ होतं तेव्हा या लेखकानं लिहिण्यास प्रारंभ केला. मच्छीमारांच्या एका अरय नावाच्या जातसमूहात असलेल्या श्रद्धा, चालीरीती, परंपरा यावर ही कादंबरी बेतलेली आहे आणि ती एक अभिजात अशी प्रेमकथा ही आहे. या कादंबरीचे केवळ भारतीय भाषांतच नव्हे तर जगभरातल्याही अनेक भाषांमध्ये अनुवाद झाले असून तिने त्यांना आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवून दिली. या कादंबरीने माझं जीवन बदलून टाकलं असं, ते सांगतात. अर्थात याही कादंबरीवर काही आक्षेप आहेतच. मच्छीमारांच्या समूहात असलेल्या काही अंधश्रद्धांचे ही कादंबरी उदात्तीकरण करते, असा त्यातला एक प्रमुख आक्षेप आहे. या समूहाचं जीवन मी जवळून बघितलं आहे. मी लिहिताना त्यात काही घुसडलं नाही. त्यांच्या परंपरागत चालीरीतींमध्ये काही अंधश्रद्धा आहेत का हेही मी पाहिलं नाही. त्यांचं जीवन जवळून पाहत असताना जी दृश्यं माझ्या मनावर बिंबली त्यांचंच लेखन मी केलं. माझा दृष्टिकोन मी पात्रांवर लादला नाही. गुण आणि दोषांनी युक्त अशा पात्रांना माझ्या कलाकृतीत स्थान मिळालं आहे. मी पात्रांचा शोध घेत नाही, तीच माझ्या कलाकृतीत प्रवेशतात असं यावर त्यांचं उत्तर होतं. दोनशे पानांची ही कादंबरी त्यांनी अवघ्या सात दिवसांत लिहून पूर्ण केली होती. त्यांच्या बहुतेक कादंबऱ्या त्यांनी आठवड्यातच पूर्ण केल्या आहेत. आपली कथनपरंपरा आपण निर्माण केली पाहिजे. भारतीय कादंबरी पाश्चात्य कादंबरीची गुलाम असू नये, असंही पिल्लै यांनी एके ठिकाणी सांगितलं. पट्टीचा पोहणारा जसा पाण्यात खोलवर जाऊन तळ गाठतो आणि थव म्हणजेच गाळ घेऊन वर येतो तसं या लेखकाचं लेखन आहे.
aasaramlomte@gmail.com

लेखक साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक आहेत.