लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपेतर ‘इंडिया’ आघाडीच्या चिंधडया उडत असताना जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (‘जेएनयू’तील) डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनांनी ‘जेएनयू स्टुडंट्स युनियन’च्या निवडणुकीत दाखवलेली एकजूट वाखाणण्याजोगी म्हणता येईल. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष आणि काँग्रेस तिघेही ‘इंडिया’चे घटक असले तरीही लोकसभा निवडणुकीत ते एकमेकांविरोधात लढत आहेत. बिहारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाची जागावाटपाची बोलणी फिसकटली आहेत. तिथे दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे लढण्याची तयारी केली आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार आणि शिवसेना-ठाकरे गट यांच्यामध्ये जागावाटपाच्या असंख्य चर्चा झाल्या आहेत. भाजपविरोधात तगडा पर्याय उभा करण्यासाठी पाटण्यात झालेल्या पहिल्या बैठकीनंतर विरोधकांच्या एकजुटीचा भाजपने धसका घेतला होता. पाच वर्षांत भाजपने ज्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) घटक पक्षांकडे ढुंकूनही पाहिले नव्हते, त्यांचा दिल्लीत पंतप्रधान मोदींनी मेळावा घेतला होता. आता तर भाजप देशभर नवे मित्र शोधून काढून त्यांच्या झोळीत जागा टाकत आहे. या पार्श्वभूमीवर ‘जेएनयू’ निवडणुकीत चारही डाव्या विद्यार्थी संघटनांनी संयुक्तपणे लढून अध्यक्ष-उपाध्यक्ष, महासचिव-सहमहासचिव या चारही पदांवर मिळवलेला विजय लक्षणीय.

हेही वाचा >>> संविधानभान: इंडिया हाच भारत!

maharashtra assembly polls 2024 state economy in decline during bjp rule says chidambaram
भाजपच्या सत्ताकाळात महाराष्ट्राची पीछेहाट; माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची टीका
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Sharad Pawar on chhagan Bhujbal Yeola Assembly Election
Chhagan Bhujbal: छगन भुजबळ यांच्यासमोर येवला मतदारसंघ राखण्याचे आव्हान; शरद पवार भुजबळांच्या विरोधात आक्रमक का?
maharashtra vidhan sabha election 2024 opposition united against ravi rana
लक्षवेधी लढत : रवी राणा यांच्याविरोधात सारे एकवटले
those claiming hindus in danger denying reservation to marathas says manoj jarange patil
‘हिंदू खतरे में’ म्हणणाऱ्यांचे मराठ्यांकडे दुर्लक्ष; मनोज जरांगे यांची महायुतीवर टीका
rebels in mahayuti gives relief to patolas sakoli assembly constituency
लक्षवेधी लढत : महायुतीतील बंडखोरीने पटोलेंना दिलासा
maharashtra assembly election 2024, aheri constituency,
भाजप पाठोपाठ काँग्रेसचाही बंडखोरांना छुपा पाठिंबा, अहेरी विधानसभेत युती, आघाडीत अंतर्गत कलह

‘जेएनयू’मधील चार वर्षांनी झालेली ही निवडणूक २०२४च्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे वैचारिक लढाईच होती. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमार्फत (अभाविप)  संघ-भाजप ‘जेएनयू’वर कब्जा करण्याचा सातत्याने प्रयत्न करत असताना २०१६ पासून ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (आयसा), डेमोक्रॅटिक स्टुडंट्स फेडरेशन (डीएसएफ), स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) आणि ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (एआयएसएफ) या चार संघटना ‘अभाविप’चा पराभव करत आहेत. यंदा महासचिव पदासाठी डाव्यांची संयुक्त उमेदवार स्वाती सिंह हिचे नामांकन मतदानाच्या काही तास आधी रद्द केल्यानंतर डाव्या आघाडीने आंबेडकरी-ओबीसी विचारांच्या ‘बिरसा आंबेडकर फुले स्टुडंट्स असोसिएशन’च्या (बापसा) प्रियांशी आर्य हिला ऐनवेळी पाठिंबा देण्याचा शहाणपणाचा निर्णय घेतला. संघ-भाजपच्या विचारांशी ‘जेएनयू’मध्ये यशस्वी मुकाबला करणाऱ्या विद्यार्थी संघटनांची परिपक्वता ‘इंडिया’तील घटक पक्षांसाठी मोठा धडा ठरेल. करोनापूर्वी २०१९ मधील निवडणुकीत ‘एसएफआय’च्या आयशी घोष अध्यक्ष झाल्या होत्या. त्यानंतर आत्ता ‘जेएनयू’मध्ये निवडणूक झाली असून दरम्यानच्या चार वर्षांच्या काळात ‘जेएनयू’ने हिंसक आंदोलने पाहिली. जेएनयू विद्यार्थी संघटनेने ‘सीएए’विरोधात तीव्र आंदोलन केले होते. त्याविरोधात ‘अभाविप’ आक्रमक होणे साहजिक होते. ५ जानेवारी २०२० च्या रात्री चेहऱ्यावर रुमाल बांधून ५० जणांच्या टोळक्याने ‘जेएनयू’मध्ये धुडगूस घातला होता, त्यांनी विद्यार्थ्यांनाच नव्हे तर प्राध्यापकांनाही मारहाण केली होती. त्यावेळी ‘जेएनयू’चे विद्यार्थी हॉस्टेलच्या शुल्कात केलेल्या दीडशे टक्के वाढीला विरोध करत होते. हिंसाचार करणाऱ्या टोळक्यातील एकालाही दिल्ली पोलिसांनी अटक केली नाही. ‘अभाविप’च्या तत्कालीन सहसचिव अनिमा सोनकर यांनी दोन सशस्त्र तरुण ‘अभाविप’चे सदस्य असल्याचे मान्य केले होते. गेल्या दहा वर्षांमध्ये ‘जेएनयू’ने अनेक आंदोलने पाहिली असून इथे संघ-भाजपविरोधात डाव्यांची वैचारिक लढाई लढली जात आहे. विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत त्याची प्रखरता जाणवत राहते. या वेळी डाव्यांच्या संयुक्त आघाडीने धनंजय या दलित उमेदवाराला अध्यक्ष केले आहे. निवडणूक जिंकल्यानंतर रविवारी रात्री ‘जेएनयू’च्या आवारात केलेल्या भाषणामध्ये धनंजयने ‘इंडिया’चे मुद्दे नेमकेपणाने मांडले आहेत. डाव्या विचारांचे लोक शहरी नक्षल, दहशतवादी, विभाजनवादी असल्याचा भाजप खोटा प्रचार करतो; पण आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी लढत आहोत. देशातील शेतकऱ्यांच्या, गरिबांच्या मुलांना ‘जेएनयू’मध्ये स्वस्तात शिक्षण घेता यावे यासाठी संघर्ष करत आहोत. ग्रंथालय हे विद्यापीठाचा आत्मा असतो; पण तुम्ही (प्रशासन) ग्रंथालयाच्या निधीत ८० टक्के कपात केली आहे. अतिरिक्त जागा कमी केल्या आहेत. ‘जेएनयू’मध्ये शिक्षण घेण्याचे देशभरातील विद्यार्थ्यांचे स्वप्न असते, त्यांची स्वप्ने मारून टाकली जात आहेत, हे धनंजयचे विजयानंतरचे भाषण ‘इंडिया’तील कुठल्याही नेत्याच्या भाषणापेक्षा तगडे म्हणावे लागेल. विद्यार्थिनींचा लैंगिक छळ, समलैंगिकतेच्या मुद्दयावरून होणारा विरोध अशा घटनांकडे दुर्लक्ष केले जाणार नाही, हा धनंजयचा निर्धार ‘जेएनयू’च नव्हे तर देशातील अन्य विद्यापीठांमध्येही आशेचा किरण ठरतो.