अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी जोखीम पत्करून युद्धजर्जर युक्रेनला सोमवारी दिलेली भेट जगभर औत्सुक्याचा आणि चर्चेचा विषय ठरणे स्वाभाविक आहे. रशियाने युक्रेनवर एकतर्फी आणि कोणत्याही चिथावणीविना हल्ला केल्याच्या घटनेस येत्या २४ फेब्रुवारीला एक वर्ष पूर्ण होईल. सुरुवातीला मुसंडी मारूनदेखील रशियन फौजांना युक्रेनच्या सैन्याने अनेक ठिकाणी रोखून धरले, काही भागांतून माघार घ्यायला लावली. त्यामुळे सध्या हे युद्ध अनिर्णितावस्थेत आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्या खंबीर नेतृत्वाचा आणि निर्धाराचा अंदाज रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना आला नाही. क्रिमियासारखेच युक्रेनचे आणखी दोन रशियाबहुल प्रांत युद्धाच्या निमित्ताने ताब्यात घेण्याचे पुतिन यांचे मनसुबे अजिबात यशस्वी ठरलेले नाहीत. तरीदेखील युद्ध सुरू ठेवल्यामुळे युक्रेनचे अतोनात नुकसान होत असून, त्यामुळे त्याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी झेलेन्स्की अधीर झाले आहेत. रशियाच्या आक्रमणाविरोधात रणगाडे, लढाऊ विमाने आणि क्षेपणास्त्रांची मदत मिळणे अत्यावश्यक आहे. ती रशियाविरोधी पाश्चिमात्य हितचिंतक देशांकडून पुरेशा वेगाने आणि पुरेशा प्रमाणात मिळत नाही, ही झेलेन्स्की यांची तक्रार. युक्रेनला पाश्चिमात्य देशांकडून मिळणारा पािठबा कमी होत चालल्याचा दावा मध्यंतरी पुतिन यांनी केला होता आणि युद्धाच्या वर्षपूर्तीनिमित्त ते यावर नव्याने भाष्य करण्याची शक्यता होती. शिवाय पुतिन युद्ध सुरू झाल्यानंतर आजतागायत कधीही युक्रेनच्या रशियाव्याप्त भागांमध्ये गेलेले नाहीत. ते धाडस बायडेन यांनी दाखवले, हे नक्कीच कौतुकास्पद.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा