ज्युलियन असांज या तऱ्हेवाईक हॅकर-पत्रकार, स्वयंघोषित सत्यशोधकाचे चाहते जगभर आहेत. ज्या देशाला त्याच्या उचापतींची सर्वाधिक झळ पोहोचली, त्या अमेरिकेतही असांजविषयी सहानुभूती असलेले असंख्य सापडतील. अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाच्या परराष्ट्र आणि संरक्षण धोरणांशी संबंधित गोपनीय आणि संवेदनशील कागदपत्रे ‘विकिलीक्स’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून चव्हाट्यावर आणणे हा असांज याच्या लोकप्रियतेमध्ये सर्वाधिक भर घालणारा घटक ठरला. इराक युद्ध, अफगाणिस्तान कारवाई अशा अनेक मोहिमा अमेरिकेने बेफिकिरीने आणि बेमुर्वतखोरपणे राबवल्या. या मोहिमांसंबंधी प्रचंड डिजिटल व कागदी पत्रव्यवहार व्हायचा, जो गोपनीय स्वरूपाचा होता. प्रायव्हेट चेल्सी मॅनिंग या महिला सैनिकाच्या मदतीने या माहितीचा बहुमोल खजिना असांजच्या हाती लागला. तो त्याने २०१० मध्ये जगासमोर आणला. या माहितीफुटीमुळे अमेरिकेविषयी जे बोलले जायचे, ते सत्य स्वरूपातच जगासमोर आले. असांजने २००६ मध्ये विकिलीक्सची स्थापना करताना स्वत:चा उल्लेख ‘डिजिटल रॉबिनहूड’ असा केला होता. सरकार नावाच्या अवाढव्य यंत्रणेविषयी त्याच्या मनात चीड होती. सरकार ही यंत्रणा जनतेसाठी काम करताना, जनतेपासूनच भरपूर माहिती दडवून का ठेवते हा त्याचा प्रश्न भल्याभल्यांना निरुत्तर करायचा. मूळचा ऑस्ट्रेलियन हॅकर असलेल्या असांजचा पिंड शोधक पत्रकाराचा होता. या गुणांच्या जोडीला, कोणत्याही उचापती करून निभावून नेईन हा काहीसा वेडगळपणाकडे झुकणारा आत्मविश्वास होता. त्यामुळे त्याने इतर कोणत्याही देशापेक्षा जगातील सर्वशक्तिमान देशाला अर्थात अमेरिकेलाच लक्ष्य केले. त्याआधी केनिया, चीन, पेरू तसेच अमेरिकेतील आर्थिक भ्रष्टाचाराची प्रकरणे विकिलीक्सने खणून काढली.
हेही वाचा >>> संविधानभान : मूलभूत हक्कांवरील मर्यादा…
२०१० मध्ये अमेरिकेत डेमोक्रॅटिक अध्यक्ष बराक ओबामा यांचे प्रशासन होते. त्या सरकारमध्ये हिलरी क्लिंटन या परराष्ट्रमंत्री होत्या. हिलरी क्लिंटन या २०१६ मध्ये डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारही होत्या. त्यांच्या पहिल्या निवडणूक मेळाव्याच्या तोंडावर असांज याने, रशियन हॅकर्सकडून अधिग्रहित केलेली स्फोटक माहिती प्रसृत केली. या गळतीमुळे हिलरी क्लिंटन यांचा पराभव झाला असे म्हटले जाते. इराक-अफगाणिस्तान मोहिमा रिपब्लिकन अमदानीत सुरू झाल्या. त्या काळात अमेरिकी सैन्यदले किती बेजबाबदारपणे वागली- उदा. नागरिक आणि पत्रकारांच्या हेलिकॉप्टरवर गोळीबार करणे- याचे दाखले रिपब्लिकन नेत्यांना दुखावणारे ठरले, तसेच हिलरी क्लिंटन यांच्यासंबंधी गोपनीय ई-मेल प्रसृत करणे डेमोक्रॅटिक नेत्यांना दुखावणारे ठरले. त्यामुळेच अमेरिकेने ज्युलियन असांजचा ताबा मिळवून त्यास शिक्षा करण्यासाठी आकाशपाताळ एक केले. या मुद्द्यावर तेथे द्विपक्षीय एकवाक्यता होती. असांजने इंग्लंडमधील इक्वेडोरच्या दूतावासात आश्रय घेतला, कारण त्या देशाने असांजला अभय दिले होते. तो काही काळ स्वीडनला एका लैंगिक छळाच्या प्रकरणासाठी हवा होता. परंतु दूतावासात मिळणारे आंतरराष्ट्रीय संरक्षण, पुढे स्वीडनने आरोप मागे घेणे, लंडनमधील न्यायप्रक्रियेत गेलेला वेळ या कारणांनी अमेरिकेत असांजची पाठवणी लांबत गेली. येथे एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा अमेरिकी राज्यघटनेतील पहिल्या घटनादुरुस्तीअंतर्गत (फर्स्ट अमेंडमेंड) माहिती व अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा आहे. तसेच माहितीचा स्राोत उघड न करण्याचे घटनादत्त संरक्षण त्याअंतर्गत आहे. अमेरिकेत असांजला आणले गेले असले, तरी त्याच्यावर खटला चालवणे अत्यंत गुंतागुंतीचे आणि काही बाबतीत अमेरिकेचीच बेअब्रू करणारे ठरू शकत होते. त्यामुळेच शेवटी एका हेरगिरीच्या आरोपावर तडजोड झाली. असांजने आरोप मान्य करायचा आणि त्याने आतापर्यंत इंग्लंडमध्ये भोगलेला तुरुंगवास ‘अधिकृत शिक्षा’ ठरवून त्याला मुक्त करायचे अशी ती तडजोड. या संपूर्ण प्रकरणात नोंद घेण्यासारखी आणखी एक बाब म्हणजे, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, स्वीडन आणि अमेरिका या देशांनी असांजला हाताळताना बऱ्यापैकी समजूतदारपणा दाखवला. हा समजूतदारपणा लोकशाही मूल्यांतून येतो. असांज अरब देश, चीन, रशिया, पाकिस्तान किंवा इराणच्या ताब्यात असता तर एव्हाना सुळावर चढवला गेला असता! तरीदेखील अमेरिकेत चर्चा आहे ती, येथून पुढे शोधक पत्रकाराला अशा प्रकारे गुन्हा कबूल करण्यासाठी भाग तर पाडले जाणार नाही ना, याची! ज्युलियन असांज प्रकरणाचे असे अनेक कंगोरे आहेत, ज्यांचा अत्यंत खोलात जाऊन विचार करावा लागेल. तूर्त असांज त्याच्या मूळ गावी ऑस्ट्रेलियात जाऊन निवांत झाला असेल. हा सुखान्त सर्वमान्य असाच.