डेमोक्रॅटिक पक्षातर्फे अमेरिकी अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी कमला हॅरिस यांच्या नावाची शिफारस आणि हॅरिस यांजकडून त्याची स्वीकृती वगैरे औपचारिकता त्या पक्षाच्या शिकागोतील सोहळ्यात नुकतीच पार पडली. परंतु औपचारिकतेपलीकडे हा सोहळा डेमोक्रॅटिक पक्ष व अमेरिकेच्या राजकारणास कलाटणी देणारा ठरू शकतो. प्रजासत्ताक व्यवस्थेत लोकशाही मार्गांनी निवडून येणाऱ्या व्यक्ती आणि पक्षांमध्ये खुद्द लोकशाही किती मुरली आहे यात त्या व्यवस्थेचे यशापयश दडलेले असते. दोन महिन्यांपूर्वीपर्यंत विद्यामान अध्यक्ष जो बायडेन यांच्या, दुसऱ्यांदा अध्यक्षीय निवडणूक लढवण्याच्या हट्टाग्रहापायी या पक्षाचे भवितव्य अंधकारमय वाटू लागले होते. वयाचा सहस्राचंद्रदर्शन टप्पा ओलांडलेले बायडेन बाबा वयपरत्वे आणि जबाबदारीच्या स्वाभाविक ओझ्यामुळे अडखळत आणि चाचपडत होते. हे अडखळणे आणि चाचपडणे त्यांचे प्रतिस्पर्धी रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर मध्यंतरी झालेल्या पहिल्या वादचर्चेमध्ये नि:संदिग्धपणे अधोरेखित झाले. ट्रम्प यांनी फार दिवे लावले अशातला भाग नाही. त्याची गरजही नव्हती. योग्य मुद्दे मांडतानाही बायडेन यांची जी त्रेधा उडाली ते पाहता, या व्यक्तीस अध्यक्षपदाची निवडणूक आणि निवडून आल्यास अध्यक्षपद या दोन्ही जबाबदाऱ्या झेपणार नाहीत याविषयी पक्ष सहकारी, हितचिंतक आणि समर्थकांचीच खात्री पटली. या टप्प्यावर बायडेन यांना उमेदवारी सोडण्यास भाग पाडणे आणि कमला हॅरिस यांच्यावर विश्वास दाखवून उमेदवारी सोपवणे या प्रक्रिया घडून येत असताना डेमोक्रॅटिक नेतृत्व आणि पक्ष संघटनेची परिपक्वता दिसून आली. शीर्षस्थ नेत्यास पक्षातच पर्याय नसणे यात जितके त्या नेत्याचे यश (आणि अरेरावी), तितकेच पक्षाचे अपयश आणि अंतर्गत भेकडपणा दिसून येतो. हा दोष जसा रिपब्लिकन पक्षाला दिला जात होता, तितकाच तो गेले काही महिने डेमोक्रॅटिक पक्षासही लागू पडत होता. पण डेमोक्रॅटिक पक्षाने पर्याय शोधला आणि बायडेन यांनीही मनाचा उमदेपणा दाखवला. ही खरी लोकशाही.

हेही वाचा >>> चांदनी चौकातून : समर्थन याचेही…त्याचेही

Donald trump, Elon Musk, Vivek Ramaswamy, Minimum Government, Maximum Governance
विश्लेषण : इलॉन मस्क, विवेक रामस्वामी ‘सरकार कार्यक्षमता’ मंत्री… ‘टीम ट्रम्प’ आतापासूनच का भरवतेय धडकी?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
investors of DSK, Maval-Mulshi sub-divisional magistrate, Court, DSK,
‘डीएसके’ यांच्या गुंतवणूकदारांची यादी सादर करण्याचे मावळ-मुळशी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना न्यायालयाचे आदेश
Devendra Fadnavis, Sandeep Naik, Khairane MIDC office,
फडणवीस यांचे संदीप नाईकांना आव्हान, खैरणे एमआयडीसी कार्यालयात पत्रकार परिषद
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “त्यांनी मला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला, पण…”, चांदीवालांच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
accountability of devendra fadnavis declined due to his divisive politics says supriya sule
फोडाफोडीच्या राजकारणामुळे फडणवीसांची विश्वसनीयता कमी; सुप्रिया सुळे
Loksatta explained What is the reason for the dissatisfaction of gig workers
‘गिग’ कामगारांनी साजरी केली ‘काळी दिवाळी’! त्यांच्या असंतोषाचे कारण काय? सामाजिक सुरक्षेचा लाभ किती?

कमला हॅरिस बायडेन प्रशासनात उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. अनेक मुद्द्यांवर त्यांची मते किंवा निर्णय फसलेत वा वादग्रस्त ठरलेत. पण ‘अमेरिकन ड्रीम’ संकल्पनेच्या त्या प्रतीक ठरतात याविषयी कोणताही वाद नाही. आफ्रो-आशियाई मूळ आणि स्त्रीत्व हे घटक आजही अमेरिकेतील एका मोठ्या वर्गासमोर अध्यक्षीय निवडणूक जिंकून येण्यात अडथळा ठरू शकतात, याची त्यांना आणि डेमोक्रॅटिक पक्षाला पूर्ण कल्पना आहे. तरीही ज्या तडफेने आणि आत्मविश्वासाने त्यांनी अल्पावधीत पक्षाच्या बहुतेक नेत्यांचा विश्वास संपादन केला आणि नेतृत्व दाखवून दिले, ते प्रशंसनीय ठरते. बायडेन यांच्याविषयी शंका, अविश्वास व्यक्त होऊ लागल्यानंतर त्यांनी आपला वारस म्हणून कमला यांना नेमणे हे अपेक्षित होते, तरी त्यामागे बरीच गुंतागुंत होती. कारण बायडेन हे अमेरिकेतील सर्व राज्यांमध्ये पक्षांतर्गत निवडणूक आणि मेळावे जिंकून अध्यक्षीय उमेदवार ठरले. त्या ‘निवड’ प्रक्रियेत लोकशाही होती. बायडेन यांच्या उत्तराधिकाऱ्याच्या ‘नियुक्ती’ प्रक्रियेत तशी लोकशाही दिसतेच असे नाही. त्यामुळे कमला हॅरिस यांना अध्यक्षीय उमेदवार म्हणून घोषित करण्याआधी पक्ष पदाधिकारी, नोंदणीकृत सभासद आणि मतदार अशा व्यापक वर्तुळात त्यांच्या नावाला स्वीकृती आहे याची खातरजमा करणे गरजेचे होते. तशी ती करण्याची क्षमता, तत्परता आणि इच्छाशक्ती डेमोक्रॅटिक पक्षाने दाखवली, हे उल्लेखनीयच. डेमोक्रॅटिक पक्षाच्या शिकागोतील मेळाव्यात गतसप्ताहात चार दिवस अनेक नेत्यांची भाषणे झाली. त्यातही हिलरी क्लिंटन, मिशेल ओबामा, बराक ओबामा आणि अखेरीस कमला हॅरिस यांची भाषणे उल्लेखनीय ठरली. दक्षिणेकडून निर्वासित येतात आणि ‘काळ्यांचे रोजगार’ हिरावतात या ट्रम्प यांच्या प्रचारावर मिशेल ओबामांचे ‘तुम्ही (ट्रम्प) ज्या पदासाठी धडपडत आहात तोही काळ्यांचा रोजगार असावा’ हे प्रत्युत्तर सर्वाधित लक्षवेधक ठरले. त्या मेळाव्यात झालेली भाषणे आणि व्यक्ती विविधरंगी आणि विविधपदरी होत्या. ही विविधता डेमोक्रॅटिक पक्षाची ताकद आहे, अमेरिकेची ताकद आहे. ही लढाई आता कुठे सुरू झाली आहे. हॅरिस आणि ट्रम्प जनमत चाचण्यांत जवळपास समसमान आहेत. पण अमेरिकी निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे आणि हॅरिस यांनी अल्पावधीतच मोठे आव्हान निर्माण केले आहे, हाच शिकागोचा सांगावा.