डेमोक्रॅटिक पक्षातर्फे अमेरिकी अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी कमला हॅरिस यांच्या नावाची शिफारस आणि हॅरिस यांजकडून त्याची स्वीकृती वगैरे औपचारिकता त्या पक्षाच्या शिकागोतील सोहळ्यात नुकतीच पार पडली. परंतु औपचारिकतेपलीकडे हा सोहळा डेमोक्रॅटिक पक्ष व अमेरिकेच्या राजकारणास कलाटणी देणारा ठरू शकतो. प्रजासत्ताक व्यवस्थेत लोकशाही मार्गांनी निवडून येणाऱ्या व्यक्ती आणि पक्षांमध्ये खुद्द लोकशाही किती मुरली आहे यात त्या व्यवस्थेचे यशापयश दडलेले असते. दोन महिन्यांपूर्वीपर्यंत विद्यामान अध्यक्ष जो बायडेन यांच्या, दुसऱ्यांदा अध्यक्षीय निवडणूक लढवण्याच्या हट्टाग्रहापायी या पक्षाचे भवितव्य अंधकारमय वाटू लागले होते. वयाचा सहस्राचंद्रदर्शन टप्पा ओलांडलेले बायडेन बाबा वयपरत्वे आणि जबाबदारीच्या स्वाभाविक ओझ्यामुळे अडखळत आणि चाचपडत होते. हे अडखळणे आणि चाचपडणे त्यांचे प्रतिस्पर्धी रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर मध्यंतरी झालेल्या पहिल्या वादचर्चेमध्ये नि:संदिग्धपणे अधोरेखित झाले. ट्रम्प यांनी फार दिवे लावले अशातला भाग नाही. त्याची गरजही नव्हती. योग्य मुद्दे मांडतानाही बायडेन यांची जी त्रेधा उडाली ते पाहता, या व्यक्तीस अध्यक्षपदाची निवडणूक आणि निवडून आल्यास अध्यक्षपद या दोन्ही जबाबदाऱ्या झेपणार नाहीत याविषयी पक्ष सहकारी, हितचिंतक आणि समर्थकांचीच खात्री पटली. या टप्प्यावर बायडेन यांना उमेदवारी सोडण्यास भाग पाडणे आणि कमला हॅरिस यांच्यावर विश्वास दाखवून उमेदवारी सोपवणे या प्रक्रिया घडून येत असताना डेमोक्रॅटिक नेतृत्व आणि पक्ष संघटनेची परिपक्वता दिसून आली. शीर्षस्थ नेत्यास पक्षातच पर्याय नसणे यात जितके त्या नेत्याचे यश (आणि अरेरावी), तितकेच पक्षाचे अपयश आणि अंतर्गत भेकडपणा दिसून येतो. हा दोष जसा रिपब्लिकन पक्षाला दिला जात होता, तितकाच तो गेले काही महिने डेमोक्रॅटिक पक्षासही लागू पडत होता. पण डेमोक्रॅटिक पक्षाने पर्याय शोधला आणि बायडेन यांनीही मनाचा उमदेपणा दाखवला. ही खरी लोकशाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा