‘सर ज. जी. कला महाविद्यालयाचा वारसा’ म्हणून मूलत: वसाहतवादी काळातल्या कलाशिक्षणाचा उल्लेख होतो. खरे तर स्वातंत्र्याच्या उष:काली मुंबईत उभारलेला ‘प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रूप’ किंवा त्यानंतरचा ‘बॉम्बे ग्रूप’ यांचाही प्रभाव जेजेपर्यंत पोहोचला… किंवा या १९६०/६५ नंतरच्या काळातला जेजेचा वारसा फक्त अमूर्त-चित्रकलेपुरताच, असे अभ्यासकांनीही मानणे हे आळशीपणाचे लक्षण ठरते. वास्तविक जेजेमध्ये साधारण १९७० च्या दशकात ‘क्रिएटिव्ह पेंटिंग’ या विषयाकडे पुन्हा डोळसपणे पाहण्याचे प्रयत्न सुरू होते, मुद्राचित्रण (प्रिंटमेकिंग) आणि रंगचित्रे या दोहोंमध्ये कौशल्य कमावण्यावर कटाक्ष होता, पण त्या प्रयत्नांचे दस्तावेजीकरण फारच कमी झाले. याचा थेट फटका बसला काशिनाथ साळवे यांच्यासारख्या अध्यापकांना. व्यक्तिचित्रण आणि अमूर्तचित्र या दोन्ही परंपरांच्या मधला मोठा प्रदेशही विद्यार्थ्यांनी पादाक्रांत करावा, यासाठी साळवे सरांनी मनापासून प्रयत्न केले. त्यामुळेच, ११ मार्च रोजी झालेल्या त्यांच्या निधनानंतर ‘जेजे’तले तीन पिढ्यांचे विद्यार्थी हळहळले.

अहमदनगरच्या मराठी ख्रिास्ती कुटुंबात १९४४ साली जन्म, तिथेच शिक्षण आणि पुढे ‘जेजे’त कलाशिक्षण झालेल्या साळवे यांनी विद्यार्थीदशेत अनेक पारितोषिकांसह, अखेरच्या वर्षी सुवर्णपदक आणि फेलोशिपही मिळवली, त्यामुळे १९६८ पासूनच ते अध्यापन करू लागले. आयुष्यभर ‘जेजेचे साळवे’ म्हणूनच ते ओळखले जात. मोहन सामंत यांच्या कलाकृतींचा प्रभाव त्यांच्यावर होता असे सांगितले जाते, साळवे यांच्या त्रिमित चित्रांमध्ये आणि काही भित्तिशिल्पांमध्ये (म्यूरल्स) तो प्रभाव दिसतोदेखील; पण एकाच दिशेने काम करून दृश्य-शैलीचा ठसा उमटवणे हे कधीही त्यांच्या प्राधान्यक्रमावर नव्हते. ‘विद्यार्थ्यांना घडवतानासुद्धा कलाकृती केल्याचाच आनंद मिळतो’ हे एरवी क्लीशे (धोपटपाठ) ठरावे असे वाक्य, साळवे सरांबाबत मात्र खरे होते. प्रत्येक विद्यार्थ्याचा कल पाहून त्याला वाव देणे, हे काम त्यांनी आवडीने केले. शिक्षक म्हणून दबदब्यापेक्षा मैत्रीचे नाते त्यांनी जपले. कदाचित या अशा ‘सारेच खरे’ वृत्तीमुळे असेल, पण निव्वळ दृश्यकलावंत ही त्यांची ओळख कधीच नव्हती… ललित कला अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार, तीनदा महाराष्ट्र राज्य पुरस्कार, उत्तरायुष्यात (सन २०००) बॉम्बे आर्ट सोसायटीचा ‘रूपधर’- कारकीर्द गौरव, असे मान मिळूनसुद्धा, ‘विद्यार्थीप्रियता’ हाच त्यांचा मोठा गुण राहिला. वास्तविक, मुद्राचित्रणाच्या अनेक तंत्रांमध्ये त्यांचा हातखंडा होता. चित्राच्या अवकाशाची आणि त्याच्या समतोलाची जाण त्यांना होती. कॅनव्हासवर रंगांचे मोठे पॅच असलेली त्यांची अमूर्तचित्रेही त्यामुळे नेटकीच दिसत. सेरिग्राफी (स्क्रीन प्रिंटिंग) सारख्या तुलनेने अपारंपरिक तंत्रातही, सहाहून अधिक रंग वापरण्याइतकी हुकमत त्यांच्याकडे होती. पण या साऱ्याऐवजी लक्षणीय ठरले ते त्यांनी सामूहिकरीत्या केलेले काम.

हे काम दोन प्रकारचे. पहिले थेट विद्यार्थ्यांसह त्यांनी घडवलेली भित्तिशिल्पे. यासाठीचे डिझाइन त्यांचे असे आणि कोणी कुठल्या भागासाठी काम करायचे हेही तेच ठरवत. दुसरे काम त्याहून मोठे- कलाक्षेत्रात होतकरूंना संधी मिळवून देण्याचे काम! ‘जहांगीर आर्ट गॅलरी’च्या पावसाळी प्रदर्शनात विद्यार्थ्यांचा विभाग हवाच, असा आग्रह त्यांनी प्रभाकर कोलते यांच्या जोडीने मांडला होता. नवनव्या गॅलऱ्यांना प्रोत्साहन देणारे साळवे, या गॅलऱ्यांच्या पहिल्या समूहप्रदर्शनाचे गुंफणकार म्हणून ३०/४० तरुणांना सहज संधी देत. गोव्यात चौगुले या उद्याोग-घराण्याने कलादालन करायचे ठरवले, तेव्हा मुंबईतले उत्तम तरुण कलावंत सरांनी महिनाभर गोव्यात पाठवले. साळवेसरांच्या जाण्याने कलाक्षेत्रातील मैत्रीचा एक मोठा झरा लोपला आहे.

Story img Loader