मराठी लघुकथा वाचकांसाठी राम कोलारकरांनी किती काम करून ठेवले, याचा तपशील शोधायला गेलात तर ‘सर्वोत्कृष्ट मराठी कथा’ (१६ खंड), कुमार कथा (६), विनोदी कथा (२०) किर्लोस्कर कथा (३), हंस कथा, जगातील सर्वोत्कृष्ट कथा (२ ), ऐतिहासिक कथा (१०) याशिवाय फडके, खांडेकर, कमलाबाई टिळक, गो. ग. लिमये आणि चि. य. मराठे यांच्या निवडक कथांच्या खंडांसह विखुरलेल्या अनेक कथांचे संपादन-संकलन त्यांच्या नावावर आहे. ऐंशीच्या दशकात या कथाखंडांना घरघर लागली. कारण मराठी वाचकांचे टीव्हीवरच्या मालिकांमधील कथांत स्वारस्य वाढले. त्यामुळे उत्तम लघुकथा छापणारी मासिके- साप्ताहिके ओळीने गतप्राण होऊ लागली. नव्याने तयार झालेल्या मासिकांमध्येही लघुकथा वाचनासाठी ‘गौण’ प्रकार म्हणून सांगितली गेली. त्यामुळे लेखकांनी दिवाळी हाच चांगल्या कथांना उजवायचा काळ ठरविला. त्यातून आपली लघुकथा अनेकार्थी दुष्टचक्रात अडकली, ती अजून बाहेर पडलेली नाही. पण ज्या अमेरिकेकडून कथाखंडांची प्रेरणा कोलारकरांनी घेतली, त्या अमेरिकेत मात्र ‘इयर्स बेस्ट स्टोरी’चे कथाखंड दरवर्षी न चुकता निघत आहेत.
मुख्य धारेतील मासिक- साप्ताहिकांना ‘कथा’ छापण्यात काही कमीपणाचे वाटत नाही. २०१७ साली ख्रिस्टन रुपेनियन या लेखिकेची ‘कॅट पर्सन’ ही ‘न्यू यॉर्कर’मध्ये छापून आलेली कथा वणवावेगाने ‘व्हायरल’ झाली, त्या वर्षांत कथासंग्रहांचा विक्री निर्देशांक जगभरच वधारलेला राहिला. (गेल्या वर्षी या कथेवर आलेल्या चित्रपटाने अमेरिकेतही फार लक्षवेधी कामगिरी केली नाही.) दक्षिण अमेरिकी, जपानी, आफ्रिकी कथांच्या अनुवादांचा सुकाळ सध्या सुरू असताना राम कोलारकरांच्या लघुकथा वैशिष्टय़ांबरहुकूम (कमी आकारात परिणामकारक आशय आणि विषय घेऊन येणारी, टोकदार) कथा कॅनडातील सुवंखम थामावोंग्सा ही लेखिका लिहीत आहे.
थायलंडमधील लाओ निर्वासितांच्या छावणीत १९७८ साली जन्मलेल्या सुवंखम थामावोंग्साच्या पालकांना ऐंशीच्या दशकात कॅनडामध्ये आश्रय मिळाला. नवा देश आणि नव्या भाषेत वाढताना आलेल्या अनुभवांवर तिचा काव्यशास्त्रविनोद सुरू होता. काही कवितासंग्रहांनंतर तिची लेखणी कथेकडे वळली. ‘हाऊ टू प्रोनाऊन्स नाईफ’ या पहिल्याच कथासंग्रहाला कॅनडातील बुकर म्हणून ओळखले जाणारे २०२० सालचे ‘गिलर’ पारितोषिक मिळाले. या सर्व कथांमधील गंमत ही की दुसऱ्याच एका सांस्कृतिक वातावरणातून नव्या भूभागात रुजतानाच्या गमती आल्या आहेत. इंग्रजी ‘नाईफ’ या शब्दात असलेल्या ‘के’ वर्णाने उडणारा गोंधळ, खानपान व्यवहार आणि सणासुदीच्या काळातील सांस्कृतिक फरकांमुळे उडणारी त्रेधा कथांमधून उतरली आहे.
गिलर पारितोषिक मिळाल्यानंतर या लेखिकेच्या आयुष्यात जो सर्वात मोठा बदल झाला तो म्हणजे ‘न्यू यॉर्कर’ साप्ताहिकाच्या एका अंकात २०२१ साली तिची पहिली कथा झळकली. ‘गुड लुकिंग’ नावाची. मग २२ साली ‘ट्रॅश’ या शीर्षकाची. तिसरी या आठवडय़ात ‘बोझो’ हे विचित्र नामधारण केलेली. ‘न्यू यॉर्कर’च्या कथांना असते ते एक पानी चित्र आणि पुढली पाठपोट पाने यांमध्येच संपणाऱ्या या कथा विलक्षण ताकदीच्या आहेत. पूर्वी साठच्या दशकात ‘सत्यकथा’त साऱ्याच राम पटवर्धनांनी रिपेअर केलेल्या कथांचा दोन पानांचा आकार असे तितकाच यांचा आकार. (अन् त्यामुळे कथा हा प्रकार भिकार ही आवई उठवली गेली) पण प्रत्येक कथा भिन्न चवीची.
‘बोझो’ ही कथा पुढल्या काही दिवसांत सुवंखम थामावोंग्सा या लेखिकेच्या नावाचा कठीण उच्चार लोकांना सोपा होईल, इतकी थोर जमली आहे. यात स्त्रीवादाचे, (सत्तरीतल्या नाही आत्ताचे) मुक्ततेचे आणि कथाशक्तीचे बरेच घटक एकत्रित आले आहेत. कथेची निवेदिका आठवडय़ातील काही दिवस एका मद्यालयात जाण्याचा शिरस्ता पाळते. तिथल्या बारटेंडरवर नयनसुख घेण्याचा तिचा कार्यक्रम सुरू असतो. या बारटेंडरला जवळच आपल्या आवडीच्या ठिकाणी फिरायला नेण्याचा तिचा मनसुबा असतो. या मनसुब्याचे काय होते आणि कथा पुढे उत्तम लघुकथेची कोलारकृत वैशिष्टय़े कशी पूर्ण करते, यासाठी ही कथा वाचायला हवी. जमल्यास या लेखिकेचा कथासंग्रहही वाचा. तिच्या ‘गायत्री’ या नावाने असलेल्या एका कवितेचे अभिवाचनही उपलब्ध आहे, ते पाहा. कारण कोलारकर संपादित कथाग्रंथांची संख्या विस्मृतीत जाण्याच्या आजच्या काळात हे अगदीच सहजसाध्य आहे.
या आठवडय़ात न्यू यॉर्करमध्ये आलेली कथा..
https:// www. newyorker. com/ magazine/2024/04/08/ bozo- fiction- souvankham- thammavongsa
आणखी एका मासिकातील तितक्याच आकाराची कथा.
https:// astra- mag. com/ articles/ rich/
गायत्री या कवितेचे शाळकरी मुलीने केलेले वाचन..
https:// www. youtube. com/ watch? v=8 VlxOHKJASU
हे ही वाचा..
कॅनडातील कथासाहित्यावर चर्चा करताना नेहमी हवाला दिला जातो तो हयातभर कथालेखनासाठी नोबेल पुरस्कार मिळालेल्या अॅलिस मन्रो यांचा. जरी त्यांच्या इतक्याच ताकदीच्या डझनभर लेखिका समकाळात कॅनडात असल्या, तरीही मन्रो यांच्या सर्वोत्तम लेखनाची सातत्याने चर्चा होत राहते. काही दिवसांपूर्वी एका लेखाद्वारे झालेली ही चर्चा.
https:// shorturl. at/ hjuT9
इंग्रजी भाषेत छापून येणाऱ्या सर्वोत्तम कथासंग्रहासाठी दरवर्षी ‘पेन- फॉकनर पारितोषिक’ जाहीर होते. या पुरस्कारासाठी नामांकन असलेल्या लघुयादीतील सर्वच कथासंग्रह तुल्यबळ असतात. मूळ बक्षिसाची आणि अंतिम यादीत झळकणाऱ्या लेखकांना मिळणारी रक्कम डोळय़ांत भरणारी असते. शिवाय पारितोषिकामुळे लेखकासह पुस्तक अधिकाधिक झळकत असल्याने हा पुरस्कार महत्त्वाचा मानला जातो. क्लेअर हिमेनेज (Claire Jimé nez) या लेखिकेला यंदाचा पुरस्कार मिळाला. त्याविषयीचे विस्तृत वृत्त.
https:// shorturl. at/ jrBI5
‘एआय’ तंत्रज्ञानाची लेखक, अभिनेते आणि कलाकारांना भीती वाटत असली, तरी शेरील क्रो या गायिकेने या भयाचे रूपांतर नव्या कलाकृतीत केले. गेल्या आठवडय़ामध्ये तिचा नवा ‘अल्बम’ प्रकाशित झाला. त्यानिमित्ताने काही दिवसांपूर्वी आलेली तिची मुलाखत. ज्यात कृत्रिम बुद्धिमत्तेतून मिळालेल्या प्रेरणेबाबत चर्चा आहे.
https:// shorturl. at/ lxzKX