केशव उपाध्ये – महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ता

मल्लिकार्जुन खरगे यांच्या गळय़ात पक्षाध्यक्षपदाची माळ घातली गेली असली, तरी दरम्यानच्या काळात राहुल गांधींच्या नेतृत्वाला उजाळा देण्याचा निष्ठावंतांचा प्रयत्न सुरू राहणारच आहे. भारत जोडो पदयात्रा हा त्या प्रयत्नांचाच एक भाग आहे.. ही यात्रा संपवून राहुल गांधी दिल्लीत परततील, तेव्हा पक्षाध्यक्षपदाची खुर्ची त्यांच्यासमोर झुकली, तरी ते त्यांच्या यात्रेचे पक्षांतर्गत यश ठरेल.

Manmohan Singh launched the Technology Mission on Citrus for orange growers in Vidarbha
डॉ.मनमोहन सिंग, नागपूरची संत्री आणि ‘मिशन सिट्रस’
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Underground sewage Scheme , Sulabha Khodke ,
अमरावती : आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली… ‘हे’ आहे कारण
Government Nursing Training School , Bhandara ,
भंडारा : गुण वाढवण्यासाठी प्राचार्यांनी विद्यार्थिनींकडे केली शरीरसुखाची मागणी
Evidence that Vishal Gawli of Kalyan is mentally ill kalyan news
कल्याणच्या विशाल गवळीकडे मनोरुग्ण असल्याचे दाखले;  याच आधारावर यापूर्वी जामीन मिळविल्याची माहिती
dhotar culture wardha
धोतर वस्त्र प्रसार अभियान; धोतर घाला, संस्कृती पाळा
loksatta editorial centre to end no detention policy for students in classes 5 and 8 in schools
अग्रलेख: नापास कोण?
Public Works Minister Shivendra Raje, Satara Shivendra Raje,
साताऱ्यातील आम्ही चारही मंत्री एकत्रितपणे जिल्ह्याचा विकास करू, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजेंचा विश्वास

एखाद्या राजकीय पक्षाचा नेता कोण असावा, त्या पक्षाची राजकीय भूमिका कोणती असावी, आर्थिक, सामाजिक, आंतरराष्ट्रीय प्रश्नांबाबतचे पक्षाचे धोरण कोणते असावे, हा त्या त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न असतो. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेली पदयात्रा हा खरे म्हणजे काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. पण यानिमित्ताने राहुल गांधी देशाच्या विविध राज्यांतील विविध जिल्ह्यांमध्ये पदभ्रमण करत आहेत, त्यांच्यासोबत चालणाऱ्या जनसमुदायाची छायाचित्रे आणि राहुल गांधींच्या वेगवेगळय़ा भावछटांची जाहिरातबाजी सध्या जोरात सुरू असल्याने काँग्रेसच्या या अंतर्गत प्रश्नाकडेही सार्वजनिकरीत्या पाहणे टाळता येणार नाही. राहुल गांधींच्या पदयात्रेचे नाव ‘भारत जोडो’ असे असल्यामुळे, साहजिकच, त्यांच्या भ्रमंतीचा हेतू दुहेरी आहे हे स्पष्ट आहे. एक तर ते त्यांचा पक्ष भारताशी जोडण्याचा आटापिटा करण्यासाठी ते पदभ्रमण करत असावेत, किंवा समाजात आपले नेतृत्व सिद्ध करण्याच्या त्यांचा हेतू असावा असेही म्हणता येईल. त्यामुळे यापैकी कोणत्याही हेतूविषयीची चर्चा होणे साहजिकच आहे. म्हणून ही पदयात्रा हा काँग्रेसचा अंतर्गत मामला असला तरी तो सार्वजनिक मुद्दा झाला आहे.

राहुल गांधी यांच्या पदयात्रेने दक्षिणेकडील काही राज्यांचा काही निवडक भाग पालथा घातला असून आता ते मध्य भारताच्या दिशेने वाटचाल करू लागले आहेत. येत्या महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात त्यांची पदयात्रा महाराष्ट्रातील काही निवडक भागास स्पर्श करून पुढे सरकेल. गेल्या काही दिवसांत राहुल गांधी यांच्या पदयात्रेत वाटेवरच्या एखाद्या गावातील काही बालकांना उचलून घेणे, काही महिलांशी हितगुज करणे, काही तरुणांसोबत छायाचित्रापुरती वाटचाल करणे आदी मर्यादित स्वरूपाचाच हेतू असावा असे वरवर वाटत असले, तरी ते संपूर्ण खरेदेखील नाही. कारण राहुल गांधी यांच्या नेतृत्वक्षमतेविषयी आणि एकूणच काँग्रेसच्या भावी नेतृत्वाविषयी निर्माण झालेल्या अनेक प्रश्नांची या यात्रेस पार्श्वभूमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी आणि भारतीय जनता पक्षाने सातत्याने राजकारणातील घराणेशाहीवर प्रहार करीत लोकशाहीपुढील या आव्हानाचा मुकाबला करण्यास आक्रमकपणे सुरुवात केल्यानंतर काँग्रेसमध्ये बरीच पडझड सुरू झाली, हा ताजा भूतकाळ आहे. केवळ गांधी-नेहरू घराण्याचा वारसा एवढेच कर्तृत्व आजपर्यंत दाखवू शकलेल्या राहुल गांधींच्या नेतृत्वक्षमतेवर पक्षातून उघडपणे प्रश्नचिन्हे उमटविली जाऊ लागली आणि त्यातूनच पक्षाच्या पहिल्या फळीतदेखील उभी फूट पडली. अनेक नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची तयारी केली, काहींनी वेगळय़ा चुलीदेखील मांडल्या, तर काही नेत्यांनी पक्षात राहूनच असंतोषाचा आवाज बुलंदपणे उमटवत ठेवणे पसंत केले.

काँग्रेसमध्ये गांधी-नेहरू घराण्याच्या नेतृत्वास एवढय़ा उघडपणे आव्हान देण्याचे धाडस याआधी फारसे झालेच नव्हते. ज्यांनी या घराण्याचे नेतृत्व डावलण्याचा प्रयत्न केला, त्यांना एक तर पक्षातच नगण्य होऊन राहावे लागले किंवा त्यांना पक्षाबाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. शरद पवार हे सर्वाना माहीत असलेले ठळक उदाहरण आहे. अर्थात, शरद पवारांना काँग्रेसमधून अर्धचंद्र देण्यात आल्यानंतरही, आपला वेगळा पक्षसुद्धा काँग्रेसच्या आधाराविना तग धरू शकत नाही हे लक्षात आल्यानंतर स्वतंत्र अस्तित्व ठेवून त्यांनीही आपला पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधला, आणि स्वबळावर कोठेच सत्तास्थापना शक्य नाही हे लक्षात येताच भागीदारी स्वीकारून काँग्रेसची सोबत केली. त्यामुळे, गांधी-नेहरू घराणे हा काँग्रेसी विचारधारेचा आधार असल्याच्या समजुतीची मुळे अधिकच घट्ट होत असताना, घराणेशाहीचा मुद्दा पुढे येताच काँग्रेसमधील अस्वस्थतेला वाचा फुटली. यातूनच जी-२३ गटाने उघडपणे नेतृत्वाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्हे उमटविली. मोदी यांच्या कणखर नेतृत्वास आव्हान देण्यासाठी राहुल गांधी यांच्यासारख्या नेत्याची क्षमता अगदीच तोकडी व अपरिपक्व असल्याचे काँग्रेसी नेते उघडपणे मुलाखतींमधून सांगू लागले.

गेल्या दहा वर्षांत निवडणुकीच्या राजकारणात होत असलेली पक्षाची वाताहत, पक्षबांधणीत राहुल गांधी यांना येत असलेले अपयश आणि सोनिया गांधींच्या नेतृत्वास व कार्यक्षमतेस आरोग्याच्या कारणामुळे येणाऱ्या मर्यादा या सर्वाचा एकत्रित परिणाम पक्षावर होत असतानाच, घराणेशाहीच्या राजकारणावरून राहुल गांधी यांच्या नेतृत्वाचे पुनरावलोकन करणे काँग्रेसला भाग पडणार आहे. आता केवळ गांधी-नेहरू घराण्याच्या पुण्याईच्या शिदोरीवर राहुल गांधी पक्षाचे नेतृत्व करू शकणार नाहीत, किंवा काही मोजक्या निष्ठावंतांचा आग्रह असला, तरी त्यांच्या नेतृत्वक्षमतेत राष्ट्रीय पातळीवर पक्षाची ढासळती प्रतिमा पुन्हा उभारी घेऊ शकणार नाही, याची जाणीव झाल्यामुळे २४ वर्षांनंतर प्रथमच काँग्रेसला संघटनात्मक फेरबदल करणे भाग पडले. गांधी घराण्याबाहेरील नेतृत्व म्हणून मल्लिकार्जुन खरगे यांच्या गळय़ात पक्षाध्यक्षपदाची माळ घातली गेली असली, तरी दरम्यानच्या काळात राहुल गांधींच्या नेतृत्वाला उजाळा देण्याचा निष्ठावंतांचा प्रयत्न सुरू राहणारच आहे. भारत जोडो पदयात्रा हा त्या प्रयत्नांचाच एक भाग आहे. त्यामुळेच, तो काँग्रेसचा संघटनात्मक बाब असलेला, पक्षांतर्गत प्रश्नच आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वास व्यापक जनसमर्थन मिळावे यासाठी याआधीही काँग्रेसने अनेक प्रयत्न करून पाहिले होते. कधी ते जानवेधारी असल्याचा प्रचार केला, तर कधी दत्तात्रेयगोत्री ब्राह्मण असल्याचेही जाहीर केले गेले. कधी ते शिवभक्त असल्याची जाहिरात केली गेली, तर कधी त्यांना वैष्णोदेवीची यात्रा घडवून त्यांच्या हस्ते पूजापाठही करविले गेले. अशा विविध उपायांचा अवलंब करूनही काँग्रेसला अपेक्षित परिणाम साधला गेलाच नाही. आता या पदभ्रमणातून तरी त्यांचे नेतृत्व प्रस्थापित व्हावे आणि पक्षाला पुन्हा गांधी घराण्याची सावली मिळावी असा काँग्रेसचा हेतू असेल, तर तोदेखील पक्षांतर्गत असाच मुद्दा आहे.

या देशात कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता पक्षबांधणीसाठी किंवा आपले नेतृत्व फुलविण्यासाठी कोठेही संचार करू शकतो. कारण हे दोन्ही मुद्दे जनमानसावरील प्रभावाशी जोडलेले असल्याने, राहुल गांधींची पदयात्रादेखील जनमानस जिंकण्यात किती यशस्वी होते, यावरच त्यांच्या पक्षाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. राहुल गांधी हा राष्ट्रीय नेतृत्वाचा पर्याय ठरावा ही मुळातच, काँग्रेसचीदेखील अपेक्षा नसेल हे स्पष्ट आहे. नेतृत्वाच्या मुद्दय़ावरून पंचवीस वर्षांनंतर हातातून गेलेले अध्यक्षपद पुन्हा घराण्याकडे परत आणण्यासाठी जी काही तयारी करावी लागते, त्याचाच एक भाग म्हणून राहुल गांधींच्या नेतृत्वक्षमतेला उजाळा देण्याचा हा एक सामान्य प्रयत्न आहे. येत्या लोकसभा निवडणुकांत काँग्रेसची कमीत कमी वाताहत व्हावी यासाठी सुरू असलेल्या अनेक प्रयत्नांचा तो एक भाग आहे. स्वबळावर सत्ता प्राप्त करण्याची क्षमता काँग्रेसने केव्हाच गमावली आहे, हे तर या पक्षाच्या एकंदर स्थितीवरूनच स्पष्ट झाले आहे. भाजपला पर्याय देण्यासाठी भाजपेतर व काँग्रेसी विचारधारेशी मिळत्याजुळत्या पक्षांनी एकत्र यावे यासाठीच्या प्रयत्नांनाही वारंवार अपयश येत आहे. तसे प्रयत्न झालेच, आणि त्यानुसार विरोधी पक्षांची आघाडी झालीच, तर राहुल गांधींचे नेतृत्व स्वीकारण्यास किती नेते तयार होतील हादेखील प्रश्नच आहे. यामुळेच भारत जोडो यात्रेचा घाट घालून दक्षिणेपासून उत्तरेपर्यंतची गर्दी काँग्रेसच्या सोबत असल्याचे चित्र तयार करण्याच्या या प्रयत्नांतून, विरोधकांच्या संभाव्य आघाडीत काँग्रेसकडे मत व्यक्त करण्याएवढी तरी ताकद असली पाहिजे, असाही या यात्रेचा एक हेतू असू शकतो. कारण मोदी सरकारने उपस्थित केलेले भ्रष्टाचाराचे मुद्दे जाणीवपूर्वक टाळण्याकडे या यात्रेचा कटाक्ष दिसतो. या यात्रेदरम्यानच गांधी कुटुंबाशी संबंधित असलेल्या काही संस्थांच्या आर्थिक व्यवहारांचा मुद्दा चौकशी यंत्रणांच्या रडारवर आला आहे. गांधी कुटुंबाच्या आर्थिक हितसंबंधांवरही गेल्या काही वर्षांत अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. या प्रश्नांना बगल देऊन, केवळ भावनिक मुद्दय़ांच्या आधारावर भारत जोडण्याच्या काँग्रेसी प्रयत्नांना प्रतिसाद देण्याएवढी भारतीय जनता भोळी आहे का, याचाही कस या यात्रेच्या निमित्ताने लागणार आहे. ही यात्रा संपवून राहुल गांधी दिल्लीत परततील, तेव्हा पक्षाध्यक्षपदाची खुर्ची त्यांच्यासमोर झुकली, तरी ते त्यांच्या यात्रेचे पक्षांतर्गत यश ठरेल. लोकसभेच्या निवडणुका ही तर त्याही पुढची कसोटी असेल.

Story img Loader