आफ्रिकेतील झिम्बाब्वेसारख्या छोट्या देशातून ऑलिम्पिकपटू म्हणून नावारूपाला आल्यानंतर थेट राजकारणात उडी घेऊन देशाचे क्रीडामंत्रीपदही मिळविले आणि आता वयाच्या ४१व्या वर्षी ही महिला जागतिक खेळांच्या शिखर संस्थेची म्हणजेच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेची (आयओसी) पहिली महिला आणि सर्वांत तरुण अध्यक्ष ठरली आहे. ही महिला म्हणजे कर्स्टी कॉव्हेन्ट्री.

झिम्बाब्वेची राजधानी हरारे येथील कॉन्व्हेंट शाळेतून शिक्षणाची सुरुवात केल्यानंतर कर्स्टी यांनी पुढील शिक्षणासाठी अमेरिकेतील अलाबामा येथील ऑबर्न विद्यापीठ गाठले. तेथेच जलतरणपटू म्हणून त्या घडल्या. १७व्या वर्षीच कर्स्टी यांनी ‘सिडनी २०००’ ऑलिम्पिकमध्ये पदार्पण केले. त्यानंतर २००४च्या अथेन्स ऑलिम्पिकमध्ये तीन सुवर्णपदके जिंकण्याची किमया साधली. पाठोपाठ २००८ बीजिंग ऑलिम्पिकमध्येही कर्स्टी यांनी आणखी चार पदके मिळविली.

कर्स्टी या कमालीच्या मुत्सद्दी. बीजिंग ऑलिम्पिकनंतर सरकारने दिलेल्या ५५ हजार डॉलरच्या पारितोषिक रकमेचा स्वीकार करताना कर्स्टी यांनी राष्ट्रपती मुगाबे यांना देशात बदल घडण्याची आवश्यकता असल्याची जाणीव करून दिली होती. रिओ २०१६ ऑलिम्पिक सहभागानंतर कर्स्टी यांनी जलतरणाचा निरोप घेतला आणि थेट राजकारणात उडी घेतली. पाण्यात पडले की पोहता येते, असे म्हणतात. त्याचप्रमाणे राजकारणात उडी घेतल्यावर कर्स्टी हळूहळू तिथेही रुळल्या आणि यशस्वी झाल्या.

२०१८ मध्ये एमर्सन मनांगाग्वा यांच्या मंत्रिमंडळात कर्स्टी सर्वप्रथम क्रीडामंत्री झाल्या. त्यापूर्वी २०१३ मध्ये त्या ‘आयओसी’चा भाग झाल्या होत्या. ‘आयओसी’चे मावळते अध्यक्ष थॉमस बाख यांच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव आहे. त्यामुळेच अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्या उतरल्या तेव्हापासून त्यांचे पारडे जड मानले जात होते. अन्य उमेदवारांप्रमाणे त्यांनी प्रचारासाठी कुठला ‘पीआर’ घेतला नाही की विविध देशांचा प्रवास करून आपली भूमिकाही मांडली नाही. त्यांनी फक्त ऑलिम्पिक खेळांचा विकास साधणारा एक जाहीरनामा पतीच्या मदतीने तयार केला आणि तोच सर्वत्र पाठवला.

सॅबेस्टियन को, ज्युआन अॅन्तानियो समरांच (ज्युनियर) अशा तगड्या प्रतिस्पर्ध्यांवर सहज मात करून त्या ‘आयओसी’ अध्यक्ष ठरल्या. अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून तासभरही झाला नव्हता, इतक्याच त्यांना ‘आगामी लॉस एंजलिस ऑलिम्पिकदरम्यान काही देशांच्या खेळाडूंवर बंदी घालण्याचा प्रयत्न करण्यात आला, तर ‘आयओसी’ची काय भूमिका असेल,’ असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवून त्या म्हणाल्या, ‘‘मी वयाच्या २०व्या वर्षापासून उच्च पदांवर काम करणाऱ्या पुरुषांचा सामना करत आले आहे.

या वेळी दोन व्यक्तींमध्ये संवाद सर्वांत महत्त्वाचा असतो हे मी शिकले आणि मी संवाद साधेन’’ त्यांचे हे उत्तर त्यांच्यातील नेतृत्वगुण आणि प्रगल्भता दाखवण्यासाठी पुरेसे होते. खेळाडू, संघटक, राजकारणी म्हणून काम करताना यश मिळविलेल्या कर्स्टी यांच्यासमोर आता क्रीडा चळवळीचे आव्हान आहे. लॉस एंजलिस ऑलिम्पिक स्पर्धेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका अडचणीची ठरणार नाही, हे त्यांना सुनिश्चित करावे लागेल. उत्तेजक सेवनाचे वाढते प्रमाण, नव्या खेळांचा समावेश, भागीदार आणि प्रायोजकांशी सुसंवाद अशा अनेक आव्हांनाचा सामना त्यांना करावा लागणार आहे. कर्स्टी यांनी विविध भूमिका बजावताना यशस्वी कारकीर्द घडवली आहे. आता ‘आयओसी’ अध्यक्ष म्हणून आठ वर्षांचा कार्यकाळात त्या कसा कारभार चालवतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.