लिहिणं म्हणजे सत्याचा शोध घेणं, सत्याच्या गाभ्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करणं असं आपण अनेकदा ऐकलेलं असतं. कृष्णा सोबती या हिंदीतल्या लेखिकेने हेच जरा आणखी वेगळ्या शब्दात सांगितलं आहे. सत्य हे माणसाच्या ज्या अंतर्मनाची चाहूल आहे त्याला ऐकणारं आणखी एक मन लेखकाजवळ असणं आवश्यक आहे. सत्य आता चकाकी असणारं मूल्य राहिलं नाही. अगणित प्रकारात ते उपलब्ध आहे. वेगवेगळ्या ‘काउंटर’वर आणि वेगवेगळ्या किमतीचे ‘टॅग’ लावलेलं. अन्य वस्तूंप्रमाणेच तेही विकलं जातंय. सत्य, सत्याचा आभास, सत्यांश, विराट सत्य, माझं सत्य, तुमचं सत्य, तंत्राचं सत्य, सरकारी सत्य, अर्धसरकारी सत्य… न जाणो किती लेबलं आहेत. या सगळ्याहून भारी खोटं असणारंही एक सत्य आहे आणि जे सर्वात महाग आहे. महाश्वेतादेवी, कृष्णा सोबती, कुर्रतुल एन हैदर या तिन्ही लेखिकांचा जन्म जवळपास एकाच कालखंडातला. विसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकातला. बंगाली, हिंदी आणि उर्दू अशा तीन भाषांमध्ये या लेखिकांनी भारतीय साहित्याच्या पटलावर जे काम करून ठेवलं ते केवळ अद्वितीय असं मानावं लागेल. जेव्हा स्त्रीला स्वतंत्र मन असतं, व्यक्ती म्हणून तिचं स्वतंत्र अस्तित्व आहे असा विचारही समाजात केला जात नव्हता अशा काळात या तिन्ही लेखिका जन्माला आल्या. (कृष्णा सोबती- १९२५), (महाश्वेतादेवी- १९२६), (कुर्रतुल एन हैदर- १९२७) आणि त्यांनी स्त्री जीवनाचा जो वेगवेगळ्या अंगाने वेध घेतला तो भारतीय साहित्याचे मोठे संचित आहे. स्त्रीवादी ही संकल्पनाही रूढ झालेली नव्हती तेव्हा बाईच्या माणूसपणाबद्दल लिहिणं, बोलणं आणि प्रस्थापित व्यवस्थेत बंडखोर विचारांचे सुरुंग पेरणं ही गोष्ट साहसाचीच होती. या तिन्ही लेखिकांचा भवताल वेगळा, प्रदेश वेगळा, भाषा वेगवेगळी, पण त्या जे काही लिहीत होत्या त्यात एक समान सूत्र नक्कीच आढळतं.
यातल्या कृष्णा सोबती यांना तर आपली ओळख ‘लेखक नागरिक’ एवढीच असावी असं अपेक्षित होतं. आपलं स्त्री असणं या ओळख करून देण्यात नसावं असं त्यांना वाटायचं. महिला लेखक, स्त्री कथाकार अथवा लेखिका अशी ओळख करून देण्याला त्यांची सक्त हरकत असायची. एक बंडखोर, संघर्षशील आणि विद्रोही लेखिका म्हणून त्या परिचित आहेत. ‘जिंदगीनामा’ ही त्यांची प्रसिद्ध कादंबरी. पंजाब या प्रांतातले सामाजिक जीवन चित्रित करणाऱ्या या कादंबरीतला काळ हा साधारणपणे विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या दशकांतला आहे. या कालखंडातल्या सामाजिक जीवनाचा आलेख असं या कादंबरीचं स्वरूप आहे. या कादंबरीत ना कोणी नायक आहे, ना खलनायक. जिगरबाज वृत्तीने शेती कसणारे लोक, त्यांच्या जगण्यातल्या हर्ष-खेदाच्या जागा, जमिनीची मालकी कोणाकडे, कसणारे लोक कोण, त्यांच्या जीवनसंघर्षाचा एक व्यापक पट असे ‘जिंदगीनामा’चे कथानक आहे. दुसरे कोणतेही उपाय निरुपयोगी ठरतात तेव्हा अन्यायाविरुद्ध तलवार हाती घेणं हे वैधच आहे असं सांगणाऱ्या श्री गुरू गोविंदसिंह यांच्या वचनाने कादंबरीची सुरुवात होते.
सत्तेच्या राजधान्यांमध्ये प्रमाण आणि पुरावे यांच्या आधारे जो इतिहास नोंदवला जातो, सुरक्षित केला जातो तो खरा नाही. जो लोकमानसाच्या नदीसोबत वाहतो, वाढतो, विस्तीर्ण होत पसरतो आणि जनसामान्यांच्या सांस्कृतिक मजबुतीद्वारे जिवंत राहतो तो खरा इतिहास आहे, असं कादंबरीच्या सुरुवातीलाच नमूद केलेलं आहे. संपूर्ण कादंबरीत याचा प्रत्यय येतो. विशेषत: पंजाबी भाषेतली लोकगीतं, छोट्या छोट्या कथा, कादंबरीत प्रचंड संख्येने आहेत. खास पंजाबी लहेजा असलेल्या बोलीतले शब्द नव्या वाचकाला अपरिचित वाटू शकतात. पंजाबी आणि उर्दू शब्दांच्या माध्यमातून एक अनोखं असं कथन त्यांच्या लेखनात रचलं जातं. एका प्रदेशाचा विशाल असा भूमिनिष्ठ पट हे या कादंबरीचं वैशिष्ट्य आहे.
‘जिंदगीनामा’ याच शीर्षकाने नंतर अमृता प्रीतम यांचंही एक पुस्तक आलं. त्यावरून कृष्णा सोबती यांनी उच्च न्यायालयापर्यंत दाद मागितली. तब्बल दोन दशकं हा खटला चालला. न्यायाधीशांनी कृष्णा सोबती यांना विचारलं, ‘आपण कोण आहात, मी तुमच्याबद्दल कधी ऐकलं नाही.’ नंतर त्यांच्या वकिलाने त्यांना विचारलं, ‘तुम्हाला न्यायाधीशांनी असं विचारणं वाईट तर वाटलं नाही ना?’ कृष्णा सोबती यांचं उत्तर होतं, ‘नाही… माझे स्वत:विषयी कोणतेच गैरसमज नाहीत.’ अर्थात ‘जिंदगीनामा’चे त्यांना आणखी पुढचे खंड लिहायचे होते, पण न्यायालयीन कटकटीमुळे व्यथित झाल्याने हे काम अर्धवट राहिलं. त्यांची ही महत्त्वाकांक्षी योजना अधुरी राहिली तरी पुढे ‘जिंदगीनामा’चा पुढचा भाग ‘वह समय’ या नावाने आला.
निर्मितीच्या अनुषंगाने त्यांनी अनेक ठिकाणी लिहिलेलं आहे. लेखकाला स्वत:चं असं जग निर्माण करावं लागतं की जे सर्व प्रकारच्या अतिक्रमणापासून अलिप्त आहे. एक असं स्थान की जिथं प्रत्येक वेळी बौद्धिक खाद्याची आवश्यकता भासते. कोणताही लेखक बाहेरच्या जगापासून तुटलेला राहू शकत नाही. त्याला प्रत्येक क्षणी समाज, परंपरा, प्रेम, घृणा, हिंसा, नातेसंबंध याबरोबरच सामाजिक, राजकीय व्यवस्थेचा सामना करावा लागतो असं त्या म्हणतात. मित्रो मरजानी, डार से बिछुडी, सुरजमुखी अंधेरे के, ए लडकी, दिलो दानिश, यारो के यार या त्यांच्या साहित्यकृतींमधून जी स्त्री समोर येते ती पारंपरिक सामाजिक स्थितीची चिकित्सा करणारी आहे. स्वाभिमानी, स्वतंत्र मन असणारी, स्वतंत्र बुद्धीने विचार करणारी, पितृसत्ताक समाजाने निर्धारित केलेल्या सर्व संकल्पनांना छेद देणारी अशी ही स्त्री आहे. सगळ्या नात्यांच्या पलीकडे जाऊन एक माणूस म्हणून तिला सर्वांगाने समजून घेण्याचा प्रयत्न कृष्णा सोबती यांच्या सर्वच लेखनात दिसून येतो. यात पारंपरिक धारणांना धक्के आहेत. रूढ चौकटीचे साचे मोडून टाकण्याचा एक बेबंदपणा आहे. नवी भाषा घडवण्याचं आव्हान आहे. साठ-सत्तरच्या दशकात ही गोष्ट अपूर्व होती. अर्थात कथा- कादंबऱ्यांची भाषा लेखक घडवत नाही तर पात्रंच ही भाषा निवडतात. ज्या ठिकाणाहून ती येतात तिथूनच ते आपली भाषा उचलतात असं त्यांचं विधान हे साहित्यकृतीच्या स्वायत्त असण्याबद्दल पुरेसं स्पष्ट आहे. म्हणूनच त्यांच्या ‘जिंदगीनामा’ची भाषा वेगळी आहे आणि ‘ए लडकी’ची भाषा त्याहून वेगळी. झोपेत जसं कुणी पावसाचा आवाज ऐकतं तसंच वाहून गेलेल्या काळाची स्पंदनं मी ऐकते, हे त्यांचं वाक्य किती सुंदर आहे.
‘मित्रो मरजानी’ ही कादंबरी म्हणजे जणू एका संयुक्त कुटुंबाची बंदिश. या कादंबरीतली मित्रो ही व्यक्तिरेखा स्त्री-पुरुष संबंधातला पारंपरिक उंबरठा ओलांडणारी. या कादंबरीबद्दल कृष्णा सोबती यांनी असं म्हटलं आहे की, साहित्य आणि कलेच्या क्षेत्रात श्लील- अश्लीलता जोखणं इतकं सोपं नाही. नैतिकता आणि धर्माच्या चौकटीपलीकडे मानवी जगण्याचा फार मोठा भाग आहे. या जीवनाची उमेद, आस्था, दुबळेपणा, प्रेम, स्वप्न, छोटे-मोठे आर्थिक संघर्ष या सर्व गोष्टींना नैतिकतेच्या नावाखाली छाटणं आणि जुन्या मूल्यांच्या वर्तुळात उभं करून त्यावर निर्णय देणं योग्य नाही. असं करणं म्हणजे आपल्या घराच्या खिडकीतून दिसणारं आभाळ म्हणजेच संपूर्ण आकाश आहे असं मानल्यासारखं होईल. साहित्य आणि कथित नीतिनियमांची नजर एक असू शकत नाही… कृष्णा सोबती यांच्या साहित्यकृतींची निर्मितीप्रक्रिया सांगणारं ‘रचना का गर्भगृह’ या नावाचं एक पुस्तक आहे. यात काही कलाकृतींच्या पार्श्वभूमीबद्दल त्यांनी खूप मनस्वी लिहिलं आहे. त्याचबरोबर लेखनासंबंधी विचार प्रकट करणारे काही लेखही त्यात समाविष्ट आहेत. सर्जनशील लेखनाबरोबरच त्यांनी वारंवार आपली थेट आणि धीट अशी मतं प्रकट केली.
भारतातली उदार, सहिष्णू अशी परंपरा कायम टिकविण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी ठाम भूमिका घेतली होती. त्यांनी म्हटलंय, ‘कोणत्याही छोट्या- मोठ्या राजकीय पक्षाकडून धार्मिक, जातीय संकुचिततावाद पसरवण्याचा प्रयत्न होईल तेव्हा तो भारताच्या धर्मनिरपेक्ष नीतीच्या विरोधातला गुन्हा मानला गेला पाहिजे. हा देश शेकडो वर्षांपासून सर्वसमावेशक आणि सहिष्णू राहत आला आहे. हा देश ना कुठल्या एका धर्माचा, ना जातीचा. इथं अयोध्या आहे आणि फैजाबादही, सांची आहे आणि सिकंदराबादही, बनारस आहे आणि मुघलसरायही, प्रयागराज आहे आणि अजमेर शरीफसुद्धा… शतकानुशतकांपासून या साऱ्या भारतीय संज्ञा या देशाच्या धमन्यांमधून वाहत आहेत, इतिहासाच्या पानात अढळ आहेत. हे सारं कसं बदलता येईल?’ हा त्यांचा प्रश्न आजही टोकदार वाटावा असाच आहे.