नृत्य-सादरीकरणातील त्याच त्या नायिका, प्रियकरावर त्यांनी अवलंबून असणे हे सारे कंटाळवाणे वाटण्याचा प्रसंग कुमुदिनी ऊर्फ ‘कुमीबेन’ लाखियांवरही कधीकाळी- म्हणजे १९६५ वगैरे सालीच- ओढवला असेल; पण यातून त्यांनी मार्ग काढला आणि कथ्थक या नृत्यप्रकाराची, ‘कथा कहे सो कथक’ ही परंपरागत व्याख्याच त्यांनी बदलून टाकली, हे कुमीबेन यांचे मोठेपण! आज ‘कथ्थक शैलीचे आधुनिक नृत्य’ असा निराळा नृत्यप्रकार सादर केला जातो आहे आणि तो सादर करणारे आदिती मंगलदास, अक्रम खान आदी त्यांचे शिष्यही आता ‘गुरू’ म्हणून नावाजले जात आहेत. कथ्थक नृत्यप्रकाराला आधुनिक बाज देणाऱ्या या परात्पर गुरू कुमीबेन यांचे १२ एप्रिल रोजी, वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले.

‘पद्माविभूषण’ हा किताब कथ्थकसाठी यापूर्वी फक्त पं. बिरजू महाराजांनी मिळवला होता, तो कुमीबेन यांनाही (२०२५) मिळाला, अशी त्यांची योग्यता. त्या आधुनिक होत्या म्हणजे काय, यासाठीचे एकच तगडे उदाहरण म्हणजे ‘‘रंगमंचावर तुम्ही जाताय ना? मग मला गुरूबिरू म्हणू नका… जे काही तुम्ही करणार आहात, त्याची जबाबदारी तुम्ही स्वत: घ्या!’’ ही त्यांची शिकवण! अगदी ८५ व्या वर्षीसुद्धा त्या नाचत होत्या, शिकवत होत्या. पण गेल्या काही वर्षांत- विशेषत: नव्वदीनंतर – त्यांची प्रकृती ढासळत गेली.

कथ्थकमधला अर्धशतकाहूनही अधिक काळाचा त्यांचा प्रवास मुंबईतून सुरू झाला. या नृत्यशैलीच्या जयपूर घराण्याचे प. सुंदरप्रसाद हे त्यांचे पहिले गुरू. वडील त्या काळात (१९३०-४० च्या दशकात) अभियंता होते. त्यांची बदली झाल्यामुळे कुमुदिनी यांचे शाळा/ महाविद्यालयीन शिक्षणही दिल्ली, लाहोरला, अलाहाबाद अशा ठिकठिकाणी झाले. यापैकी दिल्लीत मार्गदर्शनासाठी राधेलाल मिश्रा होते; लाहोरहून दिल्लीला येऊनजाऊनही नृत्यशिक्षण सुरू ठेवता येत होते; पण अलाहाबादेत मात्र बनारस घराण्याचे कथ्थक पाहाणे एवढेच हाती उरले. यातूनही शिकता आले खरे; पण तोवर उदयशंकर, त्यांचे ‘बॅले’पथक यांचे अप्रूप सुरू झाले होते. असेच नृत्यनाट्य-पथक वडिलांचे मित्र रामगोपाल यांनीही स्थापले होते, त्यांच्या लंडन दौऱ्यात कुमुदिनीचाही समावेश झाला. विलायतेच्या त्या वारीत नृत्याचे विश्वरूपदर्शन घडलेच आणि जोडीदारही (रजनीकांत लाखिया) भेटला. व्हायोलिन आणि सरोद वाजवणाऱ्या रजनीकांत यांनी अहमदाबादमध्ये स्थायिक होऊन मोटारींचे दुकान काढले, त्याच्या पोटमाळ्यावर कुमुदिनीही मुलींना कथ्थक शिकवू लागल्या. ही ‘कदंब कला केंद्रा’ची सुरुवात होती. पुढे या केंद्राने स्वतंत्र, प्रशस्त जागा घेतली. अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनींना घडवले. समूहनृत्यातील संचरचनांचा (फॉर्मेशन्स) प्रयोग कुमीबेन यांनी कथ्थकमध्ये केला. बॅलेमधला उंच उसळी मारून होणारा पदन्यास किंवा अन्य हालचाली कथ्थकमध्ये आणल्या.

‘अत: किं?’सारखे वैचारिकतेला प्राधान्य देणारे नृत्य (१९८०) बसवलेच पण गंमत म्हणून ‘उमराव जान’ चित्रपटाचे नृत्यदिग्दर्शनही केले! संगीत नाटक अकादमी (१९८२) व याच अकादमीचा टागोररत्न सन्मान (२०११), पद्माश्री (१९८७), पद्माभूषण (२०१०) असा त्यांच्या प्रतिभेचा गौरवही वेळोवेळी झाला.