कोळंबी हा समुद्रातील तलस्थ भागात राहणारा अपृष्ठवंशीय प्रसृष्टीतील जलचर, पोषणमूल्य आणि चव याबाबतीत सागरी खाद्यान्नात अग्रस्थानी आहे. कोळंबीची निर्यात देशाला मोठय़ा प्रमाणात परकीय चलन मिळवून देते. इंग्रजीत त्यांना ‘श्रिम्प्स’ अथवा ‘प्रॉन्स’ म्हणतात.
कोळंबीचे ‘पिनीड’ (मोठय़ा आकाराच्या) आणि ‘नॉनपिनीड’ (लहान) असे दोन प्रमुख प्रकार आहेत. ‘पिनीड’ आर्थिकदृष्टय़ा महत्त्वाच्या आहेत. आपल्या किनारपट्टीवर पिनीड कोळंबीच्या सुमारे १४२ प्रजाती आढळतात. त्यापैकी चिंगुळ (पीनिअस मोनोडॉन), सोलट (फेनेरोपीनिअस प्रजाती), कापशी (मेटापीनियस मोनोसीरॉस), चांभारी (मेटापीनियस अॅफिनिस), लाल कोलंबी (पेरापिनिऑक्सिस स्टायलीफेरा), गोयनार (सोलेनेसेरा क्रॅसिकॉर्निस), दगडी (मेटापीनेओप्सिस स्ट्रायडुलन्स) असे प्रमुख प्रकार आहेत. तर ‘नॉनपिनीड’ समूहातील जवळा किंवा कोलीम (अॅसीटस इंडिकस) व ‘करंदी/अंबाड’ (नीमाटोपॅलिमॉन टेनुयूपीस) या प्रजाती भारतीय किनारपट्टीवर विपुल प्रमाणात सापडतात.
कोळंबीचे संपूर्ण शरीर ‘कायटीन’युक्त कवचाने वेढलेले असून दोन भागांत विभागलेले असते. डोके व वक्ष मिळून शिरोवक्ष बनतो तर उर्वरित मांसल भागाला उदर म्हणतात. शिरोवक्षावरील टोकदार शिंगाचा वापर स्वसंरक्षणासाठी होतो. शिरोवक्ष व उदरावरील उपांगाच्या अनेक जोडय़ांचा उपयोग अन्नग्रहण, तोल सांभाळणे, पोहणे इत्यादींसाठी होतो, तर टोकाचे छोटे शेपूट सुकाणूचे काम करते. सुलभ हालचालीसाठी कवचाचे विभाजन अनेक वलयांत झालेले असते. शरीराची वाढ होताना कवचाचा अडसर होऊ नये म्हणून जुने कवच टाकून नवीन कवच निर्माण होत असते.
समुद्राच्या तळाशी असणारे शेवाळ, मृत प्राण्याचे कुजलेले अवशेष, मृदुकाय शंख-शिंपले व इतर संधिपाद प्राण्यांची अंडी व पिल्ले असे अन्न कोलंबी खाते. नर, मादी वेगवेगळे ओळखता येतात. प्रथिनांचा उत्तम स्रोत असलेली कोळंबी शिजवून, तळून खाल्ली जाते. शिवाय तिच्या मांसापासून भुकटी, लोणची, वेफर्स अशी उत्पादने बनवतात. टाकाऊ कवचाचा वापर उद्योगधंद्यांत, शेतीत करतात. कोळंबीच्या कवचातील ‘कायटीन’ पर्यावरणपूरक वेष्टने, सौंदर्य प्रसाधने, शस्त्रक्रियेत घालण्यात येणाऱ्या टाक्याचे धागे बनविण्यासाठीही होतो. जवळा, करंदी यांसारख्या कोळंब्या वाळवून सुकट बनवतात. सोलून वाळवलेल्या कोळंब्यांपासून ‘सोडे’ तयार करतात. कोळंबीच्या अनिर्बंध मासेमारीमुळे कोळंबीचे उत्पादन घटले. मागणी आणि पुरवठा यांची सांगड घालण्यासाठी आता अनेक ठिकाणी कोळंबीची शेती खाडी व किनारी भागातील निमखाऱ्या पाण्याच्या कृत्रिम तलावात केली जाते.
डॉ. सीमा खोत ,मराठी विज्ञान परिषद