महात्मा गांधींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर ‘पुणे करार’ केल्यानंतर राजकीय कार्यसंन्यास घेऊन सामाजिक कार्य करण्याची मानसिकता स्वीकारली. त्याअंतर्गत त्यांनी अस्पृश्यता निर्मूलन कार्य हाती घेण्याचे ठरविले. अस्पृश्यतेचे समर्थक सनातनी पंडित व धर्माचार्य यांना याची कुणकुण लागताच ते ‘अब्राह्मण्यम्-अब्राह्मण्यम्’ची हाकाटी करू लागले. धर्मबुडीचा हलकल्लोळ माजवू लागले. अस्पृश्यता हा अधर्म आहे, पाप आहे अशी भावना घेऊन महात्मा गांधींनी अस्पृश्यता निर्मूलनाची धुरा उचलण्याचा निश्चय घेतला खरा; पण त्यासही त्यांना धर्माधार हवा होता, म्हणून त्यांनी सप्टेंबर १९३२ पासून सनातनी आणि पुरोगामी दृष्टीच्या धर्मपंडितांशी येरवडा तुरुंगात विचारविमर्श सुरू केला. जमनालाल बजाज धुळे तुरुंगात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे सहबंदी होते. तर्कतीर्थ तुरुंगात कलकत्त्याचे सत्याग्रही असलेल्या शेठ माधवजींना ‘दशोपनिषदे’ शिकवीत. ते विवेचन आधुनिक दृष्टीचे असे. त्यात ते अस्पृश्यता निवारणास धर्माधार असल्याचे सांगत. जमनालाल बजाज यांना हे निरूपण नवे वाटे. त्यांनी ही गोष्ट महात्मा गांधींच्या लक्षात आणून दिली. महात्मा गांधींनी तर्कतीर्थांना पाचारण केले. २६ नोव्हेंबर, १९३२ ला तर्कतीर्थांचे बालपणीचे मित्र व सेनापती बापट यांचे सहकारी धुंडीराज पंत देव हे काँग्रेसचे वयोवृद्ध कार्यकर्ते हरिभाऊ पाठक यांच्यामार्फत महात्मा गांधींचा निरोप घेऊन वाईस आले.

त्यानुसार तर्कतीर्थांनी महामहोपाध्याय पाठकशास्त्री, चिंतामणराव वैद्या, विद्वद्रत्न डॉ. के. ल. दफ्तरी प्रभृती मान्यवरांशी चर्चा करून, संदर्भ गोळा करून १० डिसेंबर, १९३२ ला महात्मा गांधींची भेट घेतली. पुढे तीन आठवडे ही सल्लामसलत होत राहिली. पुढे यात बाबू भगवानदास, आनंद शंकर ध्रुव, इंदिरारमण शास्त्री, पी. एच. पुरंदरे मंडळी सामील झाली. स्वामी केवलानंद सरस्वतींच्या मार्गदर्शनाखाली अस्पृश्यता निवारण निवेदन तयार केले. सनातनी मंडळींना हे निवेदन मान्य नव्हते. महात्मा गांधींना उभयपक्षी पंडितांचे निवेदन अशासाठी हवे होते की, हे कार्य एकमताने व्हावे; पण सनातनी पंडितांच्या दुराग्रहामुळे ते होऊ शकले नाही.

loksatta editorial on first day of Donald Trump
अग्रलेख : वॉशिंग्टनची कुऱ्हाड!
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Cecile Richards personality
व्यक्तिवेध : सीसिल रिचर्ड्स
chandrashekhar bawankule loksatta article
पहिली बाजू : समर्पित कार्यकर्त्यांना दंडवत!
Ancient Egypt’s Worship of Buddha and Hindu Deities
Ancient India Egypt connection: प्राचीन इजिप्तमध्ये गौतम बुद्ध आणि हिंदू देवतांची पूजा; सांस्कृतिक देवाणघेवाणीचा पुरातन वारसा नेमकं काय सांगतो?
accused akshay shinde encounter
अन्वयार्थ : हत्येचा गुन्हा दाखल कराच
chhatrapati shivaji maharaj technology
तंत्रकारण : तंत्राधिष्ठित शिवनीती
congress maharashtra elections 2024
लालकिल्ला: काँग्रेसचा ‘हरियाणा’ की, ‘मध्य प्रदेश’?

हेही वाचा : अन्वयार्थ : ‘टिकटॉक’ची टिकटिक!

अस्पृश्यता निवारणासंबंधीच्या चर्चेत लक्षात आलेली गोष्ट अशी होती की, शास्त्रवाक्ये जरी सनातन पक्ष समर्थक असली तरी धर्माचा मूळ युक्तिवाद हा पुरोगामी दृष्टीचा होता. धर्मग्रंथ सनातन पक्ष समर्थक असले तरी धर्माचे तत्त्वज्ञान अथवा हिंदुधर्माचे मूळ सिद्धांत अस्पृश्यतेचे समर्थन करणारे नव्हते, शिवाय ‘चांडाळ’ या शब्दावर जी अस्पृश्यता उभी होती, तो संदर्भ वर्तमान अस्पृश्यांना लागू करणे अतार्किक, अन्यायाचे व धर्मव्यवहार म्हणून असंगत होते. अस्पृश्यता निवारणसंबंधी सनातनी मंडळींकडून आलेल्या निवेदनातील ‘अस्पृश्यों को देवता प्रवेश करना धर्मशास्त्रदृष्ट्या निषिद्ध नहीं है। इस प्रतिज्ञा का समर्थन हम या हमारे धर्मशास्त्रज्ञ करेंगे।’ या वाक्याच्या आरंभी तर्कतीर्थांनी ‘आज माने हुए’ अशा उपवाक्याची पुस्ती जोडली. त्यामुळे छोट्या दुरुस्तीने अस्पृश्यतेसंबंधीचा पूर्वापार प्रचलित संदर्भ बदलून गेला. शब्दप्रामाण्य म्हणजे धर्म मानणाऱ्या सनातनी पंडितांना बुद्धिप्रामाण्यावर आधारित युक्तिवाद अमान्य होणे स्वाभाविक होते.

या येरवडा धर्मचर्चेत सहभागी होण्यासाठी पश्चिम बंगालमधील भाटपाडा या तर्कविद्योचे माहेरघर असलेल्या क्षेत्रातून वयोवृद्ध धर्मपंडित पंचानन तर्करत्न भट्टाचार्य आले होते. त्यांनी आपला सनातन अभिप्राय महात्मा गांधींपुढे मांडला. एव्हाना महात्मा गांधी अस्पृश्यता निवारण कार्य धर्मसंमत असल्याच्या विवेकी निर्णयाप्रत पोहोचले होते. ते आचार्य भट्टाचार्यांना म्हणाले, ‘‘मी आपल्यासारखा धर्मशास्त्राचा पंडित नाही. धर्मावर माझी श्रद्धा मात्र आपार आहे. आपणासारख्यांकडून मी धर्म समजून घेतो व आचरितो. सर्व विद्वानांचे ऐकल्यानंतरही माझी धार्मिक श्रद्धा निश्चितपणे असे सांगते की, अस्पृश्यता हे पाप आहे. ईश्वरी संकेताचा हा अपमान आहे. अशा स्थितीत विद्वानांच्या निर्णयाप्रमाणे वागून परमार्थाचा अधिकारी होईन की, माझ्या विवेक व संशयातीत आज्ञेप्रमाणे आचरण केल्यास परमार्थाचा अधिकारी होईन?’’

हेही वाचा : पहिली बाजू : समर्पित कार्यकर्त्यांना दंडवत!

नंतर महात्मा गांधींनी आपल्या ‘हरिजन’ या इंग्रजी साप्ताहिकाच्या ११ फेब्रुवारी १९३३ च्या पहिल्या अंकात अस्पृश्यता निवारणसंबंधी जे निवेदन प्रसिद्ध केले होते, ते तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी तयार केलेले होते, त्यावर अन्य अनेकांबरोबर तर्कतीर्थांचीही स्वाक्षरी होती.

  • डॉ. सुनीलकुमार लवटे

drsklawate@gmail.com

Story img Loader