कायदेभंगाच्या चळवळीचा प्रारंभ महात्मा गांधींनी मिठाच्या सत्याग्रहाने केला. त्याचा प्रारंभ १२ मार्च, १९३०च्या साबरमती आश्रमापासून निघालेल्या दांडीयात्रेने झाला. मिठाच्या सत्याग्रहाच्या निमित्ताने भारतभर पारतंत्र्याच्या विरोधात मोठ्या प्रमाणात झालेली जनजागृती व जनसहभाग लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने ४-५ मेच्या मधील मध्यरात्री महात्मा गांधींना अटक केली. त्याचे पडसाद देशभर उमटणे स्वाभाविक होते. कायदेभंगाच्या चळवळीस लोक- शांती युद्धाचे रूप देण्यासाठी लोकांनी उत्स्फूर्तपणे ’वॉर कौन्सिल’ची स्थापना करण्याचा सपाटा लावला. विशाल महाराष्ट्रासाठी शंकरराव देव आणि आचार्य शं. द. जावडेकर यांच्या नेतृत्वाखाली जी ‘वॉर कौन्सिल’ नेमण्यात आली, तिच्यात गंगाधरराव देशपांडे (कर्नाटक गांधी), प्रा. धर्मानंद कोसंबी, अच्युतराव पटवर्धन, लालजी पेंडसे, श्री. शं. नवरे, कमलादेवी चट्टोपाध्याय, द्वा. भ. कर्णिक, धनाजी नाना चौधरी प्रभृती मान्यवरांबरोबर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशीही होते. या महाराष्ट्र नागरी कायदेभंग समितीने कायदेभंग चळवळ गतिमान करण्यासाठी सत्याग्रह विस्ताराचा भाग म्हणून जंगल सत्याग्रह, अटकसत्र, विदेशी कापडांवर बहिष्कार, दारूबंदी आंदोलन, जनजागृती मेळावे, मोर्चे, मिरवणुका, सभा, प्रभातफेऱ्या इत्यादींद्वारे ही चळवळ शहरांबरोबर वाडी, वस्ती, पाडे यांच्यापर्यंत पोहोचविण्याची शिकस्त केली.
कायदेभंग चळवळीत प्रारंभी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी वाईच्या कृष्णाघाटावर अनेक भाषणे दिली. ती प्रभावी ठरल्यानंतर कऱ्हाडच्या कृष्णाघाटावर सतत सात दिवस भाषणे आयोजित करण्यात आली होती. दहा हजार लोक भाषणास जमत. ’काय नाटकावानी बोलतुया’ असे उद्गार काही शेतकऱ्यांनी काढले, तेव्हा तेथील सुप्रसिद्ध वकील आळतेकर, पांडुण्णा शिराळकर, रघुअण्णा धोपाटे वगैरे मंडळींनी शास्त्रीबुवांना सांगितले, ‘हे उद्गार म्हणजे तुम्हाला मिळालेल्या कॉम्प्लिमेंटस् आहेत, गैरसमज करून घेऊ नका,’ अशी नोंद दि. वि. देव यांनी तर्कतीर्थांवरील साप्ताहिक ‘नवयुग’च्या २६ नोव्हेंबर, १९४४च्या अंकात प्रकाशित एका लेखात करून ठेवली आहे.
हेही वाचा : व्यक्तिवेध : डेव्हिड लिंच
त्या वेळी तर्कतीर्थ तीस वर्षांचे तरुण कार्यकर्ते होते. चेहऱ्यावर बुद्धिमत्तेचे प्रखर तेज, अंगावर बंगाली पद्धतीने घेतलेली शाल या तत्कालीन तर्कतीर्थ व्यक्तिमत्त्व वर्णनास यशवंतराव चव्हाण, भाई माधवराव बागल यांनी आपल्या आठवणींतून उजळा दिलेला दिसतो. ही भाषणे जनतेच्या दृष्टीने अविस्मरणीय ठरली. आपल्या या भाषणांतून तर्कतीर्थ प्राचीन साहित्यातील घटना, प्रसंग, चरित्रांद्वारे पारतंत्र्याची नवी मीमांसा करीत जनतेत स्वातंत्र्यप्रेम निर्माण करीत. अन्य देशांतील क्रांतीच्या कथा सांगून ते लोकमत चेतवत असत. मे १९३० मध्ये कऱ्हाडमध्ये झालेल्या या सात भाषणांच्या नोंदी यशवंतराव चव्हाणांच्या ‘कृष्णाकाठ’ आत्मचरित्रात तसेच अन्यही अनेक लेखांमध्ये आहेत.
‘हजारो माणसे उन्हात तापलेल्या घाटावर बसली होती. उन्हाने तापलेला कातळ त्यावर बसणाऱ्या माणसाला भाजेल इतका गरम होता. शास्त्रीबुवा बोलण्यासाठी उभे राहिले आणि त्यांनी पहिले वाक्य उच्चारले, ‘‘तुम्ही बसला आहात, तो घाट आता असा गरम झाला आहे तशी तुमची बुद्धी व मने गरम झाली पाहिजेत. देशाची तुमच्याकडे आज ही मागणी आहे.’’ तरुण शास्त्र्याचे हे पहिले एकच वाक्य सभा जिंकून गेले. तर्कतीर्थ पुढे म्हणाले, ‘‘मी माझ्या गुरूंच्या पायाशी बसून सहा शास्त्रांत (षडंग वेद-शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद, ज्योतिष) पारंगत झालो आहे आणि मला आता या शास्त्रांचे रूपांतर शस्त्रांमध्ये करायचे आहे. ही मोठी शास्त्रे आता शस्त्रे बनली नाहीत, तर हिंदुस्तानात कायमची गुलामगिरी राहील. ’’
हेही वाचा : लोकमानस : होय- ‘महाराष्ट्र थंड गोळा आहे’!
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी ज्या राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या प्राज्ञपाठशाळेतून घडले, त्या पाठशाळेचे विद्यार्थी त्या काळी भूपाळ्या म्हणत प्रभातफेऱ्या काढत, ‘आम्ही पांडवांसारखी शिस्त पाळू’ अशी सार्वजनिक शपथ घेत. तर्कतीर्थ या काळात पिस्तूल बाळगत व शस्त्रास्त्रांचा पुरवठा भूमिगतरीत्या करीत असल्याच्या नोंदी आहेत. तर्कतीर्थांना पिस्तूल चालवण्याचा प्रसंग कधीच आला नाही. मात्र, एका सहकाऱ्याच्या पिस्तुलातून चुकून सुटलेल्या गोळीतून तर्कतीर्थ आश्चर्यकारकरीत्या वाचले होते, हे खुद्द तर्कतीर्थांनीच लिहून ठेवलेले आहे.